ब्रेकिंगमहाराष्ट्र

ग्रामीण भागातील लक्ष्मी पतसंस्थेची प्रगती कौतुकास्पद – काका कोयटे

कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे

ग्रामीण भागातील लक्ष्मी पतसंस्थेची प्रगती कौतुकास्पद – काका कोयटे

अकोले : सहकार क्षेत्रात एखाद्या संस्थेची खरी ताकद ही सभासदांचा विश्वास, पारदर्शक कारभार आणि आर्थिक सुरक्षिततेतून दिसून येते. सहकारी पतसंस्था या ग्रामीण भागाच्या आर्थिक विकासाला चालना देणारे महत्त्वाचे माध्यम आहेत. लोककल्याणाचा उद्देश समोर ठेवून स्थैर्य, सुरक्षा आणि समृद्धी या त्रिसूत्रीच्या आधारे वाटचाल करणाऱ्या लक्ष्मी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेने २५ वर्षांत विश्वासार्हता निर्माण केली आहे. संस्थेने सभासदांचा विश्वास जपत प्रगतीची वाटचाल अशीच सुरू ठेवावी. अशी अपेक्षा महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे कार्यकारी अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांनी व्यक्त केली.

अकोले तालुक्यातील रूंभोडी येथील लक्ष्मी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेचा रौप्यमहोत्सवी सोहळा इंदोरी फाटा येथील साई लॉन्स येथे काका कोयटे यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाला. संस्थेने २५ वर्षांची यशस्वी वाटचाल पूर्ण करून २६ व्या वर्षात पदार्पण केले आहे. या टप्प्यावर संस्थेने ग्रामीण भागात आर्थिक स्थैर्य, सुरक्षितता आणि स्वयंपूर्णतेचा आदर्श निर्माण केला असून, सहकार क्षेत्रात आपली वेगळी ओळख प्रस्थापित केली आहे.

ते पुढे म्हणाले की, रूंभोडीसारख्या अवघ्या ४ ते ५ हजार लोकसंख्या असलेल्या ग्रामीण गावात लक्ष्मी पतसंस्थेने ३५ कोटी रुपयांच्या ठेवी संकलित केल्या आहेत. सहकार खात्याने घालून दिलेल्या निकषांचे पालन करून संस्थेने शून्य टक्के एनपीए राखला आहे, ही अत्यंत कौतुकास्पद बाब आहे. सभासदांचा विश्वास संपादन करून ग्रामीण भागात आर्थिक शिस्त आणि सुरक्षिततेच्या बळावर संस्था प्रगती करू शकते, याचे लक्ष्मी पतसंस्था हे उत्तम उदाहरण आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या वतीने संस्थेच्या पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा देतो, असेही त्यांनी सांगितले.

या सोहळ्यास अकोले तालुक्याचे आमदार किरण लहामटे, नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे, अकोले तालुका पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष भाऊ पाटील नवले, अमृतसागर दूध संघाचे अध्यक्ष व माजी आमदार वैभव पिचड, अहिल्यानगर जिल्हा बँकेचे संचालक मधुकरराव नवले, सीए एस. झेड. देशमुख, ज्येष्ठ शेतकरी नेते दशरथ सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी उपस्थित मान्यवरांनीही मनोगत व्यक्त करत लक्ष्मी पतसंस्थेच्या पंचवीस वर्षांच्या यशस्वी वाटचालीचे कौतुक केले आणि संस्थेने भविष्यातही अशीच प्रगती साधत सहकार क्षेत्रातील आपले योगदान वाढवावे, अशा शुभेच्छा दिल्या.

यावेळी संस्थेचे संस्थापक चेअरमन प्रवीर मालुंजकर, उपाध्यक्ष भाऊसाहेब कासार, संचालक पाटील बुवा, किसन सावंत, माधव भोर, देविदास तिकांडे, संजय पवार, अन्सार शेख, गंगाधर पापळ, मनोहर मालुंजकर, अरुण फरगडे, कुशाबा मधे, दीपक भांगरे, भारत मालुंजकर, चंद्रकांत नेहे, राजेंद्र वालझाडे, सौ. माया नवले, सौ. संजीवनी देशमुख, सल्लागार ॲड. बी. आर. चौधरी, मुख्य व्यवस्थापक बाबासाहेब घुले यांच्यासह संस्थेचे अधिकारी, कर्मचारी, सभासद आणि हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे