कैलास वाणी, शेखर मुंदडा यांना ‘कोपरगाव भूषण’ पुरस्कार जाहीर; ‘असे होते कोपरगाव’ ग्रंथाच्या विस्तारित तृतीय आवृत्तीचे प्रकाशन; पुण्यात कोपरगावकरांचा स्नेहमेळावा
कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे
कैलास वाणी, शेखर मुंदडा यांना ‘कोपरगाव भूषण’ पुरस्कार जाहीर

‘असे होते कोपरगाव’ ग्रंथाच्या विस्तारित तृतीय आवृत्तीचे प्रकाशन; पुण्यात कोपरगावकरांचा स्नेहमेळावा
कोपरगाव : कोपरगाव – पुणे मित्रमंडळाच्या वतीने दिला जाणारा प्रतिष्ठेचा ‘कोपरगाव भूषण’ पुरस्कार यंदा उद्योजक व चित्रपट निर्माते कैलास (बापू) वाणी आणि महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) शेखर रामबिलास मुंदडा यांना जाहीर झाला आहे. रविवार, २२ नोव्हेंबर २०२६ रोजी पुण्यातील घरकूल लॉन्स येथे सायंकाळी ४ वाजता आयोजित कोपरगावकरांच्या स्नेहमेळाव्यात पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.
तसेच या सोहळ्यात कोपरगावच्या इतिहासाचा समग्र आढावा घेणाऱ्या ‘असे होते कोपरगाव’ या ग्रंथाच्या विस्तारित तृतीय आवृत्तीचे प्रकाशनही होणार असल्याचे स्नेहमेळाव्याचे निमंत्रक आणि राज्यातील अग्रगण्य समता नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे आणि कोपरगाव नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा सौ. ऐश्वर्यालक्ष्मी सातभाई यांनी सांगितले.
या स्नेहमेळाव्यासाठी आयोजकांच्या वतीने पूर्वनोंदणी सुरू करण्यात आली असून, त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. पुण्यात नातेवाईक किंवा मित्रपरिवार असलेल्या कोपरगावकरांनीही आपली नावे नोंदवावीत. अधिक माहितीसाठी व नावनोंदणीसाठी सतीश निळकंठ (९९६०१२१३८१) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन कोपरगाव – पुणे मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
‘असे होते कोपरगाव’ हा ग्रंथ शहराच्या समृद्ध ऐतिहासिक वारशाचा, सांस्कृतिक परंपरांचा आणि सामाजिक जडणघडणीचा वेध घेणारा महत्त्वपूर्ण दस्तऐवज आहे. त्यामुळे या पुस्तकाच्या विस्तारित तृतीय आवृत्तीचे प्रकाशन हे या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरणार आहे.
कोपरगाव – पुणे मित्रमंडळाच्या माध्यमातून पुण्यात स्थायिक झालेल्या कोपरगावकरांना एकत्र आणण्यासाठी सदर कार्यक्रम हे एक संवादाचे व्यासपीठ म्हणून उपलब्ध करून देण्यात आले आहे. या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबविणे, तसेच कोपरगावच्या विकासासाठी सामूहिक योगदान देण्याचा प्रयत्न केला जातो. पुण्यातील विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या कोपरगावकरांचे ज्ञान, अनुभव आणि कौशल्य यांचा उपयोग आपल्या गावाच्या प्रगतीसाठी व्हावा. या व्यापक उद्देशाने या स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

‘कोपरगाव भूषण’ पुरस्काराने सन्मानित होणारे कैलास (बापू) वाणी यांनी समर्थ ग्रुपच्या माध्यमातून बांधकाम क्षेत्रात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. कैलास वाणी स्टुडिओच्या माध्यमातून त्यांनी ‘देऊळ बंद’ आणि ‘देऊळ बंद २’ या चित्रपटांची निर्मिती केली. ‘देऊळ बंद २’ हा आजवर सर्वाधिक कमाई करणाऱ्या पहिल्या चार मराठी चित्रपटांपैकी एक ठरला आहे. या चित्रपटातून मिळालेल्या नफ्याचा विनियोग ते विविध सामाजिक उपक्रमांसाठी करतात. तसेच वाणी समाज ट्रस्टच्या माध्यमातून शिक्षण, आरोग्य आणि उपजीविका या क्षेत्रांत उल्लेखनीय काम सुरू आहे. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत देण्याबरोबरच त्यांच्या निवासासाठी वसतिगृह उभारण्याचे महत्त्वपूर्ण कार्यही त्यांनी केले आहे.
दुसरे पुरस्कारार्थी शेखर रामबिलास मुंदडा यांनी महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे पहिले अध्यक्ष होण्याचा बहुमान मिळविला आहे. गोसंवर्धन आणि गोसेवा क्षेत्रात त्यांनी भरीव व रचनात्मक योगदान दिले असून, त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना आयोगाच्या अध्यक्षपदाचा दुसरा कार्यकाळही देण्यात आला आहे. या पदावर कार्यरत असताना त्यांनी राबविलेले नावीन्यपूर्ण उपक्रम विशेष लोकप्रिय ठरले आहेत. ‘महाएनजीओ’ आणि ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’च्या माध्यमातूनही ते विविध सामाजिक व सेवाभावी उपक्रमांमध्ये सक्रिय आहेत.

स्नेहमेळाव्याच्या नियोजनासाठी कोपरगावच्या वतीने नारायण क्षीरसागर, अनंत बर्गे, प्रमोद मुंदडा, राजकुमार बंब, सुधीर डागा, आशुतोष पटवर्धन, मच्छिंद्र टेके, महेश जोशी आणि सुशांत घोडके कार्यरत आहेत. तर पुण्यातील सौ.अद्वैता उमराणीकर, नंदकिशोर अग्रवाल, किशोर गिरमे, विवेक रत्नपारखी, प्रताप महाले, अभिजीत शहा, राजेंद्र धोर्डे आणि विनोद ठोळे हे आयोजनाची जबाबदारी सांभाळत आहेत.



