पतसंस्थांनी आधुनिकतेची कास धरून सायबर सुरक्षेला प्राधान्य द्यावे – आमदार मोनिकाताई राजळे
कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे


पतसंस्थांनी आधुनिकतेची कास धरून सायबर सुरक्षेला प्राधान्य द्यावे – आमदार मोनिकाताई राजळे
पाथर्डी : पतसंस्था या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असून, बदलत्या आर्थिक आणि तांत्रिक परिस्थितीशी जुळवून घेत आधुनिक कार्यपद्धती स्वीकारणे गरजेचे आहे. सभासदांचा विश्वास कायम ठेवण्यासाठी पारदर्शक कारभार, प्रभावी कर्ज व्यवस्थापन, कर्जवसुलीबरोबरच सायबर सुरक्षिततेला प्राधान्य देण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन शेवगाव-पाथर्डी मतदारसंघाच्या आमदार श्रीमती मोनिकाताई राजळे यांनी केले.
“पतसंस्थांच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिक, छोटे व्यावसायिक, उद्योजक आणि ग्रामीण भागातील घटकांना आर्थिक आधार मिळतो. त्यामुळे संचालक व कर्मचाऱ्यांनी केवळ आर्थिक व्यवहारापुरते मर्यादित न राहता सभासदांशी विश्वासाचे नाते निर्माण केले पाहिजे. काळानुरूप तंत्रज्ञानाचा स्वीकार करून पतसंस्थांच्या सेवा अधिक सक्षम, गतिमान आणि सुरक्षित करणे आवश्यक आहे. प्रशिक्षणातून मिळणारे नवीन ज्ञान प्रत्यक्ष कामकाजात उपयोगात आणल्यास पतसंस्थांची कार्यक्षमता निश्चितच वाढेल.- काका कोयटे, कार्यकारी अध्यक्ष, राज्य फेडरेशन”
शेवगाव-पाथर्डी तालुक्यातील नागरी व ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थांचे संचालक मंडळ, अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी आयोजित एकदिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे कार्यकारी अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री मोहटादेवी सांस्कृतिक सभागृह, श्री क्षेत्र मोहटादेवी मंदिर परिसर, पाथर्डी येथे कार्यशाळा उत्साहात पार पडली.

अहिल्यानगर येथील नाशिक विभागीय नागरी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थांचे फेडरेशन, महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन आणि शेवगाव-पाथर्डी तालुका पतसंस्था फेडरेशन, अहिल्यानगर जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच नाशिक जिल्हा विभागीय फेडरेशनचे अध्यक्ष वसंत लोंढा यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यशाळेत अर्थतज्ज्ञ डॉ. प्रशांत भालेराव यांनी सायबर व मार्केटिंग व्यवस्थापनाबाबत माहिती दिली. संवाद कौशल्य, व्यक्तिमत्त्व विकास, यश, नेतृत्व आणि करिअरची गुरुकिल्ली या विषयावर अनिरुद्ध देवचके यांनी मार्गदर्शन केले.उद्घाटनप्रसंगी जिल्हा उपनिबंधक श्री. मंगेश सुरवसे, सहाय्यक निबंधक श्री. गोकुळ नांगरे, सहाय्यक निबंधक श्री. अमोल माने तसेच सहकार क्षेत्रातील विविध पदाधिकारी उपस्थित होते.

पतसंस्थांच्या दैनंदिन कामकाजात आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, कर्जवाटपातील योग्य व्यवस्थापन, थकीत कर्जांच्या वसुलीसाठी नियोजन, सायबर सुरक्षेबाबत दक्षता, सभासदांशी प्रभावी संवाद आणि बदलत्या आर्थिक वातावरणाशी जुळवून घेण्याच्या विविध बाबींवर प्रशिक्षण देण्यात आले.

दिवसभराच्या प्रशिक्षणानंतर काका कोयटे यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत प्रश्नोत्तर व शंका समाधानाचे सत्र घेण्यात आले. शेवगाव-पाथर्डी परिसरातील पतसंस्थांच्या संचालक, अधिकारी व कर्मचाऱ्यांना विविध विषयांतील तज्ज्ञांचे मार्गदर्शन एकाच व्यासपीठावर मिळाल्याने कार्यशाळेला १२० सहकारी पतसंस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.



