समता परिवाराचा गणेश चतुर्थी निमित्त अनोखा उपक्रम…
कोपरगाव : जगात मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा केला जात असतो. परंतु यामुळे सजीव सृष्टी वर काही अप्रत्यक्षरीत्या दुष्परिणामही होत असतात. पर्यावरणीय समतोल ढासळतो. त्यात प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात जल प्रदूषण, अनियमित पर्जन्य वृष्टी, तीव्र उष्णता यांसारख्या दुष्परिणामांना आपण सामोरे जात आहोत. पर्यावरणीय समतोल स्थिर राहावा, यासाठी समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या प्रत्येक शाखेत कोपरगाव तालुक्यातील संवत्सर येथील अबक कुटुंबीयांनी बनविलेल्या व महाराष्ट्र राज्य गो सेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा यांनी समता परिवार आयोजित सत्कार समारंभात केलेल्या आवाहनाप्रमाणे पर्यावरणपूरक गावरान गाईचे शेण व गोमूत्रापासून बनविलेल्या श्रीं ची प्राणप्रतिष्ठा करून पर्यावरणाचा समतोल ढासाळू नये यासाठी अनोखा उपक्रम राबविला आहे. हे गणपती नदीच्या पाण्यात आपोआप विरघळतात. त्यात गाईचे गोमूत्र असल्याने नदी देखील पवित्र होते. गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर पर्यावरण रक्षणाचा संकल्प देखील करत असल्याचे संस्थेचे जेष्ठ संचालक कांतीलाल हरलाल जोशी यांनी सांगितले.
गणेश चतुर्थी निमित्त समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या कोपरगाव शाखेत गावरान गाईच्या शेण व गोमूत्रापासून बनविण्यात आलेल्या पर्यावरणपूरक गणपतीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. त्या प्रसंगी ते बोलत होते. तसेच कोपरगाव शहरातील प्रसिध्द किराणा व्यापारी श्री.किरण व सौ.रोहिणी शिरोडे यांच्या हस्ते भक्तीमय वातावरणात श्रीं ची पूजा व आरती करण्यात आली.
ते पुढे म्हणाले की, दुष्काळाच्या छायेखाली गणरायाची आतुरतेने गणेश भक्त वाट पाहत होते. ती आतुरता आज पूर्ण झाली असून धार्मिकतेचे वातावरण तयार झाले आहे. धार्मिकतेत कोणत्याही प्रकारचे मोजमाप नसते, तर ती अमर्यादित स्वरूपाची असते. समता परिवार नेहमीच वेगवेगळे समाजोपयोगी उपक्रम राबवत असतो. हा उपक्रम देखील अनोख्या स्वरूपाचा असून मानवी जीवन आणि पर्यावरणाच्या दृष्टीने विशेष महत्त्वाचा आहे.
या वेळी समता नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन काका कोयटे, संचालक कांतीलाल जोशी, कोपरगाव शहरातील प्रसिध्द किराणा व्यापारी श्री.किरण व सौ.रोहिणी शिरोडे आदींसह जनरल मॅनेजर सचिन भट्टड, हर्षल जोशी, मुख्य कार्यालय व कोपरगाव शाखेतील अधिकारी, कर्मचारी, गणेश भक्त उपस्थित होते. उपस्थितांचे आभार कोपरगाव शाखेचे शाखाधिकारी योगेश मोरे यांनी मानले.