राष्ट्रीय क्रिडा दिन समता इंटरनॅशनल स्कूलमध्ये उत्साहात संपन्न
कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे
राष्ट्रीय क्रिडा दिन समता इंटरनॅशनल स्कूलमध्ये उत्साहात संपन्न
कोपरगाव : विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास आणि सर्व गुण संपन्न विद्यार्थी हे समता इंटरनॅशनल स्कूलचे ध्येय आहे ध्येय प्राप्तीसाठी विद्यार्थ्यांचा मानसिक, बौद्धिक, शारिरीक विकास होणे अपेक्षित आहे. शिक्षण घेताना खेळ हा देखील जीवनातील खूप महत्त्वाचा पैलू आहे.त्यामुळे बेसबॉल क्रीडांगणाचे उद्घाटन हे समताच्या विद्यार्थ्यांना बौद्धिक आणि शारीरिक विकासाची संधीच आहे.असे प्रतिपादन राज्यस्तरीय शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त अक्षय आव्हाड यांनी केले.
समता इंटरनॅशनल स्कूलमध्ये राष्ट्रीय क्रिडा दिन उत्साहात साजरा करून बेसबॉल क्रिडांगणाचे उद्घाटन राज्यस्तरीय शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त अक्षय आव्हाड यांच्या हस्ते करण्यात आले. बेसबॉल व सॉफ्टबॉल प्रशिक्षक सुनिल कुटे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रमुख पाहुणे आणि प्रमुख उपस्थितांचा परिचय समता इंटरनॅशनल स्कूलच्या प्राचार्या हर्षलता शर्मा यांनी करून दिला. प्रमुख पाहुण्यांचा सत्कार समता इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक काका कोयटे यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान काका कोयटे यांनी भूषविले.
खेळामुळे विद्यार्थ्यांचे मानसिक स्वास्थ्य चांगले राहते. त्या मानसिक स्वास्थ्याचा परिणाम त्यांच्या अभ्यासावर होतो. विद्यार्थी खेळानंतर अत्यंत प्रसन्न आणि एकाग्रतेने अभ्यास करतात. खेळल्याने मुलांचे लक्ष अभ्यासात लागणार नाही हा अत्यंत चुकीचा समज सर्वत्र पसरलेला आहे. त्याबाबतीत पालकांनी जागृत होऊन मुलांना खेळण्यासाठी प्रवृत्त केले पाहिजे – काका कोयटे, संस्थापक, समता इंटरनॅशनल स्कूल
प्रास्ताविक करताना कार्यकारी विश्वस्त सौ.स्वाती कोयटे म्हणाल्या की, सध्याचा खेळाचा प्रवास खूपच सोयीस्कर झालेला असून खेळाचे सर्व साहित्य आणि मार्गदर्शनही सहज उपलब्ध होत असते. मोबाईलचा वापर करून विद्यार्थी खेळाची प्राथमिक माहिती मिळवू शकतात.सध्या खेळामध्ये विद्यार्थ्यांना अनेक संधी उपलब्ध झालेल्या आहेत. या संधी समताच्या विद्यार्थ्यांनी ओळखून समताच्या क्रिडा विभागाचे मार्गदर्शन घेत कोणत्याही एका खेळात पारंगत होऊन त्यांच्या आयुष्यात बदल घडवून आणावा.
राष्ट्रीय क्रिडा दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या जलतरण स्पर्धेत इ.६ वी ते इ.१० वी तील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवत विविध कौशल्य आणि प्रात्यक्षिक केली. या स्पर्धेत प्राविण्य मिळविलेल्या आणि २०२२ – २३ या वर्षात समताच्या विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या क्रिडा प्रकारात विविध स्तरावर मिळविलेल्या विशेष प्राविण्याबद्दल प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करून गौरविण्यात आले.
आव्हाड पुढे म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या जीवनात खेळ हा अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याने विद्यार्थ्यांनी मैदानी खेळात बहुसंख्येने सहभागी व्हायला हवे. त्यासाठी समता इंटरनॅशनल स्कूलने विविध क्रिडा प्रकार व त्यासाठी आवश्यक असणारे खेळाचे प्रशिक्षक उपलब्ध करून दिले आहेत. तसेच शालेय, तालुका, जिल्हा, राज्य, राष्ट्रीय स्तरावर विविध खेळांच्या स्पर्धा आयोजित करून संधी उपलब्ध करून देत असतात.प्रत्येक विद्यार्थ्याने खेळामध्ये सातत्य ठेवायला हवे.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विद्यार्थी आर्यन कुमार आणि वैदेही राहतेकर यांनी केले. कार्यक्रमाला उद्योजक जितेंद्र पाटणी, मेस विभागाच्या अध्यक्षा सौ.सुहासिनी कोयटे समता इंटरनॅशनल स्कूलचे विद्यार्थी, पालक क्रिडा प्रेमी, शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांचे आभार शिक्षिका कविता पाटील यांनी मानले.