राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत समताच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश – सौ.स्वाती कोयटे, मॅनेजिंग ट्रस्टी
कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे
राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत समताच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश – सौ.स्वाती कोयटे,मॅनेजिंग ट्रस्टी
कोपरगाव : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवरील गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळाले पाहिजे या उद्देशाने सुरू केलेल्या समता इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होणे हेच आमचे मुख्य ध्येय आहे. समता पॅटर्नद्वारा विद्यार्थी शैक्षणिकदृष्टया अनेक नवनवीन रेकॉर्ड तयार करत आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या बौद्धिकते बरोबरच मानसिक व शारीरिकतेलाही आम्ही विशेष महत्त्व देत आहोत.विविध क्रीडा प्रकारांच्या माध्यमातून विद्यार्थी सुदृढ बनवण्याचा आमचा विशेष प्रयत्न असतो.विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा प्रकाराच्या माध्यमातून सुदृढतेबरोबरच जिल्हा, राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक वेगवेगळे विक्रम प्रस्थापित केलेले आहेत. या वर्षीही पुन्हा एकदा मुंबई येथील रंगोत्सव सेलिब्रेशन संस्थेतर्फे राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आलेल्या रंगभरण आणि हस्ताक्षर स्पर्धेत समता इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी एकूण ५५ पदके मिळवित घवघवीत यश संपादन केल्याची माहिती समता इंटरनॅशनल स्कूलच्या मॅनेजिंग ट्रस्टी सौ.स्वाती संदीप कोयटे यांनी दिली.
मुंबई येथील रंगोत्सव सेलिब्रेशन संस्थेतर्फे राष्ट्रीय पातळीवरील २०२२-२३ या वर्षीच्या रंगभरण आणि हस्ताक्षर स्पर्धांचे आयोजन ऑगस्ट महिन्यात करण्यात आले होते. या स्पर्धांमध्ये समता इंटरनॅशनल स्कूलच्या प्राथमिक व माध्यमिक विभागातील इ.१ ली ते इ.१० वीचे विद्यार्थी सहभागी झाले होते. सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी रंगभरण आणि हस्ताक्षर प्रकारात सुवर्ण, कास्य, रजत अशी ५५ पदके मिळविली. रंगभरण स्पर्धेत २८ आणि हस्ताक्षर स्पर्धेत २७ पदकांचा समावेश आहे. समताच्या आर्ट मेरिट मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना सन्मान चिन्ह आणि आकर्षक बक्षिसे देऊन सत्कार करण्यात आला. यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना कला विभागाच्या प्रमुख विभावरी नगरकर आणि कला शिक्षक – शिक्षिका यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले.
समता इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे, मुख्य कार्यवाहक श्री.संदीप कोयटे, मॅनेजिंग ट्रस्टी सौ.स्वाती संदीप कोयटे, उपप्राचार्य श्री. समीर अत्तार यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे अभिनंदन केले. या विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून विशेष कौतुक होत असून पुढील आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात येत आहे.