सहकारी उद्यमीच्या माध्यमातून गोदावरी महोत्सवाला व्यापक स्वरूप देण्याचा प्रयत्न – काका कोयटे; गोदावरी महोत्सव २०२१ ची सांगता
समता वार्ता कार्यकारी संपादक पोपट साळवे
सहकारी उद्यमीच्या माध्यमातून गोदावरी महोत्सवाला व्यापक स्वरूप देण्याचा प्रयत्न – काका कोयटे; गोदावरी महोत्सव २०२१ ची सांगता
कोपरगाव – महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन संचलित सहकार उद्यमी व समता महिला बचत गट कोपरगाव आयोजित महिला बचत गट व गृहउद्योग उत्पादित उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने २५ सप्टेंबर रोजी ‘गोदावरी महोत्सव २०२१’ चे उद्घाटन बारामती येथील सुप्रसिध्द भीमथडी जत्रा संयोजिका सौ.सुनंदाताई पवार यांच्या हस्ते करण्यात आले. तर २६ सप्टेंबर रोजी महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा कोयटे यांचे अध्यक्षतेखाली ‘गोदावरी महोत्सव २०२१’ ची सांगता झाली.
प्रसंगी मार्गदर्शन करताना काका कोयटे म्हणाले कि,‘कोरोना काळात अनेकांचा व्यवसाय बुडाला, नोकऱ्या गेल्याने बेरोजगार तरुणाई व बचत गटातील महिलांनी तयार केलेल्या उत्पादनांना एक नवीन बाजारपेठ व विक्रीचे ठिकाण उपलब्ध करून देण्याच्या विचारातून ‘गोदावरी महोत्सव २०२१’ चे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाला कोपरगाव शहर व ग्रामीण भागातील आणि तालुक्याबाहेरीलही महिला बचत गटांनी महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याने गोदावरी महोत्सव कोपरगाव पुरताच मर्यादित न राहता महाराष्ट्रातील अनेक जिल्हे मिळून महोत्सवाचे आयोजन केल्याने सहकार उद्यमीचा महिला बचत गट व गृह उद्योग उत्पादित उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा उद्देश पूर्णत्वास जाईल.
तसेच यामुळे महाराष्ट्रातील महिला बचत गटांच्या व्यवसायात प्रगती होऊन त्यांची आर्थिक संपन्नतेकडे वाटचाल सुरु झाली आहे. कोपरगाव तालुक्यातील महिला बचत गटांच्या महिलांना व्यवसाय करण्यासाठी उद्योग मंदिराचे उद्घाटन करून एक हक्काची जागा उपलब्ध करून दिली आहे. या संधीचा फायदा कोपरगाव तालुक्यातीलच नव्हे, तर महाराष्ट्रातील सर्वच महिला बचत गटांनी घ्यावा.
समता महिला बचत गटाच्या अध्यक्षा सौ.सुहासिनी कोयटे,समता नागरी पतसंस्थेचे संचालक श्री.अरविंदभाई पटेल, श्री.चांगदेव शिरोडे, व्यापारी श्री.अशोकशेठ दरक, कृष्णाई मंगल कार्यालयाचे मालक श्री.चंद्रशेखर देशमुख, साई आश्रयाचे व्यवस्थापक श्री.गणेश दळवी, मार्केटिंग तज्ञ श्री.कमलेश कोते, शार्प इंजिनीअरिंगचे मालक श्री.रविराज भालेराव, सौ.सविता विधाते आदि मान्यवर गोदावरी महोस्तव २०२१ च्या सांगता प्रसंगी उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांपैकी मार्केटिंग तज्ञ श्री.कमलेश कोते, शार्प इंजिनिअरिंगचे मालक श्री.रविराज भालेराव, कालांश उद्योग समुहाचे श्री.रोहित काले यांनी मनोगते व्यक्त केली.
प्रसंगी स्मॉल मशिनरी एक्स्पो चे माध्यमातून छोट्या मोठ्या ६० मशिनरींचे प्रदर्शन व विक्रीसाठी उपलब्ध होत्या तर समता महिला बचत गटासह कोपरगाव तालुक्यातील ७० स्टॉल व तालुक्याबाहेरील २५ स्टॉलच्या माध्यमातून ९५ स्टॉलसह प्रदर्शन व विक्रीचा महोत्सव उत्साहात संपन्न झाला. या महोत्सवा अंतर्गत सहभागी स्टॉल धारकांनी ४८ तासांपैकी १८ तासात साधारणपणे साडेपाच लाख रुपयांचा व्यवसाय केला. ९५ स्टॉल पैकी गुणवत्तापूर्ण व आकर्षक वस्तू, उत्पादने असणाऱ्या ७ स्टॉलची निवड यावर्षी पुण्यातील भीमथडी जत्रेसाठी निवड करण्यात आल्याची माहिती समता महिला बचत गटाच्या अध्यक्षा व सहकार उद्यमीच्या संचालिका सौ.सुहासिनीताई कोयटे यांनी दिली.

तसेच सहकार उद्यमी व समता महिला बचत गट अंतर्गत येणाऱ्या महिला बचत गटांच्या उत्पादनांचे प्रदर्शन व विक्रीस भेट दिलेल्या ग्राहकांमधून भाग्यवान विजेते लकी ड्रॉच्या माध्यमातून निवडण्यात आले. भाग्यवान विजेत्यांमध्ये सौ.रुपाली मोरे यांचा प्रथम क्रमांक आल्याने पैठणी भेट देण्यात आली. सौ.वैशाली डोखे भाग्यवान विजेत्यांमध्ये द्वितीय क्रमांक आल्याने चांदीची समई भेट देण्यात आली तर कुंभारी येथील सौ.सुरेखा वाल्मिक नीलकंठ यांची तृतीय क्रमांकाने भाग्यवान विजेत्या म्हणुन निवड झाली त्यांना सोन्याची नथ देण्यात आली. लकी ड्रॉच्या माध्यमातून इतर १० भाग्यवान विजेते निवडण्यात आले. त्यांना कालांश उद्योग समुहाकडून भेट वस्तू देण्यात आली. नाशिक येथील कपडा स्टॉल धारक छाया चौधरी यांनी ‘साई आश्रया’ आश्रमातील अनाथ मुला-मुलींचा रॅम्प वॉक शो पाहून त्यांचे कौतुक करत त्यांना ५० ड्रेस मोफत दिले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी सहकार उद्यमीच्या पदाधिकारी, समता महिला बचत गटाच्या महिला, शार्प इंजिनिअरिंग वर्क्सचे कर्मचारी, टॅबलॅब टेक्नोलॉजीचे कर्मचारी आदिंनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन समता महिला बचत गटाच्या रेणुका मुन्शी यांनी केले तर उपस्थितांचे आभार अगरबत्ती विभागाचे श्री.प्रदीप वैद्य यांनी मानले.