समता परिवाराच्या माध्यमातून आम्हाला पाय ठेवण्यासाठी जागा मिळाली – श्री युवराज गांगवे,माजी सैनिक
समता वार्ता कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे
समता परिवाराच्या माध्यमातून आम्हाला पाय ठेवण्यासाठी जागा मिळाली – श्री युवराज गांगवे,माजी सैनिक
कोपरगाव : स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी आजी माजी भारतीय सैनिकांचा मान-सन्मान करून हे दिवस भारतभर साजरे केले जातात. त्यानंतर आमचे प्रश्न, समस्यांवर कोणीही,काहीही बोलत नाही त्यामुळे आम्ही संघटनांच्या माध्यमातून आमचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करत असतो. कोपरगाव तालुक्यात माजी सैनिकांची एक्स सर्व्हिसमेन्स असोसिएशन नावाची संघटना २०१६ पासून कार्यरत आहे. या संघटनेच्या माध्यमातून कोपरगाव तालुक्यातील सेवानिवृत्त सैनिकांच्या समस्या सोडवत असतो, पण अनेक प्रयत्न करूनही आम्हाला संघटनेच्या कार्यालयासाठी जागा उपलब्ध होत नव्हती.समता परिवाराचे संस्थापक, मार्गदर्शक काका कोयटे यांच्याकडे मी व संघटनेच्या सदस्यांनी पाठपुरावा केला असता त्यांनी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून आम्हाला कार्यालयासाठी जागा उपलब्ध करून देत पाय ठेवण्यासाठी जागा मिळाली आहे. यामुळे आम्हाला एक प्रकारे या दिवसानिमित्त भेटच दिली आहे.असे प्रतिपादन एक्स सर्व्हिसमेन्स असोसिएशनचे अध्यक्ष व कोयटे विद्यालयातील ७३ व्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे श्री युवराज गांगवे यांनी केले.
प्रारंभी स्व.दादाप्पा खंडाप्पा कोयटे विद्यालयात ७३ व्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे कोपरगाव तालुका एक्स सर्व्हिसमेन्स असोसिएशनचे अध्यक्ष श्री युवराज गांगवे यांच्या हस्ते व महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष आणि समता परिवाराचे संस्थापक,मार्गदर्शक ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांच्या अध्यक्षतेखाली आणि समता पतसंस्थेचे जेष्ठ संचालक श्री अरविंद पटेल, श्री गुलशन होडे,जनरल मॅनेजर श्री सचिन भट्टड,मुख्य कार्यालयाचे अधिकारी,एक्स सर्व्हिसमेन्सचे सदस्य,कोयटे विद्यालयाच्या कार्यवाह सौ सुहासिनी कोयटे,साई निवारा मित्र मंडळाचे अध्यक्ष श्री सुरेंद्र व्यास, श्रेष्ठ नागरिक मित्र मंडळाच्या अध्यक्षा श्रीमती पुष्पलता सुतार,प्रभाग क्र.२ मधील नगरसेवक श्री जनार्दन कदम,श्री वैभव गिरमे यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले.
त्यानंतर एक्स सर्व्हिसमेन्स असोसिएशन कोपरगाव कार्यालयाचे उद्घाटन कोपरगाव तालुक्यातील शहिद जवान अमोल जाधव यांच्या पत्नी श्रीमती सरला जाधव व कोपरगाव नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा,समता महिला बचत गटाच्या अध्यक्षा सौ सुहासिनी कोयटे यांच्या हस्ते करण्यात आले तसेच समता परिवाराचे मार्गदर्शक काका कोयटे यांना कोपरगाव तालुका एक्स सर्व्हिसमेन्स असोसिएशन संघटनेचे मानद सदस्य पद दिल्याचे अध्यक्ष श्री युवराज गांगवे यांनी जाहीर केले.
प्रसंगी प्रमुख पाहुणे श्री युवराज गांगवे यांचे स्वागत आणि यथोचित सन्मान समता परिवाराचे मार्गदर्शक काका कोयटे यांनी व श्रीमती सरला जाधव यांचा सन्मान समता महिला बचत गटाच्या अध्यक्षा सौ सुहासिनी कोयटे यांनी आणि एक्स सर्व्हिसमेन्स असोसिएशनच्या उपस्थित माजी सैनिकांचा सन्मान समता पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयातील अधिकाऱ्यांनी समता महिला बचत गटाच्या महिलांनी उत्पादित केलेल्या उत्पादनांना एकत्र बांधून तयार केलेला गुच्छ देऊन करण्यात आला.
अध्यक्षीय मनोगतातून काका कोयटे म्हणाले की,भारताचा सैनिक हा देशाचा महत्त्वाचा घटक आहे.शत्रूपासून भारत भूमीच संरक्षण ते करत असतात,कधी-कधी देशाचे संरक्षण करता-करता शहिद ही व्हावे लागते तर कधी विशिष्ट वयानंतर सेवानिवृत्त व्हावे लागते त्यामुळे समाजाचे काही तरी देणे लागतो या उक्तीप्रमाणे माजी सैनिक सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांना भेडसावणाऱ्या अनेक समस्यांचा विचार केला असता कोपरगाव तालुक्यातील एक्स सर्व्हिसमेन्स असोसिएशन संघटनेच्या कार्यालयासाठीचा जागेचा प्रश्न संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून समजला.त्यानंतर प्रजासत्ताक दिनाची छोटीशी भेट म्हणून निवारा परिसरातील जागा कार्यालयासाठी देऊन शहीद जवान अमोल जाधव यांच्या पत्नी श्रीमती सरला जाधव यांच्या हस्ते उद्घाटन करून संघटनेला देण्यात आली आहे.
तसेच समता पतसंस्थेने जाहीर केल्याप्रमाणे देशातील सर्वच सैनिकांसाठी ठेवींवर आकर्षक वाढीव व्याजदर उद्यापासून सर्वच शाखांमध्ये देण्यात येणार आहे.राज्य पतसंस्था फेडरेशनच्या वतीने देशातील सर्वच सैनिक ज्या वेळेस शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी येतील त्यावेळेस त्या सैनिकांची राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था मर्यादित स्वरूपात मोफत करण्यात येईल. माजी सैनिकांसाठी केंद्र व राज्य सरकारच्या वतीने क्लस्टरच्या माध्यमातून २६ जानेवारी २०२३ पर्यंत उद्योग सुरू करून पुन्हा त्या दिवशी नवीन भेट देण्याची घोषणा केली.
त्यानंतर कोपरगाव तालुका एक्स सर्व्हिसमेन्स असोसिएशन संघटनेचे सर्व श्री मारुती कोपरे, प्रवीण चिने, विजय भास्कर, विनोद थोरात आदींनी मनोगतातून समता परिवाराचे संस्थापक काका कोयटे यांनी कार्यालयासाठी जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल आभार मानत स्वतःचे अनुभव कथन करून जीवनातील संघटनेचे महत्त्व स्पष्ट केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन समता मुख्य कार्यालयाचे श्री संजय पारखे यांनी केले तर उपस्थितांचे आभार श्री भालचंद्र विभुते यांनी मानले.