समता इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांचे आयआयटी बॉम्बे येथील स्पर्धेत घवघवीत यश
कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे
समता इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांचे आयआयटी बॉम्बे येथील स्पर्धेत घवघवीत यश
कोपरगाव : समता इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी आयआयटी बॉम्बे येथे पार पडलेल्या ‘ह्युमनाईड रोबोटिक्स’ स्पर्धेत घवघवीत यश मिळविले असून समताच्या ‘टेक टायटन’ संघाने प्रथम पारितोषिक मिळविले. प्रथम पारितोषिक मिळविणाऱ्या संघाला ‘स्टार परफॉर्मन्स ॲवॉर्ड’ ने सन्मानित करण्यात आले. तसेच समता इंटरनॅशनल स्कूलला महाराष्ट्रातील ‘बेस्ट झोनल सेंटर’ या पुरस्काराने ही सन्मानित करण्यात आले. या स्पर्धेत भारतातील २८० संघांनी सहभाग नोंदविला होता. उपांत्यपूर्व फेरीसाठी एकूण १८ संघांची निवड करण्यात आली होती. त्यात समता इंटरनॅशनल स्कूलच्या पाचही संघांनी घवघवीत यश संपादन करत बाजी मारली.
टेक टायटन संघात समता इंटरनॅशनल स्कूलचे अवधूत उकिरडे, जयेश वाघ, केशमा खुराणा, अनन्या मुंदडा व स्वीटी माळवे यांचा समावेश होता. या संघातील विद्यार्थ्यांना समता इंटरनॅशनल स्कूलचे शिक्षक उदय पाटील व आदित्य काकड यांचे मार्गदर्शन लाभले.
अंतिम फेरीत समता इंटरनॅशनल स्कूलच्या प्रथम पारितोषिक मिळविणाऱ्या टेक टायटन संघाला ॲटटेक रेडियन्स कंपनीच्या टेक्निकल सर्विसेस मुख्य अधिकारी रुबी कल्याण यांच्या हस्ते ‘स्टार परफॉर्मन्स ॲवॉर्ड’ देण्यात आला. तसेच महाराष्ट्रातील ‘बेस्ट झोनल सेंटर’ पुरस्कार ॲटटेक रेडियन्स कंपनीच्या फाउंडर अँड डायरेक्टर रितू संधू यांच्या हस्ते दिला गेला.
मुंबई येथील आयआयटी बॉम्बे मध्ये मिळविलेल्या विद्यार्थ्यांचे समता इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे, कार्यकारी विश्वस्त सौ.स्वाती कोयटे, संदीप कोयटे, प्राचार्या सौ.हर्षलता शर्मा, शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक वर्ग आदींसह कोपरगाव तालुक्यातील विविध स्तरातून कौतुक होत असून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.