समता परिवार व व्यापारी महासंघाचा ‘तिरंगा मशाल रॅली’ मध्ये गौरवशाली सहभाग
कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे


समता परिवार व व्यापारी महासंघाचा तिरंगा मशाल रॅलीमध्ये गौरवशाली सहभाग
ही तिरंगा मशाल रॅली केवळ श्रद्धांजली नव्हे, तर भारतीय सैन्याच्या शौर्याला सलाम करणारा समस्त कोपरगावकरांच्या एकजुटीचा प्रेरणादायी अनुभव ठरला – काका कोयटे, संस्थापक
कोपरगाव (प्रतिनिधी): कोपरगाव शहरात सिंदूर ऑपरेशन व पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारत माता व शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सर्वधर्मीय आणि सर्वपक्षीय तिरंगा मशाल रॅलीचे भव्य आयोजन करण्यात आले. या रॅलीमध्ये समता नागरी सहकारी पतसंस्था, समता चॅरिटेबल ट्रस्ट, समता इंटरनॅशनल स्कूल, सुधन गोल्ड लोन, कोपरगाव तालुका व्यापारी महासंघ, किराणा मर्चंट असोसिएशन, व एक्स सर्व्हिस मॅन असोसिएशन यांचा सक्रिय सहभाग नोंदवण्यात आला.

या रॅलीचे विशेष आकर्षण ठरले ते २६० फूट लांबीच्या राष्ट्रध्वजाचे आयोजन, ज्याचे नेतृत्व समता परिवाराने केले. हा भव्य तिरंगा छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत सन्मानाने फडकवण्यात आला. या उपक्रमात समता पतसंस्था व सुधन गोल्ड लोनचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले.

रॅलीदरम्यान देशभक्तीपर गीतांचा निनाद आणि भारत माता की जय, जय जवान जय किसान, वंदे मातरम अशा घोषणांनी कोपरगावचे रस्ते देशभक्तीमय झाले होते. भारत माता, विंग कमांडर व्योमिका सिंह आणि लेफ्टनंट कर्नल सोफिया कुरेशी यांच्या प्रतिकृतींची सजवलेली वाहन मिरवणूक शहराच्या विविध भागांतून काढण्यात आली. या प्रतिकृतींवर नागरिकांनी फुलांचा वर्षाव करत त्यांचे स्वागत केले.

या रॅलीच्या यशस्वी आयोजनामध्ये समता पतसंस्थेचे चेअरमन ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे, सुधन गोल्ड लोनचे कार्यकारी संचालक संदीप कोयटे, समताचे जनरल मॅनेजर सचिन भट्टड, समता इंटरनॅशनल स्कूल वाहतूक विभाग प्रमुख विजय घाडगे, व्यापारी महासंघाचे पदाधिकारी यांनी विशेष मेहनत घेतली.

या वेळी प्रसिद्ध उद्योजक कैलास ठोळे, कोपरगाव पोलीस शहरचे पी आय भगवान मथुरे, कोपरगाव तालुका किराणा मर्चंट असोसिएशन अध्यक्ष राजकुमार बंब, समता पतसंस्थेचे संचालक संदीप कोयटे, व्यापारी महासंघाचे कार्याध्यक्ष सुधीर डागा, संचालक महावीर सोनी, संतोष गंगवाल, आशुतोष पटवर्धन, उल्हास गवारे, धीरज कराचीवाला, अंकित कृष्णानी आदींसह समस्त व्यापारी बांधव कोपरगावकर बहुसंख्येने उपस्थित होते.



