समता महिला बचत गटाच्या उद्योग मंदिरात उद्योग देवतेची प्राणप्रतिष्ठा संपन्न
समता वार्ता कार्यकारी संपादक पोपट साळवे
समता महिला बचत गटाच्या उद्योग मंदिरात उद्योग देवतेची प्राणप्रतिष्ठा संपन्न
कोपरगाव – ‘देव-देवतांची मंदिरे उभारण्या बरोबर उद्योग मंदिरे उभारावी त्यामुळे उद्योग व्यवसायातून महिला आर्थिक संपन्नतेकडे वाटचाल करतील. महाराष्ट्र शासनाने समाज मंदिरे देव-देवतांच्या मंदिरांना निधी देताना त्यामध्ये महिला बचत गटांची व्यावसायिक दृष्टीने उद्योग मंदिरे उभारण्याची अट टाकावी तसेच अनेक देव-देवता, आश्रमे, मठ यांच्याकडे पडून असलेल्या निधीचा वापर यांसारख्या उद्योग मंदिरांसाठी करण्यात यावा आणि सहकार उद्यमी व समता महिला बचत गटाद्वारे महिला बचत गटांसाठी व्यवसायिक दृष्टीने वाटचाल ही स्तुती पुर्ण असून त्या माध्यमातून महिलांनी संघटीत होऊन महिला बचत गटाच्या चळवळीचा फायदा घ्यावा’.असे प्रतिपादन बारामती येथील सुप्रसिद्ध भीमथडी जत्रा संयोजिका सौ सुनंदाताई पवार यांनी केले.
२५ सप्टेंबर २०२१ रोजी महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन संचलित सहकार उद्यमी व समता महिला बचत गट कोपरगाव आयोजित महिला बचत गट व गृह उद्योग उत्पादित उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचे उद्देशाने समता नागरी सहकारी पतसंस्थेत महिला बचत गट व गृह उद्योगांना हक्काची जागा उपलब्ध करून देण्यासाठी उभारलेल्या उद्योग मंदिर उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या.
प्रसंगी उद्घाटक सौ सुनंदाताई पवार यांचा सत्कार सहकार उद्यमी अध्यक्षा सौ.अंजलीताई पाटील यांनी केला तर नाशिक येथील विस्डम एक्स्ट्राच्या सौ. दिपाली चांडक यांचा सत्कार समता महिला बचत गटाच्या अध्यक्षा सौ सुहासिनी ओमप्रकाश कोयटे यांच्या हस्ते करण्यात आला. कोपरगावातील अहिंसा हातमाग केंद्राच्यावतीने सौ शोभना ठोळे यांनी सौ सुनंदाताई पवार यांचा सत्कार केला. कोपरगाव तालुक्यातील महिला बचत गटाच्या वतीने सौ संगीता परशुराम साळवे यांनी लक्ष्मी(शिराई) भेट देत व सौ सरिता सचिन बिरुटे यांनी अनेक भाज्या एकत्र करून तयार केलेला गुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक समता महिला बचत गटाच्या अध्यक्षा सौ सुहासिनी ओमप्रकाश कोयटे यांनी केले. त्या म्हणाल्या की, ‘कोयटे परिवार पहिल्यापासूनच व्यवसायात असून छोटे-मोठे व्यापारी, महिला बचत गट यांना व्यवसायात येणाऱ्या विविध समस्यांची जाणीव समता परिवाराचे मार्गदर्शक आणि राज्य फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांना पहिल्यापासूनच आहे. त्याच अनुषंगाने महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या मालाची विक्री आणि त्याला आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा मानस त्यांचा होता तो आज उद्योग मंदिर उद्घाटनाने पूर्ण झाला असून त्याची जबाबदारी आता आपल्या सर्व महिला बचत गटांची आहे. गेल्या दोन वर्षापासून समता महिला बचत गटाच्या माध्यमातून अगरबत्ती, कापूर, निरंजनी, समईच्या वाती तयार करणे असे छोटे-मोठे उद्योग समता बरोबरच इतर महिला बचत गटांच्या माध्यमातून सुरु केले असून त्यांच्या मालाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठ राज्य फेडरेशन संचलित सहकार उद्यमी मिळवून देणार आहे.
या वेळी सहकार उद्यमीच्या अध्यक्षा सौ. अंजली पाटील यांनी सहकार उद्यमीचा महिला बचत गटाविषयीचा उद्देश आणि महिला बचत गटांसाठी चालवण्यात आलेल्या चळवळीची वाटचाल मनोगतातून व्यक्त केली. सौ सुहासिनी ओमप्रकाश कोयटे यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व महिला बचत गटांच्या उपस्थितीत अभिष्टचिंतन करून केक सेलिब्रेशन करण्यात येऊन लायन्स क्लब परिवाराचे श्री सुधीर डागा यांनी मानपत्र वाचन केले. सौ सुनंदाताई पवार यांच्या हस्ते कॉप शॉप वर्ल्ड पोर्टलचे उद्घाटन करण्यात आले. समता स्कूलचे संस्थापक ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आलेल्या विझ किड्स स्पर्धेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते बक्षीसे देण्यात आली. शिर्डी येथील साई आश्रया अनाथ आश्रमातील मुलींचा रॅम्प वॉक शो चा कार्यक्रम संपन्न झाला. या शो चे विशेष की मुलींनी परिधान केलेले ड्रेस हे समता महिला बचत गटाद्वारा शिवणकला उद्योगमार्फत तयार केलेले होते. या शोचे सूत्रसंचालन सौ स्वाती कोयटे यांनी केले तर शो मार्गदर्शिका रिना जाधव व साई आश्रयाचे श्री गणेश दळवी यांचा सत्कार सौ सुनंदाताई पवार यांच्या हस्ते करण्यात आला.
असोसिएशन ऑफ एशियन फेडरेशन ऑफ क्रेडिट युनियनच्या चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर इलेनिता सॅन्ड्रॉक यांनी स्थानिक उत्पादनांना परदेशी बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी ऑनलाईन मार्गदर्शन केले. केंद्र सरकारच्या ९० टक्के पर्यंत अनुदान मिळणाऱ्या स्फूर्ती योजने अंतर्गत क्लस्टर योजनेच्या अधिकृत सल्लागार व नाशिक येथील विस्डम एक्स्ट्रा चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर सौ दिपाली चांडक यांनी मार्गदर्शन करत विसडम एक्स्ट्रा व सहकार उद्योग यांच्यातील समजुतीच्या करारनाम्याचे आदान-प्रदान केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन राज्य फेडरेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ सुरेखा लवांडे व समता महिला बचत गटाच्या कु.रेणुका मुन्शी यांनी केले तर उपस्थितांचे आभार सहकार उद्यमी च्या संचालिका सौ भारती मुथ्था यांनी मानले.