काका कोयटे यांच्या संकल्पनेतून पुण्यात रंगला कोपरगावकरांच्या स्नेहाचा अनोखा सोहळा
कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे

काका कोयटे यांच्या संकल्पनेतून पुण्यात रंगला कोपरगावकरांच्या स्नेहाचा अनोखा सोहळा
कोपरगाव : गाव बदलते, माणसे बदलतात, काळ पुढे सरकतो; मात्र गावाशी जोडलेल्या आठवणी आणि माणसांमधील जिव्हाळा कधीच कमी होत नाही. याच भावनेचा प्रत्यय ‘जावे आठवणींच्या गावा!’ या आगळ्यावेगळ्या स्नेहसोहळ्यात आला. कोपरगावच्या जुन्या आठवणी, गमतीजमती, अनुभव आणि गावाशी जोडलेल्या भावनिक नात्यांना उजाळा देणारा हा सोहळा पुण्यातील घरकुल लॉन्समध्ये उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. यावेळी कोपरगावच्या जडणघडणीत मोलाचे योगदान देणारे शेखर मुंदडा आणि कैलास (बापू) वाणी यांना ‘कोपरगाव भूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

यावेळी स्व.रामविलासजी मुंदडा आणि स्व. बाबूलालजी वाणी यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कोपरगावकरांच्या वतीने कार्यक्रमाच्या सह निमंत्रक व स्वागताध्यक्ष सौ. ऐश्वर्याताई सातभाई, तर पुणेकरांच्या वतीने राजेंद्र धोर्डे यांनी स्वागतपर मनोगत व्यक्त केले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमातील विशेष आकर्षण ठरलेला ‘कोपरगावच्या आठवणी, किस्से आणि अनुभव’ हा उपक्रम अत्यंत रंगतदार झाला. या उपक्रमासाठी तब्बल ४० कोपरगावकरांनी आपले अनुभव कथन करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यातून लकी ड्रॉ पद्धतीने निवडलेल्या १० जणांना प्रत्येकी चार मिनिटे देण्यात आली. सुधीर मनसाळ, पद्माताई पगार, रमेश उर्फ नंदू कुलकर्णी, उमा रायते, चंद्रकांत गवांदे, संकेत श्रीकांत कोयटे, अनिता कुदळे, मच्छिंद्र टेके, नारायण क्षीरसागर आणि सुरेश गोरे यांनी आपल्या आठवणी व अनुभवांना उजाळा दिला. जुन्या काळातील प्रसंग, मैत्रीचे किस्से आणि कोपरगावच्या बदलत्या स्वरूपाचे अनुभव यामुळे उपस्थितांना जुन्या आठवणींची सफर घडली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक राज्यातील अग्रगण्य समता पतसंस्थेचे चेअरमन व कार्यक्रमाचे निमंत्रक ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांनी केले. गावाशी असलेले भावनिक नाते, कोपरगावची सामाजिक व सांस्कृतिक जडणघडण आणि गावाच्या विकासात योगदान देणाऱ्या व्यक्तींचे महत्त्व त्यांनी स्पष्ट केले.

प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश भाजपचे चिटणीस व एनबीटीचे विश्वस्त राजेश पांडे, विधानपरिषदेचे सदस्य आमदार विवेक कोल्हे, कोपरगावचे नगराध्यक्ष पराग संधान, पिंपरी चिंचवड माजी महापौर श्रीमती अनिता फरांदे, श्रीमती दीप्ती चौधरी, माजी उपमहापौर दीपक मानकर, समता पतसंस्थेचे व्हा.चेअरमन अरविंद पटेल, संचालक संदीप कोयटे, कचरू मोकळ, जनरल मॅनेजर सचिन भट्टड यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

यावेळी राजेश पांडे, आमदार विवेक कोल्हे, नगराध्यक्ष पराग संधान, माजी महापौर अनिता फरांदे, दिप्ती चौधरी, माजी उपमहापौर दीपक मानकर यांनी मनोगते व्यक्त केली. मनोगतातून त्यांनी कोपरगावच्या विकासाचा प्रवास, सहकार क्षेत्राचे योगदान, सामाजिक एकोपा आणि गावाशी असलेले नाते जपण्याचे महत्त्व विशद केले. गावाच्या प्रगतीसाठी सर्वांनी एकत्रितपणे योगदान देण्याचे आवाहनही मान्यवरांनी केले.

कोपरगावच्या सामाजिक व विविध क्षेत्रांतील योगदानाची दखल घेत शेखर मुंदडा आणि कैलास (बापू) वाणी यांना मान्यवरांच्या हस्ते ‘कोपरगाव भूषण’ पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. शेखर मुंदडा यांच्या मानपत्राचे वाचन सुनीताताई गिरमे यांनी केले, तर कैलास (बापू) वाणी यांच्या मानपत्राचे वाचन सुधीर डागा यांनी केले. पुरस्कार स्वीकारल्यानंतर दोन्ही सन्मानार्थींनी आपले मनोगत व्यक्त करताना कोपरगावशी असलेले ऋणानुबंध आणि आठवणींना उजाळा दिला. या सन्मानामुळे उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात आनंद व्यक्त केला.

कार्यक्रमात प्रमोद मुंदडा यांनी कोपरगाववर रचलेले खास गीत सादर केले. गावाविषयीचा जिव्हाळा आणि आठवणींचा भावनिक ठेवा या गीतातून व्यक्त झाला. यावेळी काका कोयटे यांच्या संकल्पनेतील असे होते कोपरगाव या पुस्तकाच्या तृतीय आवृत्ती प्रकाशनाचाही कार्यक्रम पार पडला. शेवटी कोपरगावच्या उज्ज्वल भविष्यासाठी सामूहिक संकल्प करण्यात आला. सुरेश गोरे व सौ.अद्विता उमराणीकर यांचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

एकंदरीत, ‘जावे आठवणींच्या गावा!’ हा सोहळा केवळ जुन्या आठवणी सांगण्यापुरता मर्यादित न राहता कोपरगावच्या माणसांना, संस्कृतीला, परंपरेला आणि सामाजिक बांधिलकीला जोडणारा स्नेहमेळावा ठरला. गावापासून दूर गेलेल्या माणसांच्या मनातही आपल्या मातीविषयीचा अभिमान आणि आपुलकी किती घट्ट असते, याची सुंदर अनुभूती या कार्यक्रमातून आली.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी आयोजन कमिटीचे नंदकिशोर अग्रवाल, विवेक रत्नपारखी, अभिजीत शहा, परेश लोहाडे, किशोर गिरमे, नारायण क्षीरसागर, प्रताप महाले, विनोद ठोळे, मच्छिंद्र टेके, राजेंद्र गिरमे, सुधीर डागा, सुशांत घोडके, आशुतोष पटवर्धन, महेश जोशी, अनंत बर्गे, समता परिवारातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.


