उज्वल भविष्यासाठी कष्टाला पर्याय नाही – विवेक वेलवणकर
कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे
उज्वल भविष्यासाठी कष्टाला पर्याय नाही – विवेक वेलवणकर
कोपरगाव : माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण हे विद्यार्थ्यांना पुन्हा घेता येत नाही. या वर्गात शिक्षण घेण्याची संधी पुन्हा मिळत नाही. ही मुले प्रामाणिकपणे अभ्यास करत असतात. त्यांनी टेन्शन घेणे बंद केले पाहिजे. शिक्षणाचा पुढील प्रवास करताना स्वतः मधील कौशल्ये विकसित केल्यास देशात व परदेशातही मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध आहे. त्यामुळे कौशल्ये विकसित करून उज्वल भविष्यासाठी कष्टाला पर्याय नसून प्रामाणिकपणे कष्ट करणे गरजेचे आहे. असे मत प्रसिद्ध व्याख्याते विवेक वेलवणकर यांनी सांगितले.
समता नागरी सहकारी पतसंस्था यांचे सौजन्याने समता इंटरनॅशनल स्कूल व समता स्टडी पॉईंट यांच्या संयुक्त विद्यमाने माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणानंतरच्या संधी व करिअर विषयी स्व.यशवंतराव चव्हाण समता सहकार सभागृहात पुणे येथील शिक्षण व करिअर क्षेत्रातील मार्गदर्शक व प्रसिद्ध व्याख्याते विवेक वेलणकर यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान समता पतसंस्थेचे चेअरमन ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आले होते.
समता इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना कुलदीप कोयटे म्हणाले की, पूर्वी आर्ट, कॉमर्स, सायन्स या शाखांचीच विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती असल्याने विद्यार्थी शिक्षण घेत होते. स्पर्धेमुळे शिक्षणाच्या शेकडो वाटा खुल्या झाल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थी संभ्रमावस्थेत होते. आता विवेक वेलवणकर यांचे हे मार्गदर्शनपर व्याख्यान विद्यार्थ्यांना टर्निंग पॉईंट ठरणार आहे.
विवेक वेलवणकर पुढे म्हणाले की, पालकांनी देखील शिक्षण क्षेत्रातील समज, गैरसमज लक्षात घेऊन आपल्या पाल्याला स्पर्धेच्या युगात गुणवत्तापूर्ण अभ्यास करून गुणवत्ता पूर्ण शिक्षण कसे मिळेल ? याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. वेगवेगळ्या कोर्सला जाण्यासाठी कोर्सची सीईटी द्यावी लागते. त्याबाबत पालकाला व आपल्या पाल्याला परिपूर्ण माहिती असणे आवश्यक असून त्यासाठी विशेष प्रयत्न करणे गरजेचे आहे. आवडीचे क्षेत्र निवडून प्रामाणिकपणे कष्ट करून अभ्यास केला तर, यश तुमचेच आहे. फक्त त्यासाठी पालक व पाल्यांचा सकारात्मक दृष्टीकोन, प्रबळ इच्छाशक्ती व मानसिकता असली पाहिजे.
व्याख्याते विवेक वेलवणकर यांचा सत्कार कार्यक्रमाचे अध्यक्ष काका कोयटे यांच्या हस्ते करण्यात आला. समता स्टडी पॉईंटचे व्यवस्थापन समितीचे सदस्य राजकुमार बंब यांनी मनोगतातून कोपरगाव तालुक्यातील ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांनी समता स्टडी पॉईंटच्या माध्यमातून कोपरगाव तालुक्याचे नाव उंचविण्याचे आवाहन केले. तर ॲड. डॉ.जी.बी.गायकवाड यांनी समता स्टडी पॉईंट विषयी सविस्तर माहिती सांगितली.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन समता इंटरनॅशनल स्कूलचे शिक्षक इसाक शेख यांनी केले. या वेळी समता पतसंस्थेच्या व्हा.चेअरमन सौ.श्वेता अजमेरे, समता स्टडी पॉईंट व्यवस्थापन समिती सदस्या सौ.सोनल लांडगे आदींसह कोपरगाव तालुक्यातील पालक व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. उपस्थितांचे आभार समता स्टडी पॉईंट व्यवस्थापन समिती सदस्य सुधीर डागा यांनी मानले.