बाजार तळ भागातील बाजारपेठेला ऊर्जितावस्था मिळवून देऊ…
कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे
बाजार तळ भागातील बाजारपेठेला ऊर्जितावस्था मिळवून देऊ…
बाजारतळ या भागातील व्यापाऱ्यांच्या व्यवसायाला चालना मिळावी. यासाठी कोपरगाव तालुका व्यापारी महासंघाच्या वतीने बाजार तळ शाखेचे अध्यक्ष म्हणून आशिष लोढा, उपाध्यक्ष अनिकेत भडकवाडे, सचिव संकेत दरक व कार्याध्यक्ष म्हणून हर्षल जोशी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.
कोपरगावच्या बाजारपेठेला कॅलिफोर्निया या नावाने संबोधले जात होते. त्यातील मुख्य बाजारपेठ शहरातील बाजार तळ या ठिकाणी होती. आज ही आठवड्याचा बाजार या भागात भरतो. कांतीलाल हरलाल जोशी, ओंकारलाल चुनीलाल सोनी फर्म, विश्वनाथ श्यामलाल राठी, रामेश्वर जगन्नाथ मुंदडा, रामलाल मोहनलाल डागा, राजेंद्र सावजी, अशोकशेठ वडनेरे आदींसह इतर किरकोळ व्यापारी आज ही उत्तम प्रकारे ग्राहकांना सेवा देऊन बाजार तळातील बाजारपेठेला महत्त्वाचे स्थान निर्माण करून देत आहे. यात अनिल कोल्ड्रिंक्स यांचाही खारीचा वाटा आहे. या होलसेल व्यापाऱ्यांची ४ थी पिढी आज होलसेल व्यापारी म्हणून व्यवसाय करत आहे. चर्मकारापासून सुवर्णालंकारांपर्यंत या भागातील दुकाने गजबजलेली असून सुवर्णालंकारांची दुकाने मोठ्या प्रमाणात व सुस्थितीत आहे.
बाजार तळ भागातील व्यापारी धर्म शाळेसमोरील अर्धवट रस्त्याचे काम पूर्ण करणेबाबत बाजारतळ शाखेच्या वतीने नगरपालिकेच्या बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदन देताना शाखेचे अध्यक्ष आशिष लोढा व कार्याध्यक्ष हर्षल जोशी पदाधिकारी.
तसेच अतिशयच वर्दळीचे ठिकाण समजले जाणाऱ्या भागात कोपरगावचे ग्रामदैवत लक्ष्मी आई मंदिर, तुळजाभवानी मंदिर, प्रगतेश्वर मंदिर असून धार्मिक वातावरण ही या भागात आहे.परंतु कालांतराने होत असलेल्या विविध बदलांमुळे या भागातील बाजारपेठेत कधी कधी शांतता पाहायला मिळते. तसेच काही व्यापाऱ्यांचा खरेदी – विक्री बाबत नकारात्मक दृष्टिकोन दिसून येतो.
त्यातील प्रमुख समस्या म्हणजे या भागात खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांसाठी रस्त्यांची दुरावस्था, पार्किंग सुविधा, स्वच्छता गृहे , नगरपालिकेचा मोठ्या प्रमाणात महसूल मागणी, या भागातील व्यावसायिकांसाठी वेळेचे बंधन अशा विविध समस्या असल्याचे कोपरगाव तालुका व्यापारी महासंघाच्या बाजारतळ शाखेचे नवनियुक्त अध्यक्ष आशिष प्रवीणशेठ लोढा यांनी सांगितले.
तसेच समस्यांचे निराकरण करण्यासाठी नगरपालिकेतील त्या त्या विभागातील अधिकाऱ्यांना रितसर निवेदने देऊन त्या लवकरात लवकर सोडविणार आहोत. नगरपालिकेच्या त्या विभागातील कामात हलगर्जीपणा होत असेल, तर त्यांच्या विरोधात आंदोलने करून या भागातील समस्या सोडविण्यात येईल.
बाजारपेठेला उर्जितावस्था मिळवून देण्यासाठी व व्यवसाय वृद्धीसाठी या भागातील होलसेल व्यापारी, दुकानदार यांच्यासाठी वेगवेगळी मार्गदर्शनपर शिबिरे आयोजित करून त्यांना अधिकाधिक माहिती देण्याचा प्रयत्न करू. तसेच शॉपॅक व फूड लायसन्स उपलब्ध करून देण्यासाठी प्रशिक्षण शिबिर तसेच फूड फेस्टिवलचेही आयोजन करणार असल्याचे या शाखेचे नवनियुक्त कार्याध्यक्ष हर्षल जोशी व सचिव संकेत दरक यांनी सांगितले आहे.