समता पतसंस्थेकडून पेन्शनर्स डे निमित्त पेन्शनरांचा सन्मान…
कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे
समता पतसंस्थेकडून पेन्शनर्स डे निमित्त पेन्शनरांचा सन्मान…
कोपरगाव : येथील समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या स्व.यशवंतराव चव्हाण समता सहकार सभागृहात पेन्शनर्स डे निमित्त पेन्शनरांचा स्नेह मेळावा संस्थेचे ९१ वर्षीय जेष्ठ सभासद नाना गव्हाळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक समता पतसंस्थेचे चेअरमन ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांनी केले. ते म्हणाले की, सरकारी नोकरीच्या माध्यमातून विविध क्षेत्रात सेवा देऊन सेवानिवृत्त झालेले अधिकारी, शिक्षक, लिपिक, शिपाई अशा वेगवेगळ्या पदांवरून या व्यक्तींचे योगदान अनमोल आहे. त्यांचे ऋण फेडता न येण्यासारखे आहे. तरी ही पेन्शनर्स डेच्या माध्यमातून अल्प ऋण फेडण्याचा प्रयत्न समता पतसंस्थेद्वारा केलेला आहे. पेन्शनर्स व जेष्ठ नागरिक यांच्यासाठी समता पतसंस्थेच्या वतीने शिर्डी येथील साई आश्रया अनाथालयाला भेट देणे, तसेच ज्यांना विमान प्रवास शक्य झाला नाही, त्यांना विमान प्रवासाची वारी आयोजित करण्याचा ही मानस आहे.
तसेच शासकीय कार्यालयात पेन्शनर्स व्यक्ती व जेष्ठ नागरिकांना सन्मानाची वागणूक मिळावी. तसेच त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाविरोधात ॲट्रॉसिटी सारखा कायदा लागू करण्यात यावा. या साठी अखिल भारतीय ज्येष्ठ नागरिक संघाच्यावतीने अशी मागणी करण्यात येणार आहे.
सेवानिवृत्त कार्यालय अधिक्षक संभाजी नाईक मनोगतातून काका कोयटे यांचे विविध क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल आभार मानत त्यांच्या सामाजिक कार्याला शुभेच्छा दिल्या. दिलीप ढेपले यांनी पेन्शनरांच्या अनेक समस्या संघटनेच्या माध्यमातून सोडवितांना काकांचे मार्गदर्शन घेणार असल्याचे सांगितले. बाळासाहेब बडदे म्हणाले की, या दिवसानिमित्त सत्कार करून सन्मान केल्याबद्दल आभार मानत सहकार, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात भूषवित असलेल्या विविध पदांची माहिती देत शुभेच्छा दिल्या.
रामचंद्र ठोंबरे म्हणाले की, समता पतसंस्था व कोयटे परिवार सामाजिक बांधिलकी जपत असून समाजातील विविध घटकांना प्रोत्साहन देत असल्यामुळे आभार मानले. तसेच या दिवसानिमित्ताने आमची दिवाळी साजरी झाली असून घरापेक्षाही अधिक सन्मान दिला आहे. तसेच आम्हाला मिळणाऱ्या पेन्शन मधून आमचा उदरनिर्वाह होत आहे.परंतु काही समाज उपयोगी कामे घडावी. यासाठी काका कोयटे यांनी मार्गदर्शन करावे.असे अरुण पवार यांनी सांगितले.
सौ.सुनिता ससाणे मनोगतात म्हणाल्या की, माझी कोपरगावात शिक्षिका म्हणून नेमणूक झाल्यानंतर निवारा परिसरात राहायला आले. सेवानिवृत्त ही याच परिसरात झाले. काकांनी माझा आणि माझ्या परिवाराचा नेहमी सन्मान केला आहे. निवारा परिसर काकांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक, धार्मिक वातावरणाने फुलला आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष नाना गव्हाळे, व सेवानिवृत्त शिक्षिका रजनीताई गुजराथी, श्रेष्ठ नागरिक मित्र मंडळाचे अध्यक्ष श्रीमती पुष्पलता सुतार यांचा सत्कार संस्थेचे चेअरमन काका कोयटे यांच्या हस्ते तर जेष्ठ संचालक कांतीलाल जोशी यांच्या हस्ते अरुण धुमाळ, दिलीप ढेपले यांचा सत्कार करून सन्मान करण्यात आला.
सेवानिवृत्त शिक्षिका पुष्पाताई गाडेकर यांनी कोपरगाव शाखेचे शाखाधिकारी योगेश मोरे यांच्याकडे संस्थेत ठेव ठेवण्यासाठी धनादेश देत म्हणाल्या की, कोपरगाव तालुक्यात आमची आठवण कोणीच ठेवले नाही. समता परिवाराने आमची आठवण ठेवून, आम्हाला आमंत्रित करून, आमचा यथोचित सन्मान केला. तसेच ठेवीवर मिळणारे व्याज हे पेन्शनरांसाठी सामाजिक काम करणाऱ्या संघटनेला देण्यात यावे. तसेच या वयात मुला – बाळांच्या संसारात हस्तक्षेप न करता व परिवारावर स्वतःची बंधने न लादता स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष दिले पाहिजे. असे रजनीताई गुजराथी यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मुख्य कार्यालयाचे ठेव विभागाचे संजय पारखे यांनी केले. कार्यक्रमाला कोपरगाव तालुक्यातील १५० हून अधिक पेन्शनर्स उपस्थित होते.उपस्थितांचे आभार कोपरगाव शाखाधिकारी योगेश मोरे यांनी मानले.