ब्रेकिंग

लिंगायत प्रीमियर लीग तरुणांना सामाजिक कार्यात आणणारा उपक्रम – श्री.मंगेश चिवटे, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष अधिकारी

कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे

लिंगायत प्रीमियर लीग तरुणांना सामाजिक कार्यात आणणारा उपक्रम – श्री.मंगेश चिवटे , मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष अधिकारी

कोपरगाव : वीरशैव लिंगायत समाजातील तरुण वर्गाला लिंगायत प्रीमियर लीग द्वारा एकत्र आणून सामाजिक कार्यात आणण्याचे महत्त्वपूर्ण काम वीरशैव लिंगायत समाजाचे मार्गदर्शक काका कोयटे यांनी या उपक्रमातून सुरू केलेले आहे. बदलत्या काळाच्या दृष्टीने समाजातील तरुण वर्ग संघटित करून समाजाची प्रगती करण्याचे हे एक उत्कृष्ट माध्यम आहे. तसेच कोणत्याही व्यसनाच्या आहारी न जाता समाजातील प्रत्येक तरुण हा शारीरिक दृष्ट्या सक्षम बनविण्याचा चांगला प्रयत्न आहे. तसेच वीरशैव लिंगायत समाजातील तरुण खेळाडूंना क्रिडा क्षेत्रात करियर करण्याची संधी मिळणार असल्याचे महाराष्ट्र राज्य वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष अधिकारी श्री.मंगेश चिवटे यांनी सांगितले.

वीरशैव इंटरनॅशनल असोसिएशन आणि लिंगायत संघर्ष समितीच्या वतीने भव्य स्वरूपात कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथील समता इंटरनॅशनल स्कूलच्या क्रिडांगणावर आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय महाराष्ट्र लिंगायत प्रीमियर लीगच्या बक्षीस वितरणा प्रसंगी प्रमुख पाहुणे महाराष्ट्र राज्य वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष अधिकारी श्री.मंगेश चिवटे बोलत होते.

ते पुढे म्हणाले की , महाराष्ट्रातील वीरशैव लिंगायत समाजाच्या विविध प्रश्नांबाबत महाराष्ट्र शासनाकडे पाठपुरावा करून त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करू त्यातील प्रामुख्याने वीरशैव लिंगायत समाजातील सर्व पोट जातींना ओबीसी आरक्षण मिळणे, जगदज्योती महात्मा बसवेश्वर यांची कर्मभूमी असलेल्या मंगळवेढा येथे बसवेश्वरांचा स्मारक उभारण्यासाठी मंजूर झालेला निधी तातडीने अदा करणे, लिंगायत समाजातील आर्थिक दुर्बल सुशिक्षित बेरोजगार यांच्यासाठी महामंडळ स्थापन करून निधी उपलब्ध करून देणे, समाजातील मठ देवस्थानच्या मालकीच्या अभयावती रुपयांच्या जमिनीबाबत विशेष कायदा करणे, मरणोत्तर दफन विधीसाठी प्रत्येक गावात वैकुंठ धाम निर्माण करण्यासाठी जमीन उपलब्ध करून देत त्यांच्या शिवशोभीकरणासाठी निधी उपलब्ध करून देणे आदी मागण्यांना महाराष्ट्र शासनाचे विशेष पाठबळ देण्याचा प्रयत्न करणार आहे.

लिंगायत प्रीमियर लीगचा अंतिम सामना कोकण विभागातील वीरशैव युवा कोकण विरुद्ध सोलापूर जिल्ह्यातील होंडा कायझन वॉरियर्स यांच्यात प्रत्येक चेंडूवर उत्कंठा वाढविणारा झाला. या अंतिम सामन्यात वीरशैव युवा कोकण संघाला विजेतेपद मिळाले असून प्रथम क्रमांकाचे १ लाख रुपयाचे बक्षीस व ट्रॉफी तर होंडा कायझन वॉरियर्स संघाला उपविजेत्या पदावर समाधान मानत द्वितीय क्रमांकाचे ५१ हजार रुपयांचे बक्षीस व ट्रॉफी देण्यात आली. वीरशैव युवा कोकणचा श्री.ऋषिकेश जंगम याला मालिका वीराचा किताब देण्यात आला.होंडा कायझन वॉरियर्सच्या श्री.विशाल झुमोळे याला उत्कृष्ट फलंदाज तर शुभम मतपाटे याला उत्कृष्ट गोलंदाज म्हणून घोषित करण्यात आले.

वीरशैव लिंगायत समाजातील खेळाडूंसाठी २७ व २८ मे २०२३ रोजी आगळा – वेगळा उपक्रम आणि फक्त ८ षटकांचा सामना व संघातील ५ गोलंदाज मिळून ८ षटके टाकतील अशा अनोख्या पद्धतीच्या लिंगायत प्रीमियर लीगमध्ये महाराष्ट्रातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पनवेल, ठाणे, मुंबई, नवी मुंबई, नाशिक, जळगाव, अहमदनगर, संभाजीनगर, जालना, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली या २० जिल्ह्यातील संघांनी सहभाग नोंदविलेल्या तसेच दि विश्वेश्वर सहकारी बँक, पुणे , उस्मनाबाद जिल्ह्यातील कळंब येथील श्री.राजाभाऊ मुंडे, राहुरी येथील साई आदर्श पतसंस्था, माजलगाव येथील मंगलनाथ पतसंस्था, नाशिक येथील श्री.गणेश भोरे, श्री.ओंकार खुरपे यांचे प्रायोजकत्व लाभलेल्या राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे शिवसेना नेते व माजी खासदार श्री.चंद्रकांत खैरे व चिखली येथील माजी आमदार श्री.राहुल बोंद्रे यांच्या हस्ते करण्यात आले. स्पर्धेतील विजेत्यांना प्रमुख पाहुणे महाराष्ट्र राज्य वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष अधिकारी श्री.मंगेश चिवटे, अहमदनगर जिल्ह्याचे अप्पर जिल्हाधिकारी श्री.सुहास मापारी यांच्या शुभहस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. तसेच स्पर्धेच्या सुरुवातीपासून ते समारोपापर्यंत समता इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने केलेल्या कौतुकास्पद आदरातिथ्याबद्दल सौ.स्वाती मापारी यांच्या हस्ते समता इंटरनॅशनल स्कूलच्या कार्यकारी विश्वस्त सौ. स्वाती कोयटे यांचा सत्कार करण्यात आला. स्पर्धेच्या उद्घाटनाप्रसंगी नाशिक विभागाचे श्री.सुधीर भुसारी यांनी लिंग पूजनाचे पौराहित्य कसे करावे ? या विषयी उपस्थित खेळाडूंना सविस्तर माहिती दिली. वीरशैव इंटरनॅशनल असोसिएशनचे अध्यक्ष काका कोयटे यांनी प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करून कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.

ते म्हणाले की, महाराष्ट्रात पहिल्यांदाच या प्रकारची स्पर्धा घेण्यात आली असून एक आगळा वेगळा उपक्रम समाजातील तरुण खेळाडूंसाठी राबविलेला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वीरशैव लिंगायत समाजातील तरुणांनी एकत्र येऊन सामाजिक, वैचारिक देवाण-घेवाण करतील तसेच सामाजिक कार्यातही मोठ्या प्रमाणात पुढाकार घेतील.वीरशैव इंटरनॅशनल असोसिएशन व लिंगायत संघर्ष समितीच्यावतीने समाजातील तरुणांसाठी लिंगायत प्रीमियर लीगच्या माध्यमातून एक रोपटे लावलेले असून महाराष्ट्रातील इतर वीरशैव लिंगायत समाजाच्या सामाजिक संघटना, कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन वाढवावे आणि क्रिडा क्षेत्रात वीरशैव लिंगायत समाजाचे नाव उंचावण्याची संधी तरुणांना उपलब्ध करून द्यावी.अशी अपेक्षा व्यक्त केली.

तसेच लिंगायत संघर्ष समितीचे अध्यक्ष श्री.सुनिल रुकारी म्हणाले की , २०१४ साली लिंगायत संघर्ष समितीच्यावतीने आंदोलन केले होते.त्यात वीरशैव लिंगायत समाजातील १४ पोट जातींना आरक्षण मिळाले होते. त्या वेळी मंगेश चिवटे यांचे मोलाचे सहकार्य लाभले होते. या वेळी ही त्यांनी समाजातील उर्वरित पोट जातींना आरक्षण मिळविण्यासाठी तसेच इतर प्रश्न सोडविण्यासाठी महत्त्वाची भूमिका घ्यावी.

अप्पर जिल्हाधिकारी श्री.सुहास मापारी मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त करताना म्हणाले की , समता इंटरनॅशनल स्कूलमध्ये वीरशैव लिंगायत समाजातील तरुण लिंगायत प्रीमियर लीगच्या माध्यमातून एकत्र आले, हे भविष्यातील समाजाच्या प्रगतीच्या दृष्टीने सकारात्मक संकेत आहे. हा उपक्रम कौतुकास्पद असून लिंगायत समाजातील तरुणांना दिशा देणारा आहे. तसेच वीरशैव लिंगायत समाजातील लिंगायत प्रीमियर लीग ही महाराष्ट्रातील पहिली लीग आहे. या लीगची सुरुवात अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातून झाली असून पुढील वर्षी आम्ही पुण्यात या लीगचे आयोजन करणार असल्याचे दि विश्वेश्वर सहकारी बँकेचे चेअरमन श्री.अनिल गाढवे यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन युथ विंग वीरशैव इंटरनॅशनल असोसिएशनचे अध्यक्ष श्री.प्रदीप साखरे यांनी केले. कार्यक्रमाला अहमदनगर जिल्ह्याचे अप्पर जिल्हाधिकारी श्री.सुहास मापारी, सौ.स्वाती मापारी, महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष प्रमुख श्री.मंगेश चिवटे, दि विश्वेश्वर सहकारी बँकेचे चेअरमन श्री.अनिल गाढवे , उद्योजक श्री.सागर रुकारी , समता इंटरनॅशनल स्कूलच्या कार्यकारी विश्वस्त सौ.स्वाती कोयटे , वीरशैव इंटरनॅशनल असोसिएशनचे अध्यक्ष काका कोयटे, लिंगायत संघर्ष समितीचे अध्यक्ष श्री.सुनिल रुकारी , उपाध्यक्ष श्री.राजाभाऊ मुंडे , महासचिव श्री.भगवान कोठावळे, उपाध्यक्ष श्री.अनिल रुद्रके, कोषाध्यक्ष श्री. श्रीकांत तोडकर, लिंगायत प्रीमियर लीगचे संयोजक श्री.चंद्रशेखर दंदने आदींसह २० जिल्ह्यातून आलेल्या संघांचे मालक, मॅनेजर, प्रशिक्षक, खेळाडू मोठया प्रमाणात उपस्थित होते.प्रसंगी वीरशैव लिंगायत समाजातील वेगवेगळ्या क्षेत्रातील नामवंत व्यक्तींनी प्रीमियर लीगला सदिच्छा भेट देऊन शुभेच्छा देत आयोजनाबद्दल आयोजकांचे कौतुक केले. यशस्वीतेसाठी श्री.प्रदीप साखरे, श्री.चंद्रशेखर दंदने, श्री. सतीश निळकंठ कोपरगाव तालुका लिंगायत संघर्ष समितीचे अध्यक्ष श्री.अमोल राजूरकर, श्री.राजेश सावतडकर आदींसह समता इंटरनॅशनल स्कूलचा क्रिडा विभाग , वाहतूक विभाग, वसतिगृह विभाग, आस्वाद भोजन मेस विभाग आदींनी विशेष परिश्रम घेतले. उपस्थितांचे आभार लिंगायत संघर्ष समितीचे अध्यक्ष श्री.सुनिल रुकारी यांनी मानले.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे