देश-विदेशब्रेकिंगमहाराष्ट्र
सभासदांनी दाखविला समतावर विश्वास; १५ टक्के लाभांश सभासदांच्या खात्यात जमा – चेअरमन काका कोयटे
कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे

सभासदांनी दाखविला समतावर विश्वास; १५ टक्के लाभांश सभासदांच्या खात्यात जमा – चेअरमन काका कोयटे

कोपरगाव : गेल्या ४० वर्षांपासून सभासदांचा विश्वास संपादन करत यशस्वी वाटचाल करणाऱ्या समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या ४१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत पुन्हा एकदा सभासदांनी संस्थेवर ठाम विश्वास व्यक्त केला. स्व. यशवंतराव चव्हाण समता सहकार सभागृहात झालेल्या या सभेत संस्थेच्या आर्थिक प्रगतीचा ताळेबंद व नफातोटा पत्रक मांडण्यात आले. यावेळी सर्व सभासदांनी सर्व ठराव हात वर करून मंजुर करण्यात आले. समता नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांनी संस्थेच्या सर्व ठेवी १०० टक्के सुरक्षित असल्याचा विश्वास व्यक्त केला.
१५ टक्के लाभांश थेट खात्यावर जमा संस्थेने सर्वसाधारण सभेत सभासदांना १५ टक्के लाभांश जाहीर केला. विशेष म्हणजे, अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून वार्षिक सभा संपल्याबरोबर लाभांशाची रक्कम सभासदांच्या खात्यावर वर्ग करण्यात आली. सभासदांना मोबाईलवर एसएमएस प्राप्त झाल्याने सभागृहात आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
सभेत मांडण्यात आलेल्या आर्थिक अहवालानुसार, दि. ३१ मार्च २०२६ अखेर संस्थेकडे ११२८ कोटी रुपयांच्या ठेवी असून ८२४ कोटी रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले आहे. तसेच संस्थेची सुरक्षित गुंतवणूक ३१६ कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. जगातील सर्वाधिक सुरक्षित मानल्या जाणाऱ्या सोनेतारण कर्ज योजनेंतर्गत संस्थेने तब्बल ५८५ कोटी रुपयांचे कर्जवाटप केले असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. संस्थेला आर्थिक वर्षअखेर १३ कोटी रुपयांचा ढोबळ नफा झाल्याचेही स्पष्ट करण्यात आले.

यावेळी बोलताना काका कोयटे म्हणाले, “सभासदांनी गेल्या चार दशकांपासून समतावर जो विश्वास ठेवला आहे, तोच संस्थेची खरी ताकद आहे. संस्थेची आर्थिक स्थिती मजबूत असून भविष्यातही अधिक पारदर्शक आणि सुरक्षित सेवा देण्याची आम्ही खात्री देतो. ”
सभेदरम्यान सभासद व ठेवीदारांनी संस्थेवर विश्वास दाखवत कोट्यवधी रुपयांच्या नवीन ठेवी जाहीर केल्या.
संस्थेचे व्हा. चेअरमन अरविंद पटेल यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “समता म्हणजे कुबेराचा खजिना आहे. तो कधीही रिकामा होणार नाही. सभासदांच्या आशीर्वादाने तो आणखी भरत राहील.”यावेळी कोपरगाव प्रगत विविध कार्यकारी सोसायटीचे राजेंद्र गिरमे यांनी सांगितले की, प्रगत सोसायटीचे व्यवस्थापन समताने स्वीकारले असून समताच्या सहकार्याने सभासद शेतकऱ्यांसाठी अल्पदरात ड्रोनद्वारे औषध फवारणीचा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

मागील वार्षिक सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त सरव्यवस्थापक सचिन भट्टड यांनी वाचून दाखवले. त्यांनी सांगितले की, अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे समताने राज्यात वेगळी ओळख निर्माण केली आहे.सेल्फ बँकिंग प्रणालीद्वारे व्हाऊचरलेस व्यवहार, मिस्ड कॉलवर ओटीपीच्या माध्यमातून पैसे मिळण्याची सुविधा यामुळे ग्राहकांचा वेळ वाचत असून व्यवहार अधिक पारदर्शक झाले आहेत. त्यामुळे सभासदांचा विश्वास अधिक दृढ होत आहे. तसेच समता लिक्विडिटी बेस्ड प्रोटेक्शन स्कीमअंतर्गत ९९.९४ टक्के ठेवीदारांच्या ७० लाख रुपयांपर्यंतच्या ठेवी पूर्णपणे सुरक्षित असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.

संचालक संदीप कोयटे यांनी अशोक खरात प्रकरणाबाबत खुलासा करत सर्व व्यवहार कायदेशीर असून सभासदांनी विपर्यस्त वृत्तांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन करत त्यांनी हात जोडून नतमस्तक होत संचालक मंडळाच्या वतीने सभासदांनी ठेवलेल्या विश्वासाबद्दल आभार मानले.
सभेत संस्थेच्या ४० व्या वर्धापनदिनानिमित्त नफा वाटपातून २५ लाख रुपयांची तरतूद करण्याचा निर्णय घेण्यात आला असून सप्टेंबर महिन्यात सर्व सभासदांचा सन्मानपूर्वक सत्कार करून त्यांना भेटवस्तू देण्यात येणार असल्याची घोषणाही करण्यात आली.
राज्यातील सहकारी पतसंस्था चळवळीला दिलासा देण्याचे काम समता पतसंस्थेने केले असल्याचे आशुतोष पटवर्धन यांनी सांगितले. शाम क्षीरसागर म्हणाले की, “सोनेतारण कर्ज हे सर्वाधिक सुरक्षित कर्जप्रकार असल्याने समताच्या ठेवीदारांच्या ठेवी अतिशय सुरक्षित आहेत.” चंद्रकांत शिंदे यांनी सांगितले की, सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून समताने कोपरगावकरांचा विश्वास संपादन केला असून आजही नागरिकांचा संस्थेवर मोठा विश्वास आहे.

सभेदरम्यान अहिल्यानगर शाखेचे सभासद व अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकरी बँकेचे माजी कार्यकारी संचालक आर. डी. मंत्री यांनी समताच्या कार्याचे कौतुक केले. “आमचा अनेक वर्षांपासून समता पतसंस्थेवर विश्वास आहे. आमच्या ठेवी सुरक्षित असल्याने आम्ही इतरांनाही समतात ठेवी ठेवण्यास प्रोत्साहित करणार आहोत,” असे ठेवीदार सी. बी. वक्ते यांनी सांगितले.

सभेस संस्थेचे व्हा. चेअरमन अरविंद पटेल, जेष्ठ संचालक जितुभाई शहा, संचालक संदीप कोयटे, अशोक दरक, दीपक अग्रवाल, गिरीष सोनेकर, कचरू मोकळ, भरत अजमेरा, चांगदेव शिरोडे, कायदेविषयक सल्लागार विजय गवांदे, टॅक्स सल्लागार दत्तात्रय खेमनर यांच्यासह मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते. उपस्थितांचे आभार अरविंद पटेल यांनी मानले.

