बारामती येथे सौ.सुहासिनी कोयटे यांना ‘शारदा सन्मान पत्र’ देऊन त्यांच्या कार्याचा गुण गौरव व सन्मान
कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे
बारामती येथे सौ.सुहासिनी कोयटे यांना ‘शारदा सन्मान पत्र’ देऊन त्यांच्या कार्याचा गुण गौरव व सन्मान
कोपरगाव : ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामती संचलित कृषी विज्ञान केंद्र व शारदा महिला संघाच्या वतीने बारामती येथील शारदा नगर येथील आप्पासाहेब पवार सभागृहात समता परिवार, समाज व कोयटे कुटुंबातील असामान्य कर्तृत्व व नेतृत्व असणाऱ्या सौ.सुहासिनी ओमप्रकाश कोयटे यांना शारदा सन्मान सोहळा २०२४ अंतर्गत ‘शारदा सन्मान पत्र’ संसद रत्न खासदार सुप्रिया सुळे व शारदा महिला संघाच्या विश्वस्त सुनंदाताई पवार यांच्या शुभ हस्ते देऊन त्यांच्या कार्याचा गुण गौरव करण्यात आला.
साडी, चोळी व मानपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. मानपत्रात नमूद करण्यात आले आहे की, काका कोयटे या यशस्वी पुरुषाच्या मागे स्री शक्ती उभी राहिल्यामुळे काका कोयटे हे सहकार, सामाजिक क्षेत्रात यशस्वी होऊ शकले. सुहासिनी कोयटे या धार्मिक आहेत. तसेच त्या समता इंटरनॅशनल स्कूलच्या माध्यमातून १ हजारच्या वर मुले व कर्मचारी यांना दररोज भोजन देत असतात. हे भोजन शाकाहारी असते. समता इंटरनॅशनल स्कूलच्या शेतीमध्ये पिकविलेल्या भाज्या, शेवगा, दोडका, कारले अशा प्रकारच्या व धान्य देण्याचा प्रयत्न केला जातो. विद्यार्थ्यांना देण्यात येणारे जेवण हे रसायनमुक्त भाज्या व धान्यांचे असते. संपूर्ण महिन्याचा मेनूमध्ये विद्यार्थ्यांना जीवनसत्व युक्त आहार कसा दिला जाईल? याची दक्षता घेतली जाते. हिवाळ्यात खारीक, खोबरे, डिंकाचे लाडू, शुद्ध गीर गाईचे दूध पुरविले जाते.
सुहासिनी कोयटे यांनी कोपरगाव शहरातील गरजू, अनाथ, अंध, व्यक्तींना घरपोहच मोफत डबे पुरविण्याचा उपक्रम ३ वर्षापासून सुरू आहे. स्व. दादाप्पा खंडाप्पा कोयटे विद्यालयात सुहासिनी कोयटे यांच्या मार्गदर्शनाखाली २० वर्षापासून अल्प उत्पन्न असणाऱ्या पालकांचे पाल्य शिक्षण घेत आहेत. समता महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांच्या हाताला काम मिळावे म्हणून सहकार उद्योग मंदिराची स्थापना करण्यात आली असून या उद्योग मंदिरात येऊन महिला अगरबत्ती, कापूर, वाती, धूप, पेटिकोट तयार करतात. महिला बचत गटातील महिलांनी बचत गटांद्वारा उत्पादित केलेल्या मालाला ‘ सहकार मिनी मॉल’ च्या माध्यमातून एक हक्काचे विक्री केंद्र उपलब्ध करून दिले आहे.
महाराष्ट्र वीरशैव लिंगायत समाज महिला आघाडीचे अध्यक्ष पद भूषविले आहे. त्यांच्या कारकीर्दीत २५ हजार महिलांच्या उपस्थितीत यशस्वी वीरशैव लिंगायत समाजातील महिलांचा मेळावा भरविण्यात आला. येत्या १० तारखेला देखील तुळजापूर येथे वीरशैव लिंगायत समाजातील महिलांच्या लघु उद्योगांना चालना देण्यासाठी स्मॉल मशिनरी एक्स्पो, वीरशैव लिंगायत समाजातील महिलांच्या मेळाव्याचे आयोजन देखील केलेले आहे.