गौरीचे यश तालुक्यासाठी अभिमानाची बाब – काका कोयटे, अध्यक्ष
कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे
गौरीचे यश तालुक्यासाठी अभिमानाची बाब – काका कोयटे, अध्यक्ष
कोपरगाव : गायन कलेचा कोणत्याही प्रकारचा वारसा नसलेल्या तसेच कोणत्याही प्रकारची शिकवणी नाही अशी तालुक्यातील ब्राह्मणगावची कन्या गौरी अलका पगारे हिने कमी वयात प्रतिकूल परिस्थितीवर मात करून सा रे ग म प लिटल चॅम्प २०२३ ची महविजेती होण्याचा बहुमान मिळवला आहे. त्यामुळे तिचे कौतुक करावे तेवढे कमीच असून तालुक्यासाठी अभिमानाची बाब आहे. कोपरगाव तालुका व्यापारी महासंघ या पुढील वाटचालीत तिच्या पाठीशी उभा राहील. तिचे यश कोपरगावकरांचा सन्मान असून कमी वयातच कर्तृत्ववान होण्याचा मान ही मिळविला असल्याचे कोपरगाव तालुका व्यापारी महासंघाचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांनी सांगितले.
कोपरगाव तालुका व्यापारी महासंघाच्या वतीने सारेगमपमध्ये महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल गौरी पगारे हिचा व्यापारी महासंघाचे कार्याध्यक्ष सुधीर डागा , महासचिव प्रदीप साखरे, धारणगाव रोड शाखेचे अध्यक्ष गुलशन होडे, हर्षल जोशी, अंकित कृष्णानी, निकेतन देवकर, ब्राह्मणगावचे सरपंच अनुराग येवले , सोनू पगारे आदींसह ब्राह्मणगाव परिसरातील नागरिकांच्या उपस्थितीत सन्मान करून सत्कार करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते.
गौरीचे यश हे कोपरगावच्या यशात महत्त्वाचे असून नगर जिल्ह्यासाठी देखील भूषणावह असल्याचे सांगून व्यापारी महासंघाचे कार्याध्यक्ष सुधीर डागा यांनी तिला आलेले अनुभव मुलाखत स्वरूपात विचारत स्पर्धेत गायलेल्या विविध गाण्यांचे मुखडे तिच्या तोंडून वदवून घेत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
गायक सुरेश वाडकर, सलील कुलकर्णी, आनंद शिंदे, आदर्श शिंदे, वैशाली माडे अशा विविध मान्यवरांच्या उपस्थितीत गौरीला सा रे ग म प ची महाविजेती म्हणून घोषित करण्यात आले. गौरी अत्यंत खडतर परिस्थितीतून पुढे आली असून तिची आई अलका यांचा संघर्ष ही अवर्णनीय आहे. गौरीच्या या दैदीप्यमान यशाबद्दल तिचे सर्व स्तरातून कौतुक होत असून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा ही देण्यात येत आहे.