समता इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थिनींनी साजरा केला रस्त्यावरील खड्ड्यात वृक्षारोपण करून महिला दिन
समता वार्ता कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे
समता इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थिनींनी साजरा केला रस्त्यावरील खड्ड्यात वृक्षारोपण करून महिला दिन
कोपरगाव – कोपरगावातील पुणतांबा रोड अतिशय वर्दळीचा व जड वाहतुकीचा रस्ता आहे. पुणतांबा चौफुली ते समृद्धी tuh महामार्ग हा रस्ता अतिशय खराब झालेला आहे. या रस्त्यावर मोठ्मोठ्ठे खड्डे पडलेले आहे. या खड्यात समता इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थिनींनी व महिला शिक्षिकांनी वृक्षारोपण करून अभिनव पद्धतीने ‘महिला दिन’ साजरा केला.
या बाबत अधिक माहिती देतांना स्कूलच्या प्राचार्या लिसा बर्धन म्हणाल्या कि,‘आमच्या स्कूलच्या विद्यार्थिनी, शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांच्या किमान १००० मुले-मुली व कर्मचाऱ्यांची वाहतूक या रस्त्यावरून दररोज असते. स्कूलची २५ ते ३० वाहने या रस्त्यावरून प्रवास करतात. पूर्वी पुणतांबा चौफुली ते समता इंटरनॅशनल स्कूल पर्यंत यायला केवळ २ ते ३ मिनिट लागत असत आता किमान २५ ते ३० मिनिटे वेळ लागतो. या प्रवासात स्कूलच्या विद्यार्थ्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागतो. स्कूल बस रस्त्यावरून जात असताना आजूबाजूच्या वाहनांना अपघात होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. तसेच खोल-खोल खड्यांमुळे वाहने आदळत,आपटत येतात त्यामुळे प्रसंगी पुढे एकमेकांच्या अंगावर पडतात. मुलांना धुळीचा प्रचंड त्रास होतो व येण्याचा व जाण्याच्या जास्तीच्या लागणाऱ्या वेळेमुळे विद्यार्थ्यांचा अर्धा तास अभ्यासाचा वेळ दररोज वाया जातो.
यापूर्वी आमच्या व्यवस्थापनाने सन्माननीय लोक प्रतिनिधी तसेच प्रशासनास अनेकदा मागणी करून देखील या रस्त्याचे काम सुरु झाले नाही. त्यामुळे हे अभिनव आंदोलन आम्हाला करावे लागले. या आंदोलनाने प्रशासनास जाग न आल्यास उग्र स्वरूपाचे आंदोलन सर्व विद्यार्थ्यांना करावे लागेल याची प्रशासनाने दखल घ्यावी.
वृक्षारोपण करताना स्कूलची विद्यार्थिनी राजहंस मंदार आढाव, योगिता रामनाथ वाघ,अनुष्का प्रीतम जपे,ईप्सीता संदीप राय,अनुष्का प्रीतम जपे यांनी तीव्र भावना व्यक्त केल्या. कु.राजहंस मंदार आढाव म्हणाली कि, ‘आम्हा विद्यार्थिनींचा दररोज किमान अर्धा तास अभ्यासाचा वेळ वाया तर जातोच, परंतु या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे व रस्त्यावर असलेल्या धुळीमुळे आम्हा मुलांचा आरोग्याचा प्रश्न देखील निर्माण झालेला आहे. शासन व प्रशासन यांना या रस्त्याचे काम करता येत नसेल तर हा रस्ता जड वाहतुकीसाठी बंद करून या रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये आम्हाला वृक्षारोपण करण्याची परवानगी द्यावी.’
तसेच विद्यार्थिनी कु.योगिता रामनाथ वाघ याबाबत बोलतांना म्हणाली कि, ‘या रस्त्यावर समृद्धी महामार्ग तयार होतो आहे हि आनंदाची बाब आहे परंतु समृद्धी महामार्ग तयार करताना होणाऱ्या प्रचंड जड वाहतुकीमुळे या रस्त्यांवर मोठमोठ्या खड्ड्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे समृद्धी महामार्ग तयार करणाऱ्या कंपनीने या रस्त्यांची दुरुस्ती तातडीने करण्यासाठी प्रशासनास आदेश द्यावेत.
कु.अनुष्का प्रीतम जपे म्हणाली की,महाराष्ट्रातील हजारो किलोमीटरच्या असलेल्या रस्त्यांपैकी सर्वात जास्त खराब असलेला रस्ता म्हणुन या रस्त्याची ओळख निर्माण झाली आहे ही अतिशय वाईट बाब आहे.
कु.ईप्सीता राय म्हणाली कि, ‘समृद्धी महामार्गाचे कंपनीने काम करावे किंवा प्रशासनाने करावे परंतु पुढील १५ दिवसाच्या आत या रस्त्याचे काम न झाल्यास आम्हा मुलांना देखील रस्ता रोको किंवा इतर मार्गाचा अवलंब करावा लागेल, आमच्यावर ती वेळ शासनाने येऊ देऊ नये हि विनंती. या खड्यांमध्ये वृक्षारोपण करण्यासाठी आम्ही मा.तहसीलदार,मा.आमदार, सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी यांना देखील निमंत्रण दिले होते. परंतु शासन किंवा प्रशासन यांनी आमचे निमंत्रण न स्वीकारून तसेच आमच्या पत्राची कोणतीही दाखल न घेऊन महिला दिनाच्या निमित्ताने आम्हा महिला वर्गाचा विशेषतः विद्यार्थिनींचा अवमान केलेला आहे.’
या प्रसंगी कोकमठाण, सडे, शिंगवे परिसरातील नागरिक यांनी देखील या रस्त्याच्या दुरुस्ती बाबत आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या.