पतसंस्थांना सक्षम करण्यासाठी ठोस संरक्षणाची गरज – काका कोयटे
कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे


पतसंस्थांना सक्षम करण्यासाठी ठोस संरक्षणाची गरज – काका कोयटे
पारनेर : पतसंस्था चळवळ ही ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असून, सर्वसामान्य नागरिकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे महत्त्वपूर्ण काम या संस्थांच्या माध्यमातून होत आहे. बदलत्या काळानुसार पतसंस्थांनी आपल्या कार्यपद्धतीत सुधारणा करून व्यवस्थापन अधिक सक्षम, पारदर्शक आणि आधुनिक करणे गरजेचे आहे. त्यासाठी अशा प्रशिक्षण कार्यशाळा अत्यंत उपयुक्त ठरतात, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे कार्यकारी अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांनी केले.
महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन, नाशिक विभागीय नागरी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था फेडरेशन, पारनेर तालुका पतसंस्था फेडरेशन आणि जिल्हा उपनिबंधक कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने पारनेर येथे पतसंस्थांच्या एकदिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी राज्य फेडरेशन कार्यकारी अध्यक्ष काका कोयटे मार्गदर्शन करत होते. आमदार काशिनाथ दाते यांच्या हस्ते या एक दिवसीय कार्यशाळेचे उद्घाटन झाले.
अहिल्यानगर जिल्हा ही सहकाराची पंढरी म्हणून ओळखली जाते. या जिल्ह्यात पतसंस्थांची मोठी चळवळ उभी राहिली असून, हजारो नागरिकांच्या आर्थिक जीवनाला या संस्थांनी आधार दिला आहे. ठेवीदारांचा विश्वास कायम ठेवण्यासाठी संस्थांचे आर्थिक व्यवस्थापन, कर्जवसुली, ऑडिट, संचालक मंडळाची कार्यक्षमता आणि सायबर सुरक्षा या सर्व बाबींना समान महत्त्व देणे आवश्यक आहे.- काका कोयटे
पतसंस्थांसमोरील आव्हाने दिवसेंदिवस बदलत आहेत. त्यामुळे केवळ पारंपरिक पद्धतीने काम करून चालणार नाही. नवीन कायदे, नियम, तंत्रज्ञान आणि बदलती आर्थिक परिस्थिती यांचा अभ्यास करून संस्थांनी स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडवून आणले पाहिजेत. प्रशिक्षणाच्या माध्यमातून संचालक, अधिकारी आणि कर्मचारी यांना अद्ययावत ज्ञान मिळाल्यास त्याचा थेट फायदा संस्थांच्या कामकाजाला आणि सभासदांना होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
उद्घाटनप्रसंगी आमदार काशिनाथ दाते यांनी पतसंस्थांच्या ठेवींना राज्य सरकारकडून संरक्षण मिळण्याची गरज व्यक्त केली. ते म्हणाले की, पारनेर तालुक्यातील नागरिक नोकरी व व्यवसायानिमित्त बाहेर राहून कमावलेली रक्कम पतसंस्थांमध्ये ठेवींच्या माध्यमातून ठेवतात. त्यामुळे या संस्थांना मोठे आर्थिक बळ मिळाले आहे. या ठेवींना राज्य सरकारकडून संरक्षण मिळाल्यास नागरिकांचा विश्वास आणखी वाढेल आणि पतसंस्था चळवळीला मोठे बळ मिळेल.
सहकार हा राजकारणाचा अड्डा नसून सर्वसामान्यांच्या आर्थिक विकासाचे प्रभावी माध्यम आहे. राजकीय आकसातून पतसंस्थांना अडचणीत आणण्याचे प्रयत्न होणे निषेधार्ह आहे. सहकार क्षेत्राच्या विकासासाठी आपण सकारात्मक भूमिका घेत राहू, असे दाते यांनी सांगितले. – आमदार काशिनाथ दाते
नाशिक विभागीय नागरी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थांचे फेडरेशनचे अध्यक्ष वसंत लोढा म्हणाले की, पारनेर तालुक्यातील पतसंस्थांमध्ये ठेवींचे प्रमाण मोठे असून, प्रतिकूल परिस्थितीतही अनेक संस्थांनी एनपीए नियंत्रणात ठेवला आहे. भविष्यात एकही पतसंस्था बंद पडणार नाही, असा संकल्प त्यांनी या वेळी व्यक्त केला.
कार्यशाळेत माजी सहनिबंधक तानाजी कवडे यांनी सुधारित गुणपत्रिका, माफ दंड तसेच संचालकांची कर्तव्ये व जबाबदाऱ्यांबाबत मार्गदर्शन केले. काका कोयटे यांनी कलम १०१ वसुली नियोजन, भास्कर बांगर यांनी ऑडिट व्यवस्थापन, तर सायबर तज्ज्ञ अथर्व भाबुरकर यांनी सायबर सुरक्षा या विषयांवर मार्गदर्शन केले. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शंका-समाधान व चर्चासत्रही घेण्यात आले.
यावेळी सहाय्यक निबंधक विशाल दाते, नाशिक विभागीय फेडरेशनचे कार्याध्यक्ष वसंतराव कवाद, शिवाजी मोरे, सोपान भाकरे, नामदेवराव थोरात, उदय अनभूले आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक वसंतराव कवाद यांनी केले. स्वागत व सुत्रसंचालन सुदाम म्हस्के यांनी केले. बाबासाहेब कवाद, दत्तात्रय लंके व सुभाष थोरात यांनी आभार मानले.



