निवाऱ्यातील कार्तिकस्नान (काकडा) सांगता उत्सव संपन्न…
कोपरगाव : शहरातील निवारा भजनी मंडळ व निवारा हाऊसिंग सोसायटीच्यावतीने गेल्या महिनाभर पहाटे ५ वाजेपासून काकडा आरती सुरु होत असे. या उत्सवाची परंपरा कायम सुरू ठेवत कार्तिकस्नान (काकडा) सांगता उत्सव नित्यनियम विधी करून साई कथाकार ह.भ.प. विकास महाराज गायकवाड यांच्या काल्याच्या किर्तनाने मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
या प्रसंगी विकास महाराज गायकवाड म्हणाले की, कोपरगाव शहरात निवारा, सुभद्रा नगर, कोजागिरी कॉलनी, ओम नगर, रिद्धी – सिद्धी नगर तसेच आजूबाजूच्या परिसरात धार्मिक, सामाजिक दृष्टीने वातावरण फुललेले असते. समता परिवाराचे मार्गदर्शक ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे व माजी नगरसेवक जनार्दन कदम यांच्या प्रयत्नांमुळे हा परिसर सुखी, संपन्न व समृद्ध बनला आहे. महिनाभर या परिसरात पवित्र वातावरण निर्माण झाले होते. या परिसरातून १२ ही महिने धार्मिक, सामाजिक वातावरणाची अनुभूती नेहमी येतच असते.
कोपरगाव तालुक्यातील गुळाचे प्रसिद्ध व्यापारी कांतीलाल हरलाल जोशी यांच्या देणगीतून साकार झालेल्या ‘पांडुरंग सावली’ सभागृहात साई कथाकार ह.भ.प. विकास महाराज गायकवाड यांच्या २ तास चाललेल्या काल्याच्या किर्तनातून ‘श्रीकृष्ण जन्माची कथा’ सुश्राव्यवाणीतून सादर करत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
काकडा उत्सव यशस्वीतेसाठी निवारा भजनी मंडळ व मंदिर व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सौ. सुहासिनी ओमप्रकाश कोयटे व बाबासाहेब कापे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच श्रीमती विमलताई कर्डक, सौ.वैशाली जाधव, ह.भ.प. जनार्दन गायकवाड आदींसह भाविक, नागरिक यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्तिकस्नान (काकडा) सांगता उत्सवाचा समारोप महाप्रसाद (भंडारा) ने झाला. यासाठी भाविकांनी घरून भाकरी बांधून आणल्या होत्या. त्या भाकरींचा आस्वाद उपस्थित भाविकांनी निवारा भजनी मंडळाच्या वतीने बनविण्यात आलेली लापशी, भातासह घेतला.