राज्य पातळीवरील फुटबॉल स्पर्धा आयोजनाचा बहुमान समता इंटरनॅशनल स्कूलला – एस. एम. बुक्के, धर्मादाय सहआयुक्त
कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे
राज्य पातळीवरील फुटबॉल स्पर्धा आयोजनाचा बहुमान समता इंटरनॅशनल स्कूलला – एस. एम. बुक्के, धर्मादाय सहआयुक्त
कोपरगाव : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय गुणवत्तापूर्ण शिक्षण देणाऱ्या समता इंटरनॅशनल स्कूलला देशातील सीबीएसई पुरस्कृत शाळांपैकी २०२३ – २४ ची ‘क्लस्टर ९ फुटबॉल चॅम्पियनशिप’ राज्य पातळीवरील स्पर्धा आयोजनाचा बहुमान मिळाला असून कोपरगाव तालुक्याच्या शिरपेचात एक मानाचा तुरा रोवला गेला असल्याचे धर्मादाय सह आयुक्त एस.एम. बुक्के यांनी सांगितले.
अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव येथील कोकमठाण या ग्रामीण भागातील समता इंटरनॅशनल स्कूलच्या भव्य क्रिडांगणावर २९ ते ३१ ऑक्टोबर दरम्यान आयोजित राज्य पातळीवरील फुटबॉल स्पर्धेचे उद्घाटन धर्मादाय सह आयुक्त एस.एम. बुक्के, माउंट एव्हरेस्ट शिखर सर करणाऱ्या महिला गिर्यारोहक सुविधा कडलग यांच्या हस्ते आणि समता इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे, सीबीएसई पुणे विभागाचे निरीक्षक गिरीश टोकसे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, कोणताही खेळ हा जिंकणे किंवा हरण्यासाठी नसून खेळातून प्रतिभावान खिलाडू वृत्ती दर्शविण्याचा खेळ असतो. शिक्षणाबरोबरच ग्रामीण भागातील खेळाडूंना या स्पर्धेच्या माध्यमातून एक संधी प्राप्त करून दिली आहे. समता इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक काका कोयटे यांच्या सामाजिक कार्याची उंची मोजता येऊ शकत नाही . त्या प्रमाणेच शिक्षण क्षेत्रातही त्यांनी ग्रामीण भागात समता इंटरनॅशनल स्कूल स्थापन करून १ तप पूर्ण केले असून सुविधा संपन्न असे वातावरण समता इंटरनॅशनल स्कूलमध्ये बनविलेले आहे.
ग्रामीण भागातील मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळाले पाहिजे .या उद्देशाने स्थापन करण्यात आलेल्या समता इंटरनॅशनल स्कूलला एक तप पूर्ण झाले असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी ज्ञानाबरोबरच विविध क्रिडा प्रकारातही राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर समता इंटरनॅशनल स्कूलचा झेंडा फडकविलेला आहे.या स्पर्धेद्वारा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना फुटबॉल सारख्या खेळातून कला दाखविण्याची संधी प्राप्त करून दिली – काका कोयटे, संस्थापक समता इंटरनॅशनल स्कूल.
या वेळी महिला गिर्यारोहक सुविधा कडलग म्हणाल्या की, माउंट एव्हरेस्ट शिखर सर करण्यासाठी कमी कालावधी लागला, पण ते सर करण्याच्या सरावासाठी खूप कालावधी लागला. तसेच स्पर्धेतील प्रत्येक खेळाडू आणि समता इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी अधिकाधिक सराव केला तरच यश प्राप्त होत असते. माउंट एव्हरेस्ट सर करण्यासाठी सराव करत असताना मला समता परिवाराचे ही मोलाचे सहकार्य लाभले.
प्रमुख पाहुणे एस.एम.बुक्के यांचा सत्कार काका कोयटे, गिर्यारोहक सुविधा कडलग यांचा सत्कार मॅनेजिंग ट्रस्टी सौ.स्वाती कोयटे, निरीक्षक गिरीश टोकसे यांचा सत्कार सदस्य अरविंदजी शिरोडे यांच्या हस्ते करण्यात आला. प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्राचार्या हर्षलता शर्मा व उपप्राचार्य समीर अत्तार यांनी करून दिला. या राष्ट्रीय स्पर्धेत प्रामुख्याने महाराष्ट्र व गोवा राज्यातील ९२ संघातील १२०० स्पर्धकांनी सहभाग नोंदविला आहे.समता इंटरनॅशनल स्कूलच्या माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांनी ‘भारतातील विविधतेतील एकात्मता’ या विषयावर नृत्याविष्कार करून भारतातील विविध राज्यांच्या संस्कृतीचे दर्शन घडविले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन इ.९ वीतील विद्यार्थी आर्यन कुमार व इ.१० वीतील विद्यार्थिनी अनुष्का ठोळे यांनी केले.या वेळी समता इंटरनॅशनल स्कूल व्यवस्थापन समितीचे सदस्य अरविंदजी पटेल, चांगदेव शिरोडे, गुलशन होडे, भरत अजमेरे, मॅनेजिंग ट्रस्टी सौ.स्वाती कोयटे, मुख्य कार्यवाहक संदीप कोयटे, महाराष्ट्र व गोवा राज्यातील संघ, संघाचे प्रशिक्षक, क्रीडा प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांचे आभार इ.१० वीतील विद्यार्थी कृष्णा गुप्ता याने मानले.