पतसंस्था चळवळीला समता दीपस्तंभा सारखी – हेमंत पाटील, खासदार
कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे
पतसंस्था चळवळीला समता दीपस्तंभा सारखी – हेमंत पाटील, खासदार
कोपरगाव : समता नागरी सहकारी पतसंस्थेने ग्राहक, सभासदांमध्ये विश्वास निर्माण केला आहे. सभासदांमध्ये निर्माण केलेल्या विश्वासामुळे समता पतसंस्थेची प्रगती झाली आहे. ग्राहकांच्या या विश्वासावर संस्थेचे चेअरमन काका कोयटे यांची जिद्द, चिकाटी, नेतृत्वातून समता हजारो उड्डाणे गाठत आहे. त्यामुळे आर्थिक उन्नतीला पाठबळ देणाऱ्या पतसंस्था चळवळीला समता पतसंस्था दीपस्तंभासारखी असल्याचे गौरवोद्गार ग्राहक सन्मान सोहळ्याचे प्रमुख पाहुणे खासदार हेमंत पाटील यांनी काढले.
समता नागरी सहकारी पतसंस्था श्रीरामपूर शाखेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त श्रीरामपूर शाखेतील ग्राहक, सभासदांचा सन्मान सोहळा खासदार हेमंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत व समता पतसंस्थेचे चेअरमन ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाला. त्या वेळी ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, माणूस श्रीमंत हा फक्त पैशांनीच होतो असे नाही, तर कुटुंबीयांच्या कार्य, कर्तृत्वाने ही होत असतो. ती गर्भ श्रीमंती संदीप कोयटे यांच्या रूपाने काकांकडे आहे. संदीप कोयटे यांनी संस्थेचे संचालक म्हणून संस्थेचे प्रतिनिधित्व परदेशातही केले असून सुधन गोल्ड लोनच्या माध्यमातून राज्यातील पतसंस्थांना मार्गदर्शन करत आहे.
प्रमुख पाहुणे खासदार हेमंत पाटील यांचे स्वागत संस्थेच्या संचालक मंडळाच्या वतीने करण्यात आले तर चेअरमन काका कोयटे यांच्या हस्ते त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. तसेच उपस्थित मान्यवरांचा ही सत्कार संचालकांच्या हस्ते करण्यात आला.संस्थेचे संचालक संदीप कोयटे यांनी प्रास्ताविक केले.
प्रास्ताविकात संस्थेचे संचालक संदीप कोयटे यांनी समता पतसंस्था वापरत असलेल्या विविध अत्याधुनिक तंत्रज्ञान विषयक माहिती दिली. तसेच समता लिक्विडिटी बेस्ड प्रोटेक्शन स्कीम विषयी चित्रफिती द्वारा सादरीकरण करत संस्थेच्या ९९. ८१ टक्के ठेवीदारांच्या प्रत्येकी ३५ लाख रुपयापर्यंतच्या ठेवी पूर्णपणे सुरक्षित असल्याचे सांगितले. तसेच श्रीरामपूर शाखेच्या उद्घाटनाप्रसंगीच्या आठवणी सांगत श्रीरामपूरकरांनी १०८ कोटी रुपयांचा समतावर ठेवलेला विश्वास सार्थकी लावू असे सांगितले.
मनोगत व्यक्त करताना नांदेड येथील गोदावरी अर्बन को – ऑप. क्रेडिट सोसायटी अध्यक्षा सौ.राजश्री पाटील म्हणाल्या की, महाराष्ट्रात काका कोयटे पतसंस्था चळवळ रुजवत असून तिला भक्कम रूप देत आहे. हे आमच्यासारख्या सहकारी पतसंस्था चळवळीतील कार्यकर्त्यांसाठी अभिमानास्पद असून समता पतसंस्थेलाही त्यांनी त्यांच्या नेतृत्व गुणांनी सक्षम बनविले आहे. समता पतसंस्थेकडे पाहूनच आम्ही काम करत असतो. समता पतसंस्थेच्या या भरभराटीत संचालक मंडळाचे देखील सहकार्य तितकेच महत्त्वाचे आहे.
या वेळी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष सुरेश वाबळे, अहमदनगर जिल्हा सहकारी पतसंस्था स्थैर्य निधी संघाचे संचालक शिवाजी आप्पा कपाळे, रमेश झांबरे, फकीर शेठ पिपाडा, गोदावरी अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटी अध्यक्षा सौ.राजश्री पाटील, संगमनेर तालुका पतसंस्था फेडरेशन अध्यक्ष बापूसाहेब टाक, अकोले तालुका पतसंस्था फेडरेशन अध्यक्ष विठ्ठलराव चासकर, श्रीरामपूर तालुका पतसंस्था फेडरेशन अध्यक्ष वासुदेव काळे, राणीप्रसाद मुंदडा, श्रीमती राजश्री ससाणे, सौ.सुशीला नवले, अविनाश आदीक कोपरगाव नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा सौ.सुहासिनी कोयटे, संस्थेचे संचालक अरविंद पटेल, चांगदेव शिरोडे, संदीप कोयटे, गुलशन होडे कांतीलाल जोशी, जनरल मॅनेजर सचिन भट्टड, मुख्य कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी, श्रीरामपूर शाखेचे सभासद, हितचिंतक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. उपस्थितांचे आभार शाखाधिकारी फारुख शेख यांनी मानले.