ब्रेकिंगमहाराष्ट्र

समता परिवार, व्यापारी महासंघ व किराणा मर्चंट असोसिएशनच्या वतीने अहमदनगर जिल्हा बँक असोसिएशनचे नवनियुक्त अध्यक्ष सत्येन मुंदडा यांचा सत्कार

कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे

समता परिवार, व्यापारी महासंघ व किराणा मर्चंट असोसिएशनच्या वतीने अहमदनगर जिल्हा बँक असोसिएशनचे नवनियुक्त अध्यक्ष सत्येन मुंदडा यांचा सत्कार

कोपरगाव : कोपरगाव पीपल्स बँक, लायन्स क्लब ऑफ कोपरगाव, कोपरगाव तालुका पाणी बचाव समिती या सारख्या आर्थिक, सामाजिक संस्थांची विविध पदे भूषवित असताना मिळालेला अनुभव आणि समता परिवाराचे संस्थापक काका कोयटे यांची प्रेरणा घेऊन अहमदनगर जिल्हा बँक असोसिएशनच्या अध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळणार असल्याचे अहमदनगर जिल्हा बँक असोसिएशनचे नव नियुक्त अध्यक्ष सत्येन मुंदडा यांनी सांगितले.

अहमदनगर जिल्हा बँक असोसिएशन अध्यक्ष पदी कोपरगाव पीपल्स बँकेचे माजी अध्यक्ष सत्येन मुंदडा यांची निवड झाल्याबद्दल समता परिवार, कोपरगाव तालुका व्यापारी महासंघ आणि किराणा मर्चंट असोसिएशनच्या वतीने समता पतसंस्थेच्या स्व.मोहनलाल आनंदराम झंवर सभागृहात समता पतसंस्थेचे चेअरमन ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे, व्यापारी महासंघाचे खजिनदार तुलसीदास खुबाणी यांच्या हस्ते सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. त्या वेळी ते बोलत होते.

ते पुढे म्हणाले की, कोपरगाव तालुक्यातील सामाजिक आर्थिक, शैक्षणिक क्षेत्रामध्ये अग्रेसर संस्थांकडून झालेला माझा हा सत्कार पुढील वाटचालीस प्रेरणादायी असून झालेल्या निवडीबद्दल कौतुकाची थाप देणारा आहे. महाराष्ट्रात सहकारी पतसंस्था चळवळ सक्षम व सक्रिय असलेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांच्या सहकार्याने अहमदनगर जिल्ह्यातील बँकांची चळवळही सक्षम व सक्रिय बनविणारा असून जिल्ह्यातील बँकांच्या असणाऱ्या समस्या शासन दरबारी मांडणार आहे. समता परिवार व मुंदडा परिवाराचे घनिष्ठ संबंध राहिलेले असून सतत सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक क्षेत्रात काम करताना समता परिवार, व्यापारी महासंघ, लायन्स क्लबचे सहकार्य नेहमीच मिळत असते.

समता पतसंस्थेच्या स्थापनेत कोपरगाव शहरातील मुंदडा परिवाराचे महत्वपूर्ण योगदान आहे.सत्येन मुंदडा यांना मिळालेले हे पद कोपरगाव तालुक्याचा तसेच समता परिवाराचाही अभिमान असून त्यांना अगोदर मिळालेल्या विविध पदांपेक्षा जिल्ह्याचे नेतृत्व करण्याची मिळालेली ही संधी निश्चितच त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव देणारी असल्याचे समता परिवाराचे संस्थापक काका कोयटे यांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून व्यापारी महासंघाचे कार्याध्यक्ष सुधीर डागा यांनी सत्येन मुंदडा यांनी कोपरगाव शहर व तालुक्यात विविध सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, राजकीय संस्थांच्या माध्यमातून भूषविलेल्या विविध पदांवरून केलेल्या कामाची माहिती देत कमी वयात मिळालेली ही जबाबदारी कौतुकास्पद असल्याचे सांगितले. व्यापारी महासंघाचे खजिनदार तुलसीदास खुबाणी यांनी लायन्स क्लब ऑफ कोपरगाव व व्यापारी महासंघ व माजी नगरसेवक असताना सोबत केलेल्या विविध कामांच्या आठवणी ताज्या केल्या.

या वेळी मंदावी नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन आशुतोष पटवर्धन, लायन्स क्लब ऑफ कोपरगावचे माजी अध्यक्ष परेश उदावंत, सराफ बाजार शिवाजी रोड व्यापारी महासंघाचे अध्यक्ष धीरज कराचीवाला, उपाध्यक्ष शाम जंगम, बाजार तळ व्यापारी महासंघ कार्याध्यक्ष हर्षल जोशी, बस स्टॅन्ड व्यापारी महासंघ अध्यक्ष हर्षल कृष्णानी, भाजी मार्केट व्यापारी महासंघ अध्यक्ष नारायण लांडगे, सचिव मानव शुक्ला आदींसह मित्र परिवार, हितचिंतक उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे