समताच्या कार्याचा आदर्श घेत सहकारात नव्या वाटचालीचा संकल्प
कार्यकारी संचालक प्रा.पोपट साळवे

समताच्या कार्याचा आदर्श घेत सहकारात नव्या वाटचालीचा संकल्प


कोपरगाव : “समता पतसंस्थेचे कार्य, व्यवस्थापन आणि सामाजिक बांधिलकी अत्यंत प्रभावी असून, संस्थेचे चेअरमन काका कोयटे यांच्याशी झालेल्या संवादातून सहकार क्षेत्रातील अनेक नवे दृष्टिकोन समजले. हा अभ्यास दौरा आमच्यासाठी प्रेरणादायी आणि ज्ञानवर्धक ठरला,” असे मत बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील अर्थवेल नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन बाळासाहेब माने यांनी व्यक्त केले.
राज्यातील सहकार क्षेत्रात आधुनिक व्यवस्थापन, पारदर्शक कारभार, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि सभासदाभिमुख सेवेमुळे वेगळी ओळख निर्माण केलेल्या समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या कार्याचा अभ्यास करण्यासाठी विविध सहकारी संस्थांचे पदाधिकारी सातत्याने भेटी देत आहेत. त्याच अनुषंगाने बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील अर्थवेल पतसंस्थेचे चेअरमन बाळासाहेब माने, संचालक अनिल वाघमारे, दीपक बुरांडे, अमर माने तसेच श्रीनिवास पतसंस्थेचे चेअरमन सुशांत हजारे यांनी समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयाला सदिच्छा भेट दिली.

यावेळी समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या विविध उपक्रमांची, आर्थिक प्रगतीची, आधुनिक बँकिंग सुविधांची तसेच सामाजिक बांधिलकी जपत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची सविस्तर माहिती जाणून घेतली. संस्थेच्या कार्यपद्धतीची पाहणी करून त्यांनी समाधान व्यक्त केले.
भेटीदरम्यान राज्य फेडरेशनचे कार्यकारी अध्यक्ष आणि समता नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांच्याशी राज्यातील सहकार चळवळीची वाटचाल, पतसंस्थांसमोरील सध्याची आव्हाने, बदलते धोरण आणि भविष्यातील संधी यावर सविस्तर चर्चा झाली. सहकार अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक असलेल्या विविध उपक्रमांवरही यावेळी विचार विनिमय करण्यात आला.


संस्थेच्या कार्यपद्धतीची, विविध सेवा-सुविधांची, आर्थिक वाटचालीची आणि समाजाभिमुख उपक्रमांची माहिती संस्थेचे असिस्टंट जनरल मॅनेजर योगेश आसने, एच.आर.उज्वला बोरावके, कर्ज विभाग प्रमुख अनिल आवारे यांनी प्रात्यक्षिकाद्वारे सविस्तर दिली.
समता पतसंस्थेने सभासद केंद्रित सेवा, पारदर्शक कारभार आणि सामाजिक उत्तरदायित्व जपत उभारलेला आदर्श कौतुकास्पद असून संस्थेच्या यशस्वी वाटचालीबद्दल संस्थेचे अभिनंदन करून भविष्यातही अशाच प्रकारे सहकार क्षेत्राला दिशा देणारे कार्य सुरू राहावे, अशी अपेक्षा श्रीनिवास पतसंस्थेचे चेअरमन सुशांत हजारे यांनी व्यक्त केली.



