समता आरोग्य मंदिर व योग भवन येथे रथ सप्तमीनिमित्त सामुदायिक सूर्यनमस्कार
कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे


समता आरोग्य मंदिर व योग भवन येथे रथ सप्तमीनिमित्त सामुदायिक सूर्यनमस्कार

कोपरगाव : समता आरोग्य मंदिर व योग भवन येथे रथसप्तमी निमित्त सामुदायिक सूर्य नमस्काराचा कार्यक्रम समता परिवाराचे संस्थापक ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांच्या प्रमुख उपस्थितीत व योग साधिका व साधकांसमवेत उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमात कोपरगावचे योग तज्ञ अभिजीत शहा यांनी सूर्यनमस्कार व रथसप्तमीचे महत्त्व विशद केले. योग शिक्षक सतीश गुजराती यांनी उपस्थितांना प्रत्यक्ष योगाचे प्रशिक्षण दिले. यावेळी महेश थोरात यांचेही सहकार्य लाभले. कोपरगाव शहरातील सुमारे ५० ते६० योग साधकांनी उपस्थित राहून प्रत्यक्ष सूर्यनमस्कार करत सूर्य देवाची उपासना केली.
याप्रसंगी बोलताना योगतज्ञ अभिजीत शहा म्हणाले की, “रथसप्तमी हा केवळ धार्मिक सण नसून सूर्यदेवतेची आराधना करण्याचा हा महत्त्वाचा दिवस आहे. या दिवसापासून सूर्याच्या उत्तरायणाची सुरुवात होते व दिवस हळूहळू मोठा होत जातो. पंचमहाभूतांपैकी एक असलेल्या सूर्य देवतेची उपासना केल्याने आरोग्य, ऊर्जा व मानसिक शांतता प्राप्त होते.”

कार्यक्रमाच्या शेवटी समता परिवाराच्या वतीने समता आरोग्य मंदिर व योग भवन येथे दररोज आयोजित करण्यात येणाऱ्या योगासन वर्गांची माहिती देण्यात आली. सकाळी सहा ते सात या वेळेत पुरुषांसाठी व सायंकाळी सहा ते सात या वेळेत महिलांसाठी नियमित योग वर्ग चालतात. या आरोग्यदायी उपक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन यावेळी समस्त कोपरगावकरांना करण्यात आले.



