समता ठरत आहे, सहकाराचा विश्वास – सूर्यकांत बुचडे, संस्थापक, चौंडेश्वरी पतसंस्था
कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे


समता ठरत आहे, सहकाराचा विश्वास – सूर्यकांत बुचडे, संस्थापक, चौंडेश्वरी पतसंस्था

कोपरगाव : समता नागरी सहकारी पतसंस्थेचे कामकाज हे राज्यातील सहकारी पतसंस्थांसाठी नेहमीच आदर्शवत राहिलेले आहे. संस्थेच्या विविध योजना व उपक्रम हे केवळ आर्थिकच नव्हे तर सामाजिकदृष्ट्याही कौतुकास्पद असून सामाजिक कार्याच्या माध्यमातून व्यवसाय वृद्धी कशी साधता येते, हे समता पतसंस्थेकडून शिकण्यासारखे आहे, असे गौरवोद्गार सांगली जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशनचे संचालक तसेच चौंडेश्वरी नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक सूर्यकांत बुचडे यांनी काढले.

सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यात असलेल्या चौंडेश्वरी नागरी सहकारी पतसंस्थेचे पदाधिकारी, संचालक, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शुक्रवार, दि. २६ डिसेंबर २०२५ रोजी अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यात असलेल्या राज्यातील अग्रगण्य समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयास सदिच्छा भेट दिली. यावेळी ते बोलत होते.

या भेटीदरम्यान चौंडेश्वरी पतसंस्थेचे चेअरमन चंद्रदीप बुचडे, व्हा. चेअरमन विशाल म्हेत्रे, संचालक प्रमोद बुचडे, भीमराव पोळ, संकेत बुचडे, माणिक शिंदे, संचालिका लता बुचडे, सेक्रेटरी हणुमंत पवार, शाखाधिकारी बिरुदेव शिंदे, अमित माळी, लेखापाल नंदा शिंदे, लिपिक जयश्री कांबळे, योगेश बुचडे, अखिलेश जोशी, वैष्णव रेपाळ आदी उपस्थित होते.

सूर्यकांत बुचडे पुढे म्हणाले की, समता पतसंस्थेप्रमाणेच राज्यातील सहकारी पतसंस्था चळवळीचे नेतृत्व काका कोयटे यांच्याकडे आहे. त्यांनी समता पतसंस्थेला ग्रामीण भागात ज्या पद्धतीने पोहोचविले, त्याच धर्तीवर राज्यातील ग्रामीण भागातील अनेक सहकारी पतसंस्थांना त्यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन लाभत आहे. आजच्या या भेटीमुळे मिळालेले मार्गदर्शन आमच्या पतसंस्थेच्या आर्थिक प्रगतीस निश्चितच उपयुक्त ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

यावेळी मार्गदर्शन करताना समता पतसंस्थेचे चेअरमन ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे म्हणाले की, चौंडेश्वरी नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन युवा वर्गातील असल्याने समता पतसंस्थेप्रमाणे ग्राहक हित जपणारे अत्याधुनिक तंत्रज्ञान त्यांच्या संस्थेत अधिक प्रभावीपणे राबविण्याची मोठी संधी आहे. सामाजिक कार्याच्या माध्यमातून संस्थेचे मार्केटिंग प्रभावी होते आणि त्यातून आर्थिक प्रगतीही साधता येते. बदलत्या काळानुसार ग्राहक व सभासदांसाठी विविध नाविन्यपूर्ण योजना व उपक्रम राबविणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच राज्यातील सहकारी पतसंस्था चळवळ अधिक भक्कम करण्यासाठी युवा वर्गाने सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

यावेळी ठेव विभाग प्रमुख संजय पारखे यांनी समता पतसंस्थेने ग्राहकांच्या हितासाठी वापरात आणलेल्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाची सविस्तर माहिती दिली. पेपरलेस व सेल्फ बँकिंग प्रणाली, फॉरेन्सिक ऑडिट रूम, प्रभावी वसुली पॅटर्न, मोबाईल बँकिंग सुविधा, तसेच सोने तारण कर्ज वितरण प्रक्रिया याबाबत त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

तसेच समता महिला बचत गटांच्या माध्यमातून महिलांना रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या सहकार उद्योग मंदिर आणि त्या ठिकाणी उत्पादित होणाऱ्या वस्तूंच्या विक्रीसाठी उभारण्यात आलेल्या समताज सहकार मिनी मॉलची माहितीही त्यांनी दिली.

प्रसंगी चौंडेश्वरी नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक सूर्यकांत बुचडे तसेच उपस्थित पदाधिकारी व अधिकारी यांचा सत्कार समता पतसंस्थेचे चेअरमन ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे व ठेव विभाग प्रमुख संजय पारखे यांच्या हस्ते करण्यात आला



