गोखळीसारख्या छोट्या गावातून श्रीराम पतसंस्थेने निर्माण केला सहकाराचा मोठा आदर्श – काका कोयटे
कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे

गोखळीसारख्या छोट्या गावातून श्रीराम पतसंस्थेने निर्माण केला सहकाराचा मोठा आदर्श – काका कोयटे

फलटण : सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात अवघी चार ते पाच हजार लोकवस्ती असलेल्या गोखळीसारख्या छोट्या गावात सहकार, विश्वास आणि आर्थिक स्वावलंबनाचा भक्कम पाया रचत श्रीराम ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेने यशस्वी वाटचालीची २५ वर्षे पूर्ण केली. सहकार सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी, १४ नोव्हेंबर रोजी संस्थेचा रौप्यमहोत्सवी सोहळा व सहकार सप्ताह विशेष कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे कार्यकारी अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे म्हणाले की, श्रीराम पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन “डॉ. शिवाजी गावडे यांनी गेल्या २५ वर्षांत छोट्या गावात राहून आपल्या कार्यातून जी विश्वासार्हता निर्माण केली आहे, ती संपूर्ण महाराष्ट्रातील सहकारी पतसंस्था चळवळीसाठी अभिमानास्पद आहे. केवळ नफा कमावणे हे उद्दिष्ट न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत संस्थेने विविध सामाजिक उपक्रम हाती घेतले आहेत. त्यामुळे ठेवीदार आणि नागरिकांचा विश्वास संपादन करण्यात संस्था यशस्वी झाली आहे. सहकार म्हणजे केवळ आर्थिक व्यवहार नसून विश्वास, परस्पर सहकार्य आणि सामाजिक उत्तरदायित्व जपणारी चळवळ आहे, याचा आदर्श श्रीराम पतसंस्थेने निर्माण केला आहे.”

सहकार, विश्वास, आर्थिक स्वावलंबन आणि सामाजिक बांधिलकी या मूल्यांना केंद्रस्थानी ठेवून संस्थेने केलेली २५ वर्षांची वाटचाल निश्चितच प्रेरणादायी आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याबरोबरच सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून समाजाशी नाळ जोडण्याचे काम संस्थेने केले आहे.

या कार्यक्रमास फेडरेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेखा लवांडे, साईबाईमहाराज नागरी पतसंस्था संस्थापक चेअरमन श्रीमंत शिवांजलीराजे संजीवराजे ना. निंबाळकर, फेडरेशनच्या संचालिका सौ. भारती मुथा, फलटणचे सहाय्यक निबंधक दाजी खताळ, सोलापूरचे माजी प्रादेशिक उपसंचालक (साखर) जे. पी. गावडे, नेटविन सिस्टिम अँड सॉफ्टवेअरचे व्हा. प्रेसिडेंट (सेल्स अँड मार्केटिंग) मसऊद अत्तार आणि श्रीराम पतसंस्थेचे संचालक, अधिकारी, कर्मचारी , सभासद, हितचिंतक उपस्थित होते

कार्यक्रमात संस्थेच्या २५ वर्षांच्या यशस्वी वाटचालीचा गौरव, मान्यवरांचा सत्कार, स्मरणिका प्रकाशन, विशेष मार्गदर्शन आणि महिला सभासदांसाठी मार्गदर्शन व भेटवस्तू वितरण असे विविध उपक्रम आयोजित करण्यात आले होते. या सोहळ्यामुळे ग्रामीण भागातील सहकार चळवळीच्या कार्याला नवी प्रेरणा मिळाली.



