समताच्या नांदगाव शाखेत ग्राहक संवाद बैठक संपन्न ; ११०० कोटी ठेवींचा टप्पा पार, कर्जवाटप ८०० कोटी
कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे


समताच्या नांदगाव शाखेत ग्राहक संवाद बैठक संपन्न ; ११०० कोटी ठेवींचा टप्पा पार, कर्जवाटप ८०० कोटी

नांदगाव (प्रतिनिधी) : नाशिक जिल्ह्यातील नांदगाव येथील समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या शाखेत ग्राहक संवाद बैठक मोठ्या उत्साहात पार पडली. या बैठकीला समता पतसंस्थेचे चेअरमन ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांची प्रमुख उपस्थिती होती.

या प्रसंगी बोलताना चेअरमन काका कोयटे यांनी समता पतसंस्थेच्या कार्याची सविस्तर माहिती देत सांगितले की, संस्थेच्या ठेवी तब्बल ११०० कोटी रुपयांपर्यंत वाढल्या आहेत. त्यापैकी ८०० कोटी रुपयांचे कर्जवाटप झाले असून, यातील तब्बल ७० टक्के कर्जवाटप सुरक्षित समजल्या जाणाऱ्या सोनेतारण कर्जाच्या माध्यमातून झालेले आहे. कोपरगाव येथील मुख्य कार्यालय अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असून, राज्यातील अनेक पतसंस्थांचे प्रतिनिधी समताच्या कामकाजाचा अभ्यास करण्यासाठी येथे भेट देतात.

ते पुढे म्हणाले की, नाशिक जिल्ह्यातील नांदगावची बाजारपेठ वेगाने प्रगती करत आहे. येथील ग्राहकांनी ठेवलेल्या विश्वासामुळे मागील दोन वर्षांत कोणत्याही प्रकारची ठेव न स्वीकारता फक्त सोनेतारण कर्जातूनच १३ कोटी ५० लाख रुपयांचे कर्ज वाटप झाले आहे. अलीकडेच नांदगाव येथील सोनेतारण विस्तारित कक्षाला शाखेचा दर्जा मिळाल्यामुळे आता नांदगावकरांसाठी अधिक सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. “ग्राहकांनी सोनेतारणाबरोबरच आपल्या ठेवी समतामध्ये ठेवून सुरक्षिततेचा लाभ घ्यावा,” असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

या वेळी समता पतसंस्थेचे चेअरमन काका कोयटे यांचा सत्कार ग्राहक, सभासदांच्या वतीने प्रातिनिधिक स्वरूपात दयानंद पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच नांदगाव शाखेत श्री गणेशाची पूजा आणि आरती शाखेचे सभासद असलेले विलास राजोळे व सौ.सीमा राजोळे यांच्या हस्ते श्रींची आरती करण्यात आली.

या ग्राहक संवाद बैठकीला अतुलशेठ कलंत्री, अमितशेठ चांडक, दयानंद पाटील, वामन पोतदार, दिलीप लोढा, विजय चोपडा, सोमनाथ घोंगाणे, बाळासाहेब कवडे, शाम दुसाने, डॉ.उदय मेघावत, डॉ.अमित गादिया, दत्तात्रय वडनेरे, प्रवीण अग्रवाल, प्रकाश पाटील यांसह अनेक मान्यवर, सभासद, ठेवीदार व ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाखाधिकारी प्रसाद सोनार यांनी केले तर उपस्थितांचे आभार सोनेतारण अधिकारी गौरव जोशी यांनी मानले.




