‘समता’ त जागतिक सहकार दिन साजरा
कोपरगाव : समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयात जागतिक सहकार दिन सहकार व कायदे तज्ञ शाम क्षीरसागर यांच्या हस्ते सहकार ध्वजाचे ध्वजारोहण करून साजरा करण्यात आला. या वेळी पोहेगाव नागरी सहकारी पतसंस्था संस्थापक नितीन औताडे, मंदावी नागरी सहकारी पतसंस्था चेअरमन आशुतोष पटवर्धन, सुरज नागरी सहकारी पतसंस्था चेअरमन अशोक कोठारी, महात्मा फुले नागरी सहकारी पतसंस्था चेअरमन हरिभाऊ गिरमे यांची प्रमुख उपस्थिती होती. समता पतसंस्थेचे चेअरमन ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांच्या अध्यक्षतेखाली समता पतसंस्थेत जागतिक सहकार दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
महाराष्ट्रातील सहकारी पतसंस्था चळवळीशिवाय सामान्य जनतेचा उद्धार अशक्य आहे. ग्रामीण भागापर्यंत सहकार पोहोचलेला असून त्याची पाळेमुळे महाराष्ट्रात खोलवर रुजलेली आहे. ‘विना सहकार, नाही उद्धार’ या उक्तीनुसार सहकाराशिवाय सामान्य माणसाला पर्याय नाही हे ही तितकेच गरजेचे असल्याचे सहकार व कायदे तज्ञ शाम क्षीरसागर यांनी या वेळी सांगितले.
तर सुरज पतसंस्थेचे चेअरमन अशोक कोठारी मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, समता पतसंस्था ही महाराष्ट्रातील सहकारी पतसंस्थांचे नेतृत्व काका कोयटे यांच्या रूपाने करत आहे. त्यांनी समताच्या माध्यमातून सभासद ग्राहकांना त्वरित सेवा देण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाशी सांगड घातली आहे. महाराष्ट्रातील सहकारी पतसंस्थांमध्ये देखील अत्याधुनिक तंत्रज्ञान अधिकाधिक कसे वापरता येईल ? या साठी ते महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या माध्यमातून सतत प्रयत्न करत असतात. समताच्या आर्थिक प्रगतीत त्यांना अनेक संकटांना सामोरे जावे लागले त्या संकटांना सामोरे जात त्यांनी समताचा झेंडा परदेशातही फडकविलेला आहे.
अध्यक्षीय मनोगतातून संस्थेचे चेअरमन काका कोयटे यांनी कोपरगाव तालुक्यातील सहकारी पतसंस्थांच्या चळवळीविषयी सविस्तर माहिती सांगत कोपरगाव तालुक्यातील सहकाराला ऐतिहासिक महत्त्व असल्याचे सांगितले. कार्यक्रमाला मुख्य कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी व कोपरगाव शाखेचे शाखाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जनरल मॅनेजर सचिन भट्टड यांनी केले तर आभार कोपरगाव शाखाधिकारी योगेश मोरे यांनी मानले.