भार्गेश्वर बॅनर्जी यांची समता पतसंस्थेला सदिच्छा भेट; संस्थेच्या कार्य पद्धतीचे कौतुक
कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे

भार्गेश्वर बॅनर्जी यांची समता पतसंस्थेला सदिच्छा भेट; संस्थेच्या कार्य पद्धतीचे कौतुक

कोपरगाव (अहिल्यानगर) : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे माजी मुख्य महाव्यवस्थापक आणि बँकिंग क्षेत्रात चार दशके अनुभवी असलेले ज्येष्ठ अधिकारी श्री.भार्गेश्वर बॅनर्जी यांनी नुकतीच राज्यातील अग्रगण्य अशी समता नागरी सहकारी पतसंस्था, कोपरगाव येथे सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी संस्थेच्या कार्य पद्धतीचा सविस्तर आढावा घेत संस्थेच्या आर्थिक सशक्ततेबाबत समाधान व्यक्त केले.

या भेटीदरम्यान संस्थेतील अत्याधुनिक सुविधा व नवोन्मेषी उपक्रमांची माहिती श्री.भार्गेश्वर बॅनर्जी यांना देण्यात आली. विशेषतः मोबाईल बँकिंग, पेपरलेस व व्हाउचरलेस व्यवहार पद्धती, ऑडिट कंट्रोल रूम, सोनेतारण कर्ज योजना, सेल्फ बँकिंग प्रणाली, रिकव्हरी मॉडेल इत्यादी बाबत सविस्तर माहिती संस्थेचे संचालक संदीप कोयटे व जनरल मॅनेजर सचिन भट्टड यांनी दिली. समता सहकार उद्योग मंदिर व्यवस्थापक विजय गोयल यांनी महिला बचत गटांच्या माध्यमातून सुरू असलेल्या सहकार उद्योग मंदिर या उपक्रमाची माहिती दिली.

संस्थेच्या सभागृहात आयोजित छोटेखानी स्वागत समारंभात श्री.भार्गेश्वर बॅनर्जी यांनी संस्थेची सहकार क्षेत्रातील पारदर्शकता, आर्थिक शिस्त आणि ग्राहकाभिमुख सेवेचे कौतुक केले. “समता पतसंस्थेने डिजिटल व्यवहारांचा स्वीकार करत नव्या तंत्रज्ञानाशी सुसंगत वाटचाल सुरू केली आहे, ही एक सकारात्मक व दिशादर्शक पायरी आहे,” असे गौरवोद्गार त्यांनी काढले.

ते पुढे म्हणाले, “इथे आल्यानंतर मला समता पतसंस्थेविषयी सविस्तर माहिती मिळाली. ती माहिती निश्चितच इतर पतसंस्थांसाठीही मार्गदर्शक ठरू शकते. मी इथे देण्यासाठी आलो होतो, पण इथून अधिक माहिती व अनुभव घेऊन जात आहे.


या प्रसंगी संस्थेचे चेअरमन ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे, जेष्ठ संचालक जितूभाई शहा यांनी श्री.भार्गेश्वर बॅनर्जी यांचे स्वागत केले. संस्थेच्या वतीने संचालक संदीप कोयटे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी श्री.भार्गेश्वर बॅनर्जी यांच्या सहकार विषयक सखोल जाणिवेचे मनःपूर्वक कौतुक केले. या वेळी सुधन गोल्ड लोनचे संचालक स्वप्निल घन उपस्थित होते.



