समता इंटरनॅशनल स्कूलमध्ये आरोग्यविषयक कार्यशाळा संपन्न
कार्यशाळेच्या प्रमुख मार्गदर्शिका डॉ.उज्वला शिरसाठ यांच्या समवेत समता इंटरनॅशनल स्कूलचे विद्यार्थी व शिक्षक.
कोपरगाव : समता इंटरनॅशनल स्कूल मध्ये प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांसाठी भारतातील इंडियन अकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्स या संस्थेच्या माध्यमातून ना नफा, ना तोटा या तत्त्वावर चालणाऱ्या संकल्प संपूर्ण स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत इंडियन अकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्सचे अध्यक्ष डॉ.उपेंद्र एस.किंजवाडेकर यांच्या मार्गदर्शनखाली अहमदनगर जिल्ह्याच्या समन्वयक डॉ.उज्वला शिरसाट यांच्या उपस्थितीत आरोग्यविषयक कार्यशाळा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या वेळी कार्यशाळेचे अध्यक्ष स्थान समता इंटरनॅशनल स्कूलच्या मॅनेजिंग ट्रस्टी सौ.स्वाती संदीप कोयटे यांनी भूषविले. प्राचार्या सौ.हर्षालता शर्मा यांच्या हस्ते इंडियन अकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्स अहमदनगर जिल्हा समन्वयक डॉ.उज्वला शिरसाट यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी डॉ.उज्वला शिरसाट यांनी विद्यार्थ्यांची निरोगी जीवनशैली विषयी काळजी कशी घ्यावी ? ती कशी अंगीकारावी ? याबद्दल सखोल मार्गदर्शन केले.
त्या म्हणाल्या की, संतुलित आहार, वेळेवर झोपणे, मोबाईलचा कमी वापर करणे तसेच बारीक सारीक समस्यांवर पालक व शिक्षकांनी लहान मुलांशी लक्ष देऊन स्वतःहून वार्तालाप करणे यामुळे अनेक लहान मुलांना सुंदर जीवन जगण्याचे मार्गदर्शन आणि उत्कृष्ट जीवनशैली विषयीचे बाळकडू मिळत असते. तसेच लहान मुलांमध्ये वाढत जाणारा लठ्ठपणा, उच्च रक्तदाब, मधुमेह, किडनी व यकृत संदर्भातील बिघाड, कर्करोग यांसारखे आजार बालवयातच होऊ लागल्याने लहान मुलांची काळजी घेणे गरजेचे बनले आहे. तसेच लहान मुलांमधील जंक फूड विषयी असणारे आकर्षण हे लहान मुलांसाठी घातक आहे. यावर उपाय म्हणून शाळेत शिक्षक मुलांकडे लक्ष देतच असतात, पण सगळ्यात महत्त्वाची जबाबदारी ही पालकांची असून त्यांनी ही या सर्व आजारांची इत्यंभूत माहिती घेऊन त्यापासून लहान मुलांची काळजी घेतली पाहिजे.
इंडियन अकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्स संस्थेचे ४० हजाराहून अधिक सभासद असून भारत देशातील १ हजार शहरांमध्ये कार्यरत आहे. ही संस्था लहान मुलांच्या स्वास्थ्य संदर्भातील सर्व बाबींची सविस्तर माहिती देण्याचे महत्वपूर्ण काम करत असते. महाराष्ट्रातील ३०० हून अधिक प्राथमिक व माध्यमिक शाळेतील मुलांना निरोगी जीवनशैली विषयी मार्गदर्शन करत असते.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना मॅनेजिंग ट्रस्टी सौ.स्वाती कोयटे म्हणाल्या की , समता इंटरनॅशनल स्कूल महाराष्ट्रातील विद्यार्थी केंद्रित स्कूल म्हणून नावाजलेली आंतरराष्ट्रीय स्तरावरील गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणे हाच आमचा मुख्य उद्देश आहे. विविध विद्यार्थी केंद्रित योजना, उपक्रम, कार्यशाळांच्या माध्यमातून आम्ही राबवत असतो. या कार्यशाळेमुळे प्राथमिक विभागातील लहान मुलांनाच नाही, तर माध्यमिक विभागातील मुल आणि शिक्षकांना ही फायदा होणार आहे. उत्कृष्ट स्वास्थ्य व निरोगी आरोग्य ही समताच्या प्रत्येक विद्यार्थ्यांची ओळख असून सक्षम समाज घडविण्यास मदत करणार आहे.तसेच ही कार्यशाळा भविष्यातील तरुण पिढीला स्वास्थ्य व निरोगी आरोग्याच्या दृष्टीने दिशादर्शक आहे.
कार्यशाळेचे सुत्रसंचालन व प्रास्ताविक शिक्षिका सौ.कविता मोरे यांनी केले. कार्यशाळेच्या प्रमुख मार्गदर्शक डॉ.उज्वला शिरसाट, मॅनेजिंग ट्रस्टी सौ.स्वाती कोयटे, प्राचार्या सौ.हर्षलता शर्मा, उपप्राचार्य श्री समीर अत्तार, विद्यार्थी व पालक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. यशस्वीतेसाठी अकॅडमी कोऑर्डिनेटर शिक्षिका सौ.सारिका अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली समता इंटरनॅशनल स्कूलचे शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले. उपस्थितांचे आभार शिक्षिका सौ.चैताली पटारे यांनी मानले.