समता परिवार आयोजित ‘बाप समजून घेताना’ या हृदयस्पर्शी व्याख्यानाने कोपरगावकर आणि श्रीरामपूरकर यांनी भावनिक होत घेतली शपथ
कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे
समता परिवार आयोजित ‘बाप समजून घेताना’ या हृदयस्पर्शी व्याख्यानाने कोपरगावकर आणि श्रीरामपूरकर यांनी भावनिक होत घेतली शपथ
कोपरगाव : परीक्षेत गुण जास्त मिळाले म्हणजे सर्व काही मिळाले असे नाही, तर आयुष्यात जगायचे कसे ? हे आजच्या पिढीला समजणे महत्त्वाचे आहे. गुण कमी मिळाले तरी चालतील, पण आई-वडिलांकडून संस्कार १०० टक्के मिळवा. संस्काराचे बीज असे आहे की, त्यात जात, धर्म नसून फक्त माणूस असतो. जगाला स्वतःमधील संस्कारांची ओळख अशी करून द्या की, आईने पुन्हा म्हटले पाहिजे की माझ्या पोटी पुन्हा हाच कर्तृत्ववान हिरा जन्माला आला पाहिजे. जो पर्यंत संस्काराचा पदर आई मुलाला देत नाही, तो पर्यंत त्याचा वट वृक्ष होणार नाही. आजच्या तरुण पिढीने व्यसनांच्या आहारी न जाता असे व्यसन करा की , ते व्यसन इतिहासाच्या पानावर लिहून ठेवता आलं पाहिजे. स्री ही कधीच अबला असू शकत नाही.तिला स्व संरक्षणाचे, परिवर्तनाचे धडे दिले गेले पाहिजे हे सर्व शक्य आहे हे नुसते प्रबोधन करून नाही, तर प्रबोधनाच्या पुढचे पाऊल म्हणजे परिवर्तन करून होणार असल्याचे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्याख्याते श्री.वसंत हंकारे यांनी सांगितले.
कोपरगाव तालुक्यातील समता चॅरिटेबल ट्रस्ट, समता नागरी सहकारी पतसंस्था, समता इंटरनॅशनल स्कूल, समता टायनी टॉट्स, स्व.दादाप्पा खंडाप्पा कोयटे विद्यालय आयोजित ‘बाप समजावून घेताना’ या विषयावर आणि कोपरगावची सुकन्या दर्शना पवार व नुकताच शालेय मुलीवर पुण्यात झालेला हल्ला अशा घटना पुन्हा होऊ नये यासाठी काय दक्षता घ्यावी याबाबत महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्याख्याते श्री.वसंत हंकारे यांनी कोपरगाव येथे ८ जुलै २०२३ रोजी आणि श्रीरामपूर येथे १० जुलै २०२३ रोजी कोपरगावकर आणि श्रीरामपूरकरांना हृदयस्पर्शी,अनमोल मार्गदर्शन केले. प्रमुख व्याख्याते आणि प्रमुख मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. तत्पूर्वी कोपरगावची सुकन्या दर्शना पवार हिला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच समता परिवाराचे मार्गदर्शक ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांच्या हस्ते प्रमुख व्याख्याते श्री.वसंत हंकारे यांचा सत्कार करण्यात आला तर त्यांचा परिचय समता इंटरनॅशनल स्कूलचे उपप्राचार्य श्री.समीर अत्तार यांनी करून दिला.या व्याख्यानाला कोपरगाव आणि श्रीरामपूर तालुक्यातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
ते पुढे म्हणाले की , बाप समजून घेणे ही आज काळाची गरज बनली आहे. बाप समजून घेताना बापाची मान सदैव अभिमानाने उंच राहील असे जीवन जगता आले पाहिजे. तसेच बाप हा पुस्तकाच्या पानावर सापडणार नाही, तर तो स्वतःला काहीही न घेता तुमच्या सर्व गरजा पूर्ण करून देणारा, लाईट गेल्यानंतर तुम्हाला रात्रभर वारं घालणारा, लहान असताना बाप घोडा, हत्ती होताना तसेच बाप हा वाघ असला तरी आपल्या मुलांच्या असंख्य चुका पोटात घालणारा, लग्न समारंभात काहीही कमी पडू नये लग्न समारंभावर झाल्यानंतरही धावपळ करत सर्व कामे उरकून नंतर स्वतः एका कोपऱ्यात जाऊन रडणारा असा बाप असतो. त्यामुळे मुलीला बापाकडे मोकळ्या मनाने व्यक्त होता आलं पाहिजे. बापा इतके तुमच्यावर कोणीही प्रेम करू शकत नाही.त्यामुळे बापाची राणी होऊन जगा. घराबाहेरील कोणाच्या ही भुलथापांना बळी पडू नका.
तसेच व्याख्यानातून हंकारे यांनी छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, महात्मा फुले, साने गुरुजी, गाडगे महाराज, झाशीची राणी लक्ष्मीबाई, ताराबाई शिंदे, अहिल्यादेवी होळकर, सावित्रीबाई फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे दाखले देत तत्कालीन महाराष्ट्रीयन संस्कृती आणि संस्कार , सामाजिक परिस्थिती आणि आजची संस्कृती, संस्कार, सामाजिक परिस्थिती यावर भाष्य करत आई – वडिलांनी ही आपल्या मुला – मुलींवर सकारात्मक संस्कार करून त्यांना घडवावे तसेच उपस्थित मुला – मुलींना भावनिक साद घालत बाप समजावून सांगत, बापाची मान अभिमानाने सदैव उंच ठेवण्याची शपथ घेतली. प्रसंगी या हृदयस्पर्शी व्याख्यानाला उपस्थित असलेल्या माता – पालक, तरुण – तरुणी आदींनी भावनिक होऊन आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली.
व्याख्यानपर कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट करताना समता इंटरनॅशनल स्कूलच्या मॅनेजिंग ट्रस्टी सौ.स्वाती कोयटे म्हणाल्या की, महाराष्ट्रातील तरुण पिढी फेसबुक, व्हॉट्स ॲपचा सकारात्मक दृष्टीने वापर करण्यापेक्षा त्याचा गैरवापरच मोठ्या प्रमाणात करत असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे एकतर्फी प्रेमामुळे कोपरगावातील तरुणीला जीव गमवावा लागला. देशभरात दररोज अशा प्रकारच्या घटना वाचायला, पाहायला मिळत आहे. तसेच अन्याय, अत्याचार हा मुलींवरच होत नसून मुलांवरही होत आहे. त्यामुळे या दोन्ही गोष्टींचा सखोल विचार करून या वाईट अपप्रवृत्तींना आळा घालायचा असेल,तर प्रत्येकाच्या मानसिकतेत बदल व्हायला हवा. प्रत्येकाच्या मानसिकतेत बदल घडवून आणायचा असेल तर प्रत्येकाने स्वतःच्या घरातील बाप समजून घेणे गरजेचे आहे. ज्या दिवशी प्रत्येक तरुण – तरुणीला आपला बाप समजेल. त्या वेळेस पुन्हा कोणत्याही दर्शनाला जीव गमवावा लागणार नाही.
या व्याख्यानपर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन समता इंटरनॅशनल स्कूलचे उपप्राचार्य श्री. समीर अत्तार यांनी केले. या कार्यक्रमाला समता परिवाराचे मार्गदर्शक काका कोयटे, समता पतसंस्थेचे संचालक श्री.अरविंद पटेल, श्री.गुलशन होडे, संचालिका सौ. श्वेता अजमेरे, जनरल मॅनेजर श्री.सचिन भट्टड, समता इंटरनॅशनल स्कूलच्या मॅनेजिंग ट्रस्टी सौ.स्वाती कोयटे, प्राचार्या सौ.हर्षलता शर्मा, डॉ.अभिजीत आचारी आदींसह कोपरगाव तालुक्यातील शाळा, महाविद्यालयांचे प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक, विद्यार्थी, पालक – माता, तालुक्यातील विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, सदस्य, मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. उपस्थितांचे आभार श्री.संजय पारखे यांनी मानले.