समता इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांचे शिव जयंतीनिमित्त स्वच्छता अभियान आणि वृक्षारोपण
समता वार्ता कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे
समता इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांचे शिव जयंतीनिमित्त स्वच्छता अभियान आणि वृक्षारोपण
कोपरगाव : समता इंटरनॅशनल स्कूल गुणवत्तापूर्ण आंतरराष्ट्रीय स्तरावरील शिक्षण पद्धती अवलंबणारी महाराष्ट्रातील विद्यार्थी केंद्रीत शिक्षण संस्था आहे.समता स्कूल विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने शिक्षणाबरोबर नेहमीच आगळे-वेगळे उपक्रम राबवत असते. १९ फेब्रुवारी हा दिवस संपूर्ण जगात शिव जन्मोत्सव म्हणून साजरा केला जातो.या दिनाचे औचित्य साधून या वर्षी पहिल्यांदाच समता इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी येवला तालुक्यातील ऐतिहासिक स्थळ असलेल्या अंकाई या किल्ल्यावर जाऊन तेथे स्वच्छता अभियान राबविले,वृक्षारोपण करत शिवजयंती साजरी केली.नेहमीच शिवजयंतीच्या दिवशी त्यांच्या प्रतिमेचे पूजन केले जाते.मिरवणूका काढल्या जातात. पण यापेक्षा विद्यार्थ्यांना शिवाजी महाराजांचा इतिहास समजावा,त्यांची शिकवण,तत्व,विचार विद्यार्थ्यांमध्ये रुजवावेत तसेच शिवाजी महाराजांनी जिंकलेल्या गड-किल्ल्यांचे संवर्धन करणे काळाची गरज बनली आहे हा उद्देश प्रामुख्याने उपक्रमाचा होता.समताच्या विद्यार्थ्यांचा हा उपक्रम कौतुकास्पद असून इतरांनाही दिशादर्शक ठरेल असा आहे.या उपक्रमामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेले ऐतिहासिक किल्ले,वास्तू आदींचे संवर्धन होणार असून भविष्यात निर्माण होणाऱ्या अस्मानी संकटांपासून सुरक्षितता मिळणार असल्याची माहिती समता इंटरनॅशनल स्कूलच्या मॅनेजिंग ट्रस्टी सौ स्वाती संदीप कोयटे यांनी दिली.
अंकाई किल्यावर राबविण्यात आलेले स्वच्छता अभियान व वृक्षारोपण या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.समता स्कूलने राबविलेल्या या उपक्रमाबद्दल विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त करत अशा प्रकारचे आगळे-वेगळे उपक्रम राबवावेत अशी इच्छा व्यक्त केली.विद्यार्थ्यांना या उपक्रमासाठी शैक्षणिक संचालिका सौ लिसा बर्धन व उपप्राचार्य श्री समीर अत्तार यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.उपक्रम यशस्वीतेसाठी समता स्कूलच्या शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.