समताचे नव तंत्रज्ञान देशातील पतसंस्थांना आदर्श – रवींद्र भाटी, आमदार
कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे
समताचे नव तंत्रज्ञान देशातील पतसंस्थांना आदर्श – रवींद्र भाटी, आमदार
कोपरगाव : महाराष्ट्रातील लघु उद्योगांना आर्थिक सहाय्य करून त्यांना आर्थिक स्थैर्य प्राप्त करून देण्याचे काम समता पतसंस्थेच्या माध्यमातून होत आहे. भविष्यात भारतातील व्यापारी, लघु उद्योग यांना ही समताने आर्थिक स्थिरता मिळवून द्यावी. नव तंत्रज्ञान हे समताचे बलस्थान असून देशातील सहकारी पतसंस्थांना समता वापरत असलेले नव तंत्रज्ञान आदर्श असल्याचे गौरवोद्गार आमदार रवींद्र भाटी यांनी काढले.
राजस्थान मधील बारमेर जिल्ह्यातील शिव तालुक्याचे युवा आमदार रवींद्र भाटी, नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात असलेल्या कृष्णा इन्झोटेक प्रा.लि.चे संचालक सम्राट वर्मा यांनी समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयास सदिच्छा भेट दिली असता, त्यांचे महाराष्ट्रीयन संस्कृती प्रमाणे औक्षण करून स्वागत करण्यात आले. आमदार रवींद्र भाटी यांचा सत्कार संस्थेचे चेअरमन ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांच्या हस्ते करण्यात आला तर सम्राट वर्मा यांचा सत्कार संचालक अरविंद पटेल यांनी केला. या वेळी ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, समता परिवाराने माझे व सहकाऱ्यांचे जे आदरातिथ्य केले ते अतिथी देवो भव ! या उक्ती समान वाटले. या आदरातिथ्यामुळे समता आर्थिक व्यवहाराबरोबरच महाराष्ट्रीयन संस्कृती ही जपत असल्याचे अनुभवायला मिळाले.
या वेळी संस्थेचे संचालक संदीप कोयटे यांनी, मोबाईल बँकिंग, सेल्फ बँकिंग, फॉरेन्सिक ऑडिट कंट्रोल रूम, ऑनलाईन समता रिकव्हरी पॅटर्न, सोनेतारण प्रक्रिया, मुख्य कार्यालयातील कामकाज आदीं बाबत सविस्तर माहिती दिली. समताचे नव तंत्रज्ञान, व्यापारी, लघु उद्योजक यांना देत असलेली सेवा आणि बदलत्या काळानुसार कामकाज करण्याच्या पद्धती विषयी मिळालेल्या सविस्तर माहिती बद्दल आमदार रवींद्र भाटी व उद्योजक सम्राट वर्मा यांनी समाधान व्यक्त करत पुढील आर्थिक प्रगतीसाठी शुभेच्छा दिल्या.
या वेळी संस्थेचे संचालक जितुभाई शहा, राजकुमारजी बंब, करणीदान चारण, जेठूसिंह राठोड, बलवीरसिंह शेखावत, प्रेमजी चौधरी, कानसिंह भाटी, झाबरमल यादव, रामगोपाल यादव, ओबाराम देवासी, मुरली महाराज, ओम महाराज, शंकरलाल कुमावत, मुख्य कार्यालयातील अधिकारी, कोपरगाव तालुक्याचे रहिवासी असलेले राजस्थानी समाज बांधव बहुसंख्येने उपस्थित होते. उपस्थितांचे आभार संस्थेचे जनरल मॅनेजर सचिन भट्टड यांनी मानले.