ब्रेकिंग

कोपरगाव व्यापारी महासंघ व किराणा मर्चंट असोसिएशन आयोजित दीपावली स्नेह मिलन सहल ; वणी गड दर्शन, सांस्कृतिक कार्यक्रम व स्नेहसंमेलनात व्यापाऱ्यांचा उत्साह ओसंडून वाहिला

कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे

कोपरगाव व्यापारी महासंघ व किराणा मर्चंट असोसिएशन आयोजित दीपावली स्नेह मिलन सहल ; वणी गड दर्शन, सांस्कृतिक कार्यक्रम व स्नेहसंमेलनात व्यापाऱ्यांचा उत्साह ओसंडून वाहिला

कोपरगाव : दीपावली म्हणजे प्रकाश, आनंद आणि आपुलकीचा उत्सव. या सणानंतर व्यापाऱ्यांच्या व्यस्त जीवनात थोडा निवांतपणा यावा, एकमेकांशी संवाद साधावा व परस्पर स्नेह दृढ करावा, या उद्देशाने कोपरगाव तालुका व्यापारी महासंघ आणि कोपरगाव तालुका किराणा मर्चंट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ९ नोव्हेंबर २०२५ रोजी दीपावली स्नेह मिलन सहलीचा व्यापारी महासंघाचे जेष्ठ व्यापारी शांतीलाल सोनी यांनी हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला. या वेळी सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र सोनवणे, भरत मोरे, सौ.सपना मोरे, सुनील गंगुले, मंदार पहाडे शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते.

ही सहल व्यापारी महासंघ अध्यक्ष व किराणा मर्चंट असोसिएशनचे संस्थापक ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आली होती. या उपक्रमासाठी व्यापारी महासंघाचे कार्याध्यक्ष सुधीर डागा, किराणा मर्चंट असोसिएशन अध्यक्ष राजकुमार बंब, उपाध्यक्ष चांगदेव शिरोडे, तसेच कोपरगाव तालुका व्यापारी महिला आघाडी अध्यक्षा राजश्री गुजराथी यांनी मार्गदर्शन केले.

९ नोव्हेंबर रोजी सकाळी समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या प्रांगणातून वणी गडाकडे सहभागी व्यापाऱ्यांनी प्रस्थान केले. या सहलीत ८२ व्यापारी, आणि २० महिला व्यापारी सहभागी झाल्या होत्या. कोपरगाव–निफाड–वणी गड–चांदवड–येवला असा हा आनंदयात्रेचा मार्ग ठरविण्यात आला होता.

प्रवासादरम्यान निफाड तेथील कापड व्यापारी सुचित कोठारी आणि अक्षय कोठारी या कोठारी बंधूंनी कोपरगावातील व्यापाऱ्यांचे उत्साहाने स्वागत केले व स्वादिष्ट नाश्त्याची व्यवस्था केली. त्यांच्या या आत्मीयतेबद्दल व्यापारी महासंघ व किराणा मर्चंट असोसिएशन यांच्या वतीने त्यांचा सत्कार करून आभार मानण्यात आले.

यानंतर सर्व व्यापाऱ्यांनी वणी गडावरील सप्तशृंगी देवीचे दर्शन घेतले. भक्तीमय वातावरणात देवीचे दर्शन घेतल्यानंतर सर्वांनी एकत्र येऊन खानदेशी पारंपरिक दाळबट्टीचा आस्वाद घेतला. या क्षणी व्यापाऱ्यांमधील स्नेह, हशा आणि उत्साह याने वातावरण भारावून गेले.

सहल केवळ मनोरंजनापुरती मर्यादित न ठेवता सामाजिक जाणिवेचा स्पर्श देखील या सहलीच्या निमित्ताने करण्यात आला. किराणा मर्चंट असोसिएशन अध्यक्ष राजकुमार बंब यांच्या पुढाकारातून चांदवड येथे असलेल्या नेमिनाथ जैन ब्रह्मचार्य शैक्षणिक संस्थेला सदिच्छा भेट देण्यात आली. येथील विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या पुढील शैक्षणिक प्रगतीसाठी शुभेच्छा दिल्या. त्यानंतर चांदवड मधील रेणुका माता देवी व इच्छापूर्ती गणपतीचे दर्शन घेऊन सर्वांनी परतीचा प्रवास सुरू केला.

परतीच्या प्रवासात येवला शहरात सायंकाळी स्वादिष्ट भोजनाची व छोटेखानी मनोरंजनपर कार्यक्रमाची व्यवस्था करण्यात आली. या कार्यक्रमात व्यापाऱ्यांनी गायन, विनोद व हलक्या फुलक्या उपक्रमांत सहभाग घेतला. आनंद, हशा आणि एकोप्याने भरलेला हा क्षण प्रत्येकासाठी अविस्मरणीय ठरला.

कार्यक्रमाच्या शेवटी सहलीचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल व्यापारी महासंघ व किराणा मर्चंट असोसिएशनचे किरण शिरोडे, प्रदीप साखरे, महावीर सोनी, गुलशन होडे, आशिष लोढा, संदीप काबरा व नारायण लांडगे यांचा सत्कार करून स्नेह मिलन सहलीचा समारोप करण्यात आला.

या उपक्रमामुळे व्यापाऱ्यांमध्ये परस्पर सुसंवाद, आपुलकी व सामाजिक एकोपा दृढ झाला. दिवाळी सणानंतर थोडा विश्रांतीचा श्वास घेण्याची आणि व्यापारी कुटुंबाला एकत्र आणण्याची ही सहल सर्व सहभागींसाठी संस्मरणीय ठरली.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे