कोयटे विद्यालयातील बाल कृष्णांनी फोडली दहीहंडी…
कोपरगाव : दहीहंडी हा बाल गोपाळांचा आवडता खेळ आहे. श्रीकृष्ण देखील आपल्या सवंगड्यांना एकत्र जमवून दही खाण्याचे उद्देशाने दहीहंडी फोडून त्यातील दही खाण्याचा आनंद लुटत असे. दहीहंडी फोडण्यात श्रीकृष्णाच तरबेज असल्याने अधिकाधिक दही श्रीकृष्णालाच खायला मिळत असे. त्यामुळे आज ही श्रीकृष्णाचा जन्म दिवस श्रीकृष्ण जन्माष्टमी म्हणून साजरा करून त्या दिवशी प्रत्येक ठिकाणी दहीहंडी फोडण्याचा उपक्रम आयोजित केला जातो. या उपक्रमाच्या निमित्ताने कृष्णाच्या लीलांचे दर्शन घडविले जात असल्याचे कोयटे विद्यालय शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य बाबासाहेब सालके यांनी मार्गदर्शन पर मनोगतात सांगितले.
समता चॅरिटेबल ट्रस्ट व समता नागरी सहकारी पतसंस्था संचलित निवारा परिसरातील स्व.दादाप्पा खंडाप्पा कोयटे विद्यालयात श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त दहीहंडी उत्सव उत्साहात संपन्न झाला.या वेळी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी श्रीकृष्णाचा व विद्यार्थिनींनी राधेची वेशभूषा धारण केलेली होती. श्रीकृष्णाचा वेश परिधान केलेल्या कृष्णांची डोळ्यांवर पट्टी बांधून दहीहंडी फोडण्याची स्पर्धा घेण्यात आली. त्यात बालवाडीतील अमन मोहसिन शेख याने दहीहंडी फोडत ही स्पर्धा जिंकली. स्पर्धा जिंकलेल्या अमन शेख याचा सौ.मीनाताई व्यास, सौ.ज्योत्सनाताई पटेल, सौ.शोभाताई भावसार यांच्या हस्ते श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच मुलींनी राधाच्या वेशभूषेत गरबा , दांडिया खेळण्याचा आनंद लुटला.
या वेळी शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य मधुकर मोरे, बाबासाहेब सालके, सौ.मीनाताई व्यास, सौ. ज्योत्सनाताई पटेल, सौ.शोभाताई भावसार, शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी, पालक, परिसरातील नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शिक्षिका सौ.मनिषा कांबळे यांनी केले. दहीहंडी उत्सव यशस्वीतेसाठी शिक्षिका सौ.स्वप्नाली महिरे, सौ.जागृती ठाकूर, सौ.छाया ओस्तवाल, सौ.नाजमिन अत्तार,सौ.तृप्ती कासार, कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले. उपस्थितांचे आभार मुख्याध्यापिका सौ.आशा मोकळ यांनी मानले.