समता चॅरिटेबल ट्रस्ट आणि सोनतारा भन्साळी ट्रस्ट आयोजित व्याख्यान संपन्न
कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे
समता चॅरिटेबल ट्रस्ट आणि सोनतारा भन्साळी ट्रस्ट आयोजित व्याख्यान संपन्न
कोपरगाव : स्व.धनराज भन्साळी हे कोपरगाव तालुक्यातील प्रसिद्ध उद्योजक होते. त्यांनी व्यापाराच्या अनुषंगाने कोपरगाव शहराचा विकास करता करता जनविकासाचेही स्वप्न पाहिले होते.त्याअनुषंगाने सामाजिक दायित्वाच्या भूमिकेतून त्यांनी कोपरगावचा जनविकासही साधला.त्यामुळे ते एक समाजसेवक होते.असे प्रतिपादन सुप्रसिद्ध व्याख्याते व पानिपतकार श्री.विश्वासराव पाटील यांनी केले.
समता चॅरिटेबल ट्रस्ट व सोनतारा भन्साळी ट्रस्ट आयोजित स्व.धनराज भन्साळी यांच्या स्मरणार्थ व्याख्यानमालेचे ६ वे पुष्प च्या अनुषंगाने महाराष्ट्राचा धगधगता इतिहास : छत्रपती शिवराय ते पानिपत या विषयावर मराठी साहित्यातील प्रसिद्ध कादंबरीकार, पानिपतकार, व्याख्याते श्री.विश्वासराव पाटील यांचे व्याख्यान कोपरगाव शहरातील कलश मंगल कार्यालयात २० सप्टेंबर २०२२ रोजी आयोजित करण्यात आले होते.त्या प्रसंगी ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले की,समाजात अनेक वेगवेगळे फड असतात.मी महाराष्ट्राचा इतिहास महाराष्ट्रातील जनतेला समजण्यासाठी शब्दांचा फड तयार करून पानिपत ही कादंबरी तयार केली.पानिपत म्हणजे त्याग,निष्ठा. आजच्या तरुण पिढीने जगावे तर छत्रपती शिवाजी महाराजांसारखे आणि मरावे तर छत्रपती संभाजी महाराजांसारखे.महाराष्ट्राच्या इतिहासातील प्रत्येक जाती धर्मातील योद्धा हा मोती आहे.त्यामुळे आजही महाराष्ट्राचा इतिहासाच्या आठवणी या समाजातील विविध जाती धर्मामध्ये एकरूपपणे दिसाव्यात.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना काका कोयटे म्हणाले की, स्व.धनराज भन्साळी यांच्या स्मरणार्थ प्रत्येक वर्षी महाराष्ट्रातील विविध व्याख्यात्यांचे विविध विषयांवर व्याख्यान आयोजित केले जाते.मागील दोन वर्षापासून कोरोना असल्यामुळे व्याख्यानांची मेजवानी कोपरगावकरांना देता आली नाही,पण या वर्षी पानिपतकार श्री. विश्वासराव पाटील यांच्या रूपाने महाराष्ट्राचा धगधगता इतिहास : छत्रपती शिवराय ते पानिपत या विषयाच्या अनुषंगाने कोपरगावकरांना महाराष्ट्राच्या इतिहासाची ओळख होणार आहे.
प्रसंगी सुप्रसिद्ध व्याख्याते श्री. विश्वासराव पाटील, समता चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे, सोनतारा भन्साळी ट्रस्टचे अध्यक्ष श्री.अरविंद भन्साळी, उपाध्यक्ष श्री.संजयजी भन्साळी व व्याख्यानमालेचे संयोजक श्री.राजकुमार बंब यांच्या हस्ते दीप्रज्वलन करण्यात आले. प्रमुख पाहुण्यांचे स्वागत आणि परिचय श्री.राजकुमार बंब यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा सत्कार समता चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष काका कोयटे आणि सोनतारा भन्साळी ट्रस्टचे अध्यक्ष अरविंद भन्साळी, उपाध्यक्ष संजय भन्साळी यांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सौ. पूजा भन्साळी यांनी केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी समता चॅरिटेबल ट्रस्ट, समता पतसंस्था, सोनतारा भन्साळी ट्रस्टचे अधिकारी, कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाला कोपरगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. उपस्थितांचे आभार व्याख्यानमालेचे संयोजक श्री.राजकुमार बंब यांनी मानले.