येवले नगरीत समता पतसंस्थेच्या ज्येष्ठ सभासदांचा सन्मान
कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे


येवले नगरीत समता पतसंस्थेच्या ज्येष्ठ सभासदांचा सन्मान

येवला : समता नागरी सहकारी पतसंस्था, समता इंटरनॅशनल स्कूल आणि येवला शहरातील श्रीराम ज्येष्ठ नागरिक संघ व श्री स्वामी समर्थ ज्येष्ठ नागरिक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने १ ऑक्टोबर जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त ज्येष्ठ नागरिकांसाठी जलद चालणे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. शहरातील हेलिपॅड मैदान, गोशाळा या परिसरात ही स्पर्धा उत्साहात व खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.
या स्पर्धेत ६५ वर्षांवरील तब्बल ९० ज्येष्ठ महिला व पुरुषांनी सहभाग घेतला. स्पर्धेचा शुभारंभ समता पतसंस्थेचे चेअरमन ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे व व्हा. चेअरमन अरविंद पटेल यांच्या हस्ते झाला.

बक्षीस वितरण समारंभ ज्येष्ठ नागरिक महासंघाचे नाशिक जिल्हा विभागीय अध्यक्ष अशोकराव होळकर यांच्या हस्ते, प्रा. प्रभाकर झळके, श्रीकांत पारेख यांच्या प्रमुख उपस्थितीत व समता पतसंस्थेचे चेअरमन काका कोयटे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. या वेळी श्रीराम ज्येष्ठ नागरिक संघ अध्यक्ष रावसाहेब दाभाडे, सरचिटणीस कृष्णा शिंदे, स्वामी समर्थ ज्येष्ठ नागरिक संघ अध्यक्ष राजेंद्र आहेर, सचिव विजय पोंदे, संयोजक नारायण क्षीरसागर यांच्यासह स्पर्धक बहुसंख्येने उपस्थित होते. प्रसंगी अशोकराव होळकर यांची ज्येष्ठ नागरिक ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या राष्ट्रीय समितीवर निवड झाल्याबद्दल समता पतसंस्थेच्या वतीने संस्थेचे चेअरमन काका कोयटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
स्पर्धेत येवला शाखेचे ज्येष्ठ सभासद अशोकराव गायकवाड यांनी प्रथम, प्रदीप परदेशी यांनी द्वितीय तर शिवाजी जमधडे यांनी तृतीय क्रमांक पटकावला. तर रामदास गायकवाड, शांताराम आव्हाड, घुमनासिंग परदेशी, सुरेश भावसार, उत्तम दवंगे, नामदेव कोल्हे, मधुकर चव्हाण आदींनी उत्तेजनार्थ बक्षिसे मिळवली.

अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना काका कोयटे म्हणाले की, “ज्येष्ठ नागरिक ही राष्ट्रीय संपत्ती असून या संपत्तीचे संगोपन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. केंद्र व राज्य शासनाने राष्ट्रीय पेन्शन योजनेद्वारे ज्येष्ठांना दरमहा १० हजार रुपये पेन्शन द्यावी. समता पतसंस्था जेष्ठांसाठी ठेवींवर विशेष व्याजदर व विविध व्याख्यानांद्वारे आनंदी जीवनाचा मंत्र देत असते.”
या वेळी श्रीकांत पारेख यांनी “आरोग्यमय जीवनशैली व योग्य आहारपद्धती” यावर मार्गदर्शन केले. “वय वाढले की आहार कमी करावा, साखर-मीठ-मैदा टाळावा, नियमित व्यायाम करावा, चालणे हा उत्कृष्ट व्यायाम प्रकार आहे. झोपेचे महत्त्व ओळखावे” असे ते म्हणाले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन समता इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य समीर आत्तार यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी येवला शाखाधिकारी विनय बाकले यांच्यासह अधिकारी,कर्मचारी, तसेच समता इंटरनॅशनल स्कूल क्रीडा विभाग प्रमुख रोहित महाले व शिक्षकांनी परिश्रम घेतले. उपस्थितांचे आभार व्हा. चेअरमन अरविंद पटेल यांनी मानले.



