समता इंटरनॅशनल स्कूल शैक्षणिक क्षेत्रात एक पाऊल पुढे – सुधीर लंके, संपादक
कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे
समता इंटरनॅशनल स्कूल शैक्षणिक क्षेत्रात एक पाऊल पुढे – सुधीर लंके, संपादक
कोपरगाव : विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी व त्यांच्यातील सुप्त गुण विकसित करणे यांसारखे अनेक उद्देश समोर ठेवून शाळा, महाविद्यालयांमध्ये वार्षिक स्नेहसंमेलने आयोजित केली जातात. समता इंटरनॅशनल स्कूलचा हा उपक्रम अतिशय शिस्तप्रिय पद्धतीने पाहायला मिळाला. विद्यार्थ्यांमधील आत्मविश्वास, अपेक्षा उंचाविण्याचा हा उपक्रम आहे. विद्यार्थ्यांना जे समजते ते देणारी व त्यांच्या विचारांचा आदर करणारी शाळा म्हणून ओळख निर्माण केलेली आहे. शिक्षणाशिवाय वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थी जीवन परिपक्व बनविणारी शाळा पाहायला मिळाली. त्यामुळे समता इंटरनॅशनल स्कूल ही इतरांच्या तुलनेत एक पाऊल पुढे असणारी शाळा असल्याचे गौरवोद्गार समता इंटरनॅशनल स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षीस वितरण कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सुधीर लंके यांनी काढले.
काल: संभ्रम: (रामायणातील अपरिचित गोष्टी) या आधारे समता इंटरनॅशनल स्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन २०२३ – २४ व बक्षीस वितरण सोहळा स्कूलचे संस्थापक ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाला. त्या वेळी ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, काका कोयटे यांनी स्थापन केलेल्या समता चॅरिटेबल ट्रस्ट, समता पतसंस्था, समता इंटरनॅशनल स्कूल या संस्थांच्या नावाला शोभेल अशी कामगिरी असून समर्पक असे नाव दिले आहे. समता हा शब्द जात, पंथ, लिंग यात कोणताही भेद न करणारा शब्द असून लोकशाहीच्या मूल्यातील महत्त्वपूर्ण असा शब्द आहे. समतातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता, स्कूलचा शैक्षणिक दर्जा विशेष उल्लेखनीय असा आहे. तसेच विद्यार्थ्यांसोबत पालकांनी मानसिक दृष्ट्या असणे महत्त्वाचे आहे.
प्रमुख पाहुण्यांचा परिचय समता इंटरनॅशनल स्कूलचे उप प्राचार्य समीर आत्तार यांनी करून दिला. संस्थेचे संस्थापक काका कोयटे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. २०२३ – २४ चा वार्षिक अहवाल वाचन प्राचार्या हर्षलता शर्मा यांनी केले. तालुका, जिल्हा, राज्य व राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये समताचे नाव उंचावणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मान व सा रे ग म प २०२३ ची लिटल चॅम्प गौरी अलका पगारे हिचा ही सन्मान प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला. सुधीर लंके यांनी शिक्षक व विद्यार्थी आणि पालक व पाल्य यामधील नाते विविध चित्रपटातील दाखले देऊन स्पष्ट केले. तसेच समताच्या विद्यार्थ्यानी रामायणातील अपरिचित घटना नाट्य, सांगितिक पद्धतीने परिचित करून दिल्या. समता स्कूलच्या हिरवळीवर, गुलाबी थंडीत रामायणातील या अपरिचित गोष्टींचा आस्वाद घेताना उपस्थित वर्ग मंत्रमुग्ध झाला होता. विद्यार्थी, पालकांसाठी खाऊ गल्लीचेही आयोजन करण्यात आले होते.
प्रास्ताविकात कार्यकारी विश्वस्त स्वाती कोयटे म्हणाल्या की, समता इंटरनॅशनल स्कूल ही विद्यार्थी केंद्रित संस्था असून सर्वांगीण विकासासाठी सतत प्रयत्नशील असते. या वर्षी विद्यार्थ्यांना इजिप्त, दुबई या देशांचा अभ्यास दौरा करून तेथील संस्कृती, शैक्षणिक वातावरण, अत्याधुनिक तंत्रज्ञान आदींसह विविध गोष्टींची सांगड घातली गेली असून विद्यार्थ्यांच्या प्रगतीच्या दृष्टीने तेथील शिक्षण संस्थांशी विविध सामंजस्य करार देखील करण्यात आले आहेत. विद्यार्थ्याना शिक्षण घेताना बदल हवे असतात. त्यांना हवे असणारे मानसिक, शैक्षणिक, शारीरिक बदल लक्षात घेऊन आम्ही समता पॅटर्नच्या माध्यमातून शैक्षणिक प्रगती करत आहोत. ‘तुमची मुलं, ती आमची मुलं या प्रमाणे विद्यार्थ्यांची सर्वांगीण प्रगती करून समताचे विद्यार्थी हे देशाचे उज्वल भविष्य आहे.
कार्यक्रम व नाटिकांचे सुत्रसंचालन आर्यन कुमार, सिद्धांत मिलानी, दार्शिल अजमेर, सोहम साताळकर, हेतूल पारीख, अन्वी उंबरकर, नूतन लाहोटी, अदिती बाराहाते, श्रेयाश्री पाटील, ईशान कोयटे, इप्सिता राय, रिद्धी भडकवाडे या विद्यार्थ्यांनी केले. काळाची भूमिका अजिंक्य वठोरे, प्रथमेश भट्टड, अद्विता भोसले, जयरूप साखरे, शांभवी देशमुख यांनी पार पाडली. नाटिका शिक्षक किरण लद्दे यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले. समताच्या नाटिका व सांगितिक नृत्यांमध्ये प्राथमिक व माध्यमिक विभागातील १ हजार हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता.
या वेळी समता इंटरनॅशनल स्कूलचे व्यवस्थापन समितीचे सदस्य अरविंद पटेल, कांतीलाल जोशी, जितुभाई शहा, नीरज रावलिया, गुलशन होडे, संदीप कोयटे, सौ. शोभा दरक, सौ. श्वेता अजमेरे, समता स्कूलच्या अन्नपूर्णा सौ.सुहासिनी कोयटे आदींसह विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षीस वितरण सोहळा यशस्वीतेसाठी शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.