सावित्रीबाई फुले जीवन गौरव पुरस्काराने विखे व कोयटे यांच्या कार्याचा गौरव
कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे
सावित्रीबाई फुले जीवन गौरव पुरस्काराने विखे व कोयटे यांच्या कार्याचा गौरव
कोपरगाव : महिला शिक्षण घेऊन विविध क्षेत्रात वेगवेगळ्या पदांवर कार्य करत असून त्यांच्यामध्ये संयम आणि दिर्घकाळापर्यंत चिकाटीने काम करत राहणे हा गुण त्यांच्या कार्याची ओळख करून देत असतो. सावित्री व जिजाऊंमुळे आज सौ. शालिनी विखे व सौ.सुहासिनी कोयटे यांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीमुळे त्यांचा सन्मान होत आहे. सावित्री व जिजाऊंच्याच नावाने पुरस्कार मिळून सन्मानित होणे अभिनंदनीय असून पुढील कारकीर्दीत उत्कृष्ट काम करण्याची प्रेरणा देणारा पुरस्कार असून त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव असल्याचे साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक प्रा.रंगनाथ पठारे यांनी सांगितले.
सावित्रीबाई फुले ज्ञानदीप प्रतिष्ठानच्यावतीने ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ यांच्या जन्मोत्सवानिमित्त त्यांच्या कार्याचा वारसा जपणाऱ्या अहमदनगर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ.शालिनी राधाकृष्ण विखे व कोपरगाव नगरपालिकेच्या पहिल्या माजी नगराध्यक्षा सौ.सुहासिनी ओमप्रकाश कोयटे यांना साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक प्रा.रंगनाथ पठारे यांच्या शुभ हस्ते व साऊ एकल महिला समितीच्या राज्य निमंत्रक सौ. प्रतिमा हेरंब कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली स्व.यशवंतराव चव्हाण समता सहकार सभागृहात ‘सावित्रीबाई फुले जीवन गौरव पुरस्कार’ देऊन त्यांच्या कार्याचा सन्मान करून गौरविण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते.
गृहिणी ते जिल्हा परिषद अध्यक्षा प्रवास अतिशय ओघवत्या भाषेत सांगून सर्वांना मंत्रमुग्ध केले. माहेरच्या अंगणातला होणारा हा सन्मान खरोखरच खूप आपुलकीचा व जबाबदारीची जाणीव करून देणारा वाटतो. काम करताना वेळेचे महत्व, शिस्त महत्त्वाची आहे – सन्मानार्थी सौ.शालिनीताई विखे
ते पुढे म्हणाले की, मातृभाषेतून शिक्षण का महत्वाचे? आयुष्य जगताना, शिकताना मातृभाषेचे महत्त्व भविष्यात येत्या दहा वर्षात सर्व शिक्षण, डिग्री या कागदावरच राहतील.जीवन जगण्यासाठी त्याचा उपयोग होणार नाही . खऱ्या अर्थाने मातृभाषा रुजवायची असेल, तर मातृभाषेतून शिक्षण अतिशय महत्त्वाचे आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षा व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दिप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. मानपत्र वाचन सावित्रीबाई फुले ज्ञानदीप प्रतिष्ठानचे सचिव ज्ञानेश्वर वाकचौरे व सौ.वर्षा आगरकर यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ. प्रतिमा कुलकर्णी व प्रमुख उपस्थितांचा सत्कार सावित्रीबाई फुले ज्ञानदीप प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सौ.संगीता मालकर यांच्या हस्ते करण्यात आला.
समता पतसंस्था सर्व गोरगरीब, गरजू लोकांच्या पाठीशी उभी राहते. अनेक गरजू, महिलांना बचत गटांमार्फत रोजगार उपलब्ध करून दिला असून लघुउद्योगाबाबत प्रशिक्षण व मार्गदर्शन ही केले जाते. राजकारण, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात काम करण्याची प्रेरणा समता परिवाराचे मार्गदर्शक काका कोयटे यांच्यामुळे मिळाली असून त्यांच्या मार्गदर्शनाने विविध क्षेत्रात काम करण्याचे बळ मिळते – सन्मानार्थी सौ.सुहासिनीताई कोयटे
प्रास्ताविकात अध्यक्षा सौ.संगीता मालकर म्हणाल्या की, सावित्रीबाई फुले ज्ञानदीप प्रतिष्ठान सावित्री व जिजाऊंचे संस्कार व विचार अंगीकारून काम करणारी एक सामाजिक संस्था आहे. या प्रतिष्ठान द्वारा अनेक गरजू, एकल, अनाथ महिलांचे प्रश्न सोडविले आहे. तसेच महाराष्ट्रात उच्च पदावर जाऊन उत्कृष्ट कार्य करणाऱ्या सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, आर्थिक क्षेत्रातील महिलांचाही गुण गौरव करून त्यांना प्रेरणा देण्याचे काम आम्ही करत असतो.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना सौ.प्रतिमा कुलकर्णी म्हणाल्या की, कोणत्याही क्षेत्रात एखादी महिला उत्कृष्ट काम करते. त्या वेळेस अशा सामाजिक संस्थांनी त्या महिलांचा सन्मान करून त्यांच्या कार्याचा गौरव करणे ही प्रशंसनीय बाब असून ज्ञानदीप प्रतिष्ठान महिलांचे मनोबल वाढविण्याचे उत्कृष्ट काम करत आहे. सकारात्मक दृष्टिकोन बाळगणाऱ्या महिलांना संधी मिळाल्यानंतर त्या संधीचे सोने करतात.भविष्यात या सावित्री व जिजाऊंच्या लेकी लोणी व कोपरगाव बरोबरच सामाजिक, शैक्षणिक, राजकारणात अहमदनगर जिल्ह्याचे नाव उज्वल करतील.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सेवानिवृत्त प्राध्यापिका सौ. शीला गाढे यांनी केले. कोपरगाव ग्रामीणचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले, महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे, गोदावरी दूध संघाचे चेअरमन राजेश परजणे, पीपल्स बँकेचे चेअरमन कैलास ठोळे, जेष्ठ विधीज्ञ ॲड.जयंत जोशी, श्रेष्ठ नागरिक मित्र मंडळाचे अध्यक्षा श्रीमती पुष्पलता सुतार, दंतरोग तज्ञ डॉ.अंकित कृष्णानी, महानंदाचे माजी संचालक पंडितराव जाधव, ठाणे अंमलदार सौ.गलांडे मॅडम, विजुभाऊ बंब, महिला बालकल्याण विभागाचे पंडित वाघिरे आदींच्या प्रमुख उपस्थिती सह कोपरगाव शहरातील महिला, नागरिक, हितचिंतक तसेच संस्थेच्या उपाध्यक्ष सुधाभाभी ठोळे, सौ.गीता रासकर, सौ.स्वाती मुळे, सौ.वर्षा झंवर, सौ.सुनिता ससाणे, वैजयंती बोरावके व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांचे आभार ज्ञानेश्वर वाकचौरे यांनी मानले.