सखी सर्कल आयोजित ‘मन स्त्रीचे’ व्याख्यान उत्साहात संपन्न
कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे

सखी सर्कल आयोजित ‘मन स्त्रीचे’ व्याख्यान उत्साहात संपन्न
सखी सर्कलच्या वतीने गुंफलेल्या पहिल्या पुष्पाला उपस्थित महिला समुदाय.
कोपरगाव : कोपरगाव शहरात महिलांसाठी नव्याने स्थापन केलेल्या सखी सर्कलच्या माध्यमातून पहिले पुष्प समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या समता सहकार सभागृहात गुंफले गेले असून आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपली भूमिका योग्य पद्धतीने साकारणाऱ्या संवेदनशील, सृजनशील स्त्रीच्या मनाचे विविध पैलू मार्गदर्शन पर व्याख्यानातून उलगडून दाखविण्यात आले.
मन म्हणजे मेंदूचा भाग जो विचार करतो. त्यातूनच विचार प्रकट होत असतात. त्यामुळे विचार, भावना व वर्तन हे सुसंगत असेल तरच व्यक्तिमत्व बहरत असते. तसेच या मार्गदर्शनपर व्याख्यानतून ‘झालं तर झालं नाही, तर नाही झालं’ अशा प्रकारचा गुरुमंत्र महिलांनी स्वीकारावा असे आवाहन डॉ.ओंकार जोशी यांनी केले.
व्याख्याते, प्रसिद्ध मानसोपचार तज्ञ डॉ.ओंकार जोशी यांनी सखी सर्कल आयोजित ‘मन स्त्रीचे’ या विषयावर अनमोल मार्गदर्शन केले. या व्याख्यानाला कोपरगाव शहरातील महिलांचा उस्फुर्त प्रतिसाद लाभला.
मन म्हणजे काय?, मनाचे ताण तणाव कसे ओळखावेत?, मनात येणाऱ्या नकारात्मक भावनांचा सामना कसा करावा?, मन प्रसन्न कसे ठेवावे? यासारख्या विविध प्रश्नांवर डॉ.ओंकार जोशी मार्गदर्शन करताना म्हणाले की, कुटुंबात निर्णय घेताना एकमेकांच्या भावनांना महत्त्व दिले पाहिजे. प्रत्येक स्त्रीने कुटुंबात एकमेकांच्या भावना, विचार, अपेक्षा यांचा आदर केला तर मन चांगले काम करते. भावना व विचारांचा गोंधळ झाला तर मनाचाही गोंधळ निर्माण होतो. त्रासदायक विचार आणि अधिक अपेक्षांमुळे मनाचा गोंधळ होऊन आयुष्यात ताण तणाव निर्माण होऊ न देणे ही कुटुंबातील सर्वांची जबाबदारी असते. पती – पत्नी मध्ये संवाद हा सतत असला पाहिजे.
या वेळी कोपरगाव नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा सौ.सुहासिनी कोयटे, कोपरगाव तालुका जेष्ठ नागरिक संघाच्या अध्यक्षा सौ. सुधाभाभी ठोळे, सौ.वृंदा कोऱ्हाळकर यांची प्रमुख उपस्थिती होती. सखी सर्कल संस्थापिका सौ.स्वाती कोयटे, सौ.सिमरन खुबाणी, सौ.पायल शहा, सौ.प्रिया अजमेरे, डॉ.सौ.गोंधळी, सौ.सोनल देवकर आदींसह सखी सर्कलच्या महिला सदस्यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले. व्याख्याते डॉ.ओंकार जोशी यांचे स्वागत व परिचय सखी सर्कलच्या सदस्या डॉ.रोशनी आव्हाड यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ.उमा भोईर यांनी केले.उपस्थितांचे आभार डॉ. सोनल वाबळे यांनी मानले.