समता पतसंस्थेत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी
कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे
समता पतसंस्थेत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी
कोपरगाव : शिक्षणापासून वंचित असलेल्या मानव जातीला शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे काम डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केले. त्यांनी भारत देशाला राज्यघटना दिली. समाजात विखुरलेल्या जातींना एकत्र आणून एक मानव जात त्यांनी तयार केली. त्यांचे विचार हे जगाला दिशादर्शक असल्याने आपण सर्व त्यांच्या विचारांचे अनुयायी होऊया. असे प्रतिपादन कोपरगाव तालुका व्यापारी महासंघाचे कार्याध्यक्ष श्री. सुधीर डागा यांनी केले.
आशियाई पतसंस्थांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या एशियन कॉन्फडरेशन ऑफ क्रेडिट युनियन (ॲक्यू) या आंतरराष्ट्रीय शिखर संघटनेचे सदस्यत्व असलेल्या भारतातील एकमेव समता नागरी सहकारी पतसंस्थेत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती समता पतसंस्थेचे चेअरमन ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांच्या अध्यक्षतेखाली साजरी करण्यात आली. या प्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
पुढे म्हणाले की, सामाजिक कार्यात समता पतसंस्था नेहमीच अग्रभागी असते.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती विविध पक्ष, सामाजिक संघटना, साजरी करतात, पण सहकारात पतसंस्था चळवळीतील समता पतसंस्थेनेही जयंती साजरी करून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करत समता नावातील समानता दाखविली आहे.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना काका कोयटे म्हणाले की, महाराष्ट्राच्या मातीत देशाचे प्रतिनिधित्व करणारे अठरापगड जातीतील समाज सुधारक होऊन गेले. त्यांचे कार्य हे महाराष्ट्रासाठी नाही तर,जगाला मार्गदर्शक आहे. महाराष्ट्रातील अनेक समाजसुधारकांपैकी डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे एक असे समाज सुधारक की, यांनी शिक्षणापासून वंचित असलेल्या प्रवाहाला शिक्षणाचे महत्त्व सांगितले. त्यांनी लिहिलेली राज्यघटना ही संपूर्ण जगाला दिशा देणारी आहे.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व प्रास्ताविक मुख्य कार्यालयाच्या एच.आर. उज्वला बोरावके यांनी केले. कार्यक्रमाला संस्थेचे चेअरमन काका कोयटे, संचालक श्री.गुलशन होडे, मुख्य कार्यालयातील अधिकारी, कोपरगाव शाखेचे शाखाधिकारी श्री.आप्पा कोल्हे, कर्मचारी उपस्थित होते.उपस्थितांचे आभार जनरल मॅनेजर श्री.सचिन भट्टड यांनी मानले.