ब्रेकिंग

केवळ नऊ कर्मचाऱ्यांच्या बळावर गोदामृत सोसायटीचा सत्तावन कोटींच्या पुढे संमिश्र व्यवसाय; काका कोयटे यांच्याकडून कौतुक!

कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे

केवळ नऊ कर्मचाऱ्यांच्या बळावर गोदामृत सोसायटीचा सत्तावन कोटींच्या पुढे संमिश्र व्यवसाय; काका कोयटे यांच्याकडून कौतुक!

गोदामृत अर्बन क्रेडिट सोसायटीच्या नवीन शाखेचे काका कोयटे यांच्या हस्ते उद्घाटन

नाशिक : गोदामृत अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीने केवळ ९ कर्मचाऱ्यांच्या बळावर ३३ कोटी ४९ लाख रुपयांच्या ठेवी, २३ कोटी ७० लाख रुपयांचे कर्जवाटप आणि ५७ कोटी ३९ लाख रुपयांपेक्षा अधिक संमिश्र व्यवसायाची मजल गाठली आहे. संस्थेची १४ कोटी ७२ लाख रुपयांची गुंतवणूक आणि १ कोटी २९ लाख रुपयांचे भागभांडवल ही कामगिरी कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे कार्यकारी अध्यक्ष आणि राज्यातील अग्रगण्य समता नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांनी केले.

नाशिक येथील गोदामृत अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या नवीन शाखेचा शुभारंभ काका कोयटे यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान राज्य फेडरेशनच्या संचालिका ॲड.अंजलीताई पाटील यांनी भूषविले. त्यावेळी ते बोलत होते.

गोदामृत सोसायटीच्या कार्यपद्धतीचे कौतुक करताना काका कोयटे यांनी कमी मनुष्यबळात मोठा व्यवसाय उभा करण्यासाठी संचालक मंडळ, अधिकारी आणि कर्मचारी यांच्यातील समन्वय, कामाप्रती असलेली निष्ठा आणि समाजसेवेची भावना महत्त्वाची असल्याचे अधोरेखित केले.

गोदामृत सोसायटीमध्ये कोणताही शिपाई न लावता शाखाधिकारी किंवा इतर कर्मचारी स्वतः साफसफाई करतात. वेळप्रसंगी संचालक देखील साफसफाई करतात. संस्थेच्या कार्यालयाचे इंटेरियर डिझाइन करण्यापासून ते सुताराकडून फर्निचर बसवून घेण्यापर्यंतची कामे संचालक मंडळाने स्वतः पुढाकार घेऊन पूर्ण केली आहेत. संस्थेच्या कामकाजात प्रत्येकाने आपली जबाबदारी स्वीकारत योगदान देण्याची भूमिका येथे दिसून येते.

संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला सुमारे ७०० ते ८०० सभासद उपस्थित असतात. त्यांच्यासाठी बनवलेले जेवण कोणताही आचारी न लावता संचालक मंडळ स्वतः तयार करतात व सर्व सभासदांना आपुलकीने वाढतात. तसेच कर्जवसुलीसाठी संचालक मंडळातील सदस्य आणि अधिकारी प्रत्यक्ष कर्जदारांकडे जातात. प्रसंगी संचालक स्वतः पहाटे ५ वाजता उठून वसुलीसाठी स्वतः जातात.

विशेष म्हणजे, संस्थेतील सर्व पदाधिकारी आपापल्या नोकऱ्या सांभाळून समाजसेवेचे व्रत म्हणून संस्थेचे काम करतात. केवळ ९ कर्मचाऱ्यांच्या मदतीने संस्थेचा एवढा मोठा आर्थिक व्यवहार सांभाळणे आणि सभासदांना सेवा देणे ही बाब निश्चितच उल्लेखनीय आहे. सामूहिक जबाबदारी, श्रमप्रतिष्ठा, सभासदांप्रती बांधिलकी आणि सामाजिक कार्याची तळमळ या गुणांमुळे संस्थेच्या वाटचालीला बळ मिळत असल्याचे यावेळी अधोरेखित झाले.

या उद्घाटनप्रसंगी गोदामृत अर्बन सोसायटीचे चेअरमन प्रमोद पाटील, व्हा. चेअरमन नितीन बोरोले, सेक्रेटरी अनिल पाटील, संचालक विलास ढाके, जितेंद्र बोरा, सौ. रत्नमाला फालक, रघुवीर फालक, माधव भोळे, संजीव पगारे, आशा चौधरी, ॲड. प्राची चाळीसगावकर, देवेंद्र चौधरी, संतोष आव्हाड, भागवत गोळे आदींसह संस्थेचे अधिकारी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे