“समता सहकार क्षेत्रातील आधुनिकतेचा आदर्श नमुना” – श्रीकांतजी दुबे
कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे


“समता सहकार क्षेत्रातील आधुनिकतेचा आदर्श नमुना – श्रीकांतजी दुबे

कोपरगाव : “समता नागरी सहकारी पतसंस्था ही सहकार क्षेत्रातील आधुनिक विचारांची दिशा दाखवणारी संस्था आहे. संस्थेची प्रगत कार्यपद्धती, नवनवीन योजना आणि तंत्रज्ञानाचा अचूक वापर या बाबी राज्यातील इतर पतसंस्थांसाठी आदर्श ठरतील,” असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य नियामक मंडळाचे सदस्य श्रीकांतजी दुबे यांनी केले.

त्यांनी राज्यातील अग्रगण्य अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव येथील समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयाच्या सस्नेह भेटीदरम्यान ते बोलत होते. या भेटीत नागपूर जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष राजेंद्रजी घाटे हे ही उपस्थित होते. संस्थेचे चेअरमन ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांच्या हस्ते त्यांचा यथोचित सन्मान करून सत्कार करण्यात आला. राज्यातील सहकारी पतसंस्थांचे सर्व प्रश्न नियामक मंडळाच्या माध्यमातून सोडवण्याची ग्वाही देखील या प्रसंगी श्रीकांतजी दुबे यांनी दिली.

ते पुढे म्हणाले की. समता पतसंस्था ही पारदर्शक व्यवहार, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि ग्राहक केंद्री दृष्टिकोन यांचे उत्कृष्ट उदाहरण आहे. सहकार क्षेत्रात अशा संस्थांनी पुढे येऊन नवे मानदंड निर्माण करावेत, ही काळाची गरज आहे.”


दरम्यान श्रीकांतजी दुबे व राजेंद्रजी घाटे यांनी संस्थेच्या अत्याधुनिक डिजिटल सेवांचा, ई-सेवांवर आधारित व्यवहार प्रणालीचा, तसेच सुरक्षित सोनेतारण योजना आणि ‘समता लिक्विडिटी बेस्ड प्रोटेक्शन स्कीम’ या उपक्रमांचा प्रत्यक्ष परिचय संस्थेचे चेअरमन काका कोयटे, जनरल मॅनेजर सचिन भट्टड यांनी करून दिला. सामाजिक कार्यातून व्यवसाय वृद्धी या संकल्पनेचे देखील स्वागत करत सहकार उद्योग मंदिर या संकल्पनेचे कौतुक केले.



