समताच्या उभारणीतील प्रमुख शिल्पकाराचा अभिष्टचिंतन सोहळा उत्साहात
कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे

समताच्या उभारणीतील प्रमुख शिल्पकाराचा अभिष्टचिंतन सोहळा उत्साहात

कोपरगाव : समता नागरी सहकारी पतसंस्थेचे ज्येष्ठ संचालक जितूभाई शहा यांचा ७१ वा वाढदिवस संस्थेचे चेअरमन ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांच्या अध्यक्षतेखाली अभिष्टचिंतन सोहळ्याच्या रूपाने उत्साहात साजरा करण्यात आला. संस्थेच्या मुख्य कार्यालयात आयोजित कार्यक्रमाला संचालक, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गेल्या ३९ वर्षांपासून संस्थेच्या स्थापनेपासून जितूभाई शहा यांनी विविध जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडत संस्थेच्या सुख – दुःखात नेहमीच सहभागी राहिलेले आहेत. अधिकारी व कर्मचारी यांच्या सुखदुःखात ते नेहमीच सहभागी होत असून संस्थेच्या प्रगतीत त्यांचे योगदान मोलाचे असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

व्हा. चेअरमन अरविंद पटेल म्हणाले, “जितूभाई हे केवळ संचालक नसून संस्थेचे संकटमोचक आहेत. त्यांनी घेतलेले निर्णय नेहमीच संस्थेच्या हिताचे ठरले. त्यांच्या अनुभवाचा आणि शांत स्वभावाचा आम्हाला सातत्याने लाभ होत आहे.” संचालक संदीप कोयटे म्हणाले, “संस्थेच्या प्रत्येक टप्प्यावर जितूभाई यांची सकारात्मक आणि मार्गदर्शक भूमिका राहिली आहे. त्यांनी तरुण पिढीला शिस्त, पारदर्शकता आणि जबाबदारीची जाणीव करून दिली.”

ठेव विभाग प्रमुख संजय पारखे यांनी नमूद केले, “सभासदांचा विश्वास जपण्यात जितूभाई यांचे मोठे योगदान आहे. त्यांनी सुरक्षितता आणि आर्थिक शिस्त यांना नेहमीच प्राधान्य दिले.” कोपरगाव शाखाधिकारी योगेश मोरे म्हणाले, “जितूभाई यांचे साधेपण आणि कार्यतत्परता आम्हाला प्रेरणा देते. कर्मचाऱ्यांशी जिव्हाळ्याचे नाते जपत त्यांनी संस्थेचा परिवार अधिक मजबूत केला आहे.”

यावेळी संचालक कचरू मोकळ, दीपक अग्रवाल, गिरीश सोनेकर, जनरल मॅनेजर सचिन भट्टड तसेच मुख्य कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन एच. आर. उज्वला बोरावके यांनी केले. शेवटी जितूभाई शहा यांनी सर्वांच्या शुभेच्छांबद्दल आभार मानत संस्थेच्या प्रगतीसाठी पुढे ही समता सोबत राहणार असल्याचे सांगितले.


