देश-विदेशब्रेकिंग

समता इंटरनॅशनल स्कूलमध्ये विठू नामाची शाळा भरली…

कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे

समता इंटरनॅशनल स्कूलमध्ये विठू नामाची शाळा भरली…

कोपरगाव : आषाढी एकादशी सारखे धार्मिक सण उत्सव हे बाल मनावर संस्कार करणारे असतात. समता इंटरनॅशनल स्कूल ही विविध उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या मनावर संस्कार रुजविण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असते. आषाढी एकादशी निमित्त आयोजित बाल वारकऱ्यांचा दिंडी सोहळा हा देखील धार्मिक संस्कार रुजविणारा आहे. तसेच या उपक्रमामुळे पंढरपूरच्या वारीला निघाल्याचा भास ही होत असल्याचे प्रतिपादन समता इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांनी केले.

समता इंटरनॅशनल स्कूलमध्ये आषाढी एकादशी निमित्त वारकऱ्यांच्या पारंपारिक वेशभूषेतील विद्यार्थी, शिक्षक, गोल रिंगण, पालखी मिरवणूक, टाळ – मृदुंगाच्या तालावर विठू नामाचा गजर अशा भक्तिमय वातावरणात विठ्ठल नामाची शाळा भरविण्यात आली होती. विठ्ठल नामाच्या शाळेतील वारकरी दिंडीत समता इंटरनॅशनल स्कूलच्या इ. १ ली ते इ.५ वीच्या विद्यार्थ्यांनी टाळ – मृदुंगाच्या तालावर विठू नामाच्या गजरात हातात भगवे झेंडे, मुलींनी डोक्यावर तुळस घेतलेल्या मुला – मुलींबरोबर स्कूलचे संस्थापक ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे, प्राचार्य डॉ.विनोदचंद्र शर्मा, आस्वाद मेस विभागाच्या अध्यक्षा सौ.सुहासिनी कोयटे, शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी सहभागी झाले होते. त्या वेळी बाल वारकऱ्यांची संवाद साधताना ते बोलत होते.

आषाढ एकादशीनिमित्त शिर्डी येथील प्रसिध्द विठ्ठल मंदिरातील सभा मंडपात समता इंटरनॅशनल स्कूलच्या इ.६ वी ते इ.९ वीतील विद्यार्थ्यांचा समावेश असलेले कॉसमॉस, ओएसिस, प्लॅटिनम, झेनिथ हाउस भारुड गायन व अभिनय स्पर्धेत सहभागी झाले होते. या स्पर्धेत कॉसमॉस हाऊसने रोडगा वाहीन तुला, ओएसिसने एडका मदन, प्लॅटिनमने विंचू चावला, झेनिथ हाऊसने दादला नको ग बाई भारुड गाऊन व अभिनय करत सादरीकरण केले. या वेळी परीक्षक म्हणून सुधांधू लोकेगावकर, जितेंद्र शिणगर यांनी काम पाहिले. या स्पर्धेत ओएसिस्, प्लॅटिनम, कॉसमॉस व झेनिथ हाउस यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय व चतुर्थ क्रमांक मिळविल्याने त्यांचा परीक्षकांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

समता इंटरनॅशनल स्कूलच्या बाल वारकऱ्यांच्या या दिंडीत पारंपारिक वेशभूषा परिधान करून कोणी विठ्ठल – रखुमाई, कोणी संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, एकनाथ, वासुदेव बनले होते. त्यामुळे समता इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांची वारकरी दिंडी कार्यक्रमाचे आकर्षण ठरली. दररोज शाळेच्या गणवेशात असलेले लहान मुलं – मुली आज मात्र पांढरा झब्बा, डोक्यावर टोपी, कपाळी बुक्का आणि नऊवारीत आलेल्या मुली केसात गजरा, डोक्यावर तुळस घेऊन विठ्ठल नामाची शाळा भरली, शाळा शिकताना तहान भूक हरली या अभंगाप्रमाणे विठ्ठल रखुमाईच्या भक्तीत दंग झालेले बाल वारकरी समता इंटरनॅशनल स्कूलच्या प्रांगणावर अवतरले होते.

या वेळी ज्ञानाच्या मंदिरात भोळ्या विठ्ठलाच्या हरिनामाचा गजर झाला अन् समता इंटरनॅशनल स्कूल मधील विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी दिंडी सोहळ्याच्या भक्तीरसात तल्लीन झाली होती. शाळेतील शिक्षकांनी जय जय राम कृष्ण हरी, रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी, ज्ञानोबा माऊली तुकाराम या अभंगांचे गायन करून टाळ व मृदुंगाच्या तालावर ठेका धरत नृत्य केले. तसेच विठ्ठल फुगडी खेळून समता इंटरनॅशनल स्कूलच्या प्रांगणावर भक्तीमय वातावरण निर्माण केले होते. इ. ८ वीच्या विद्यार्थ्यांबरोबर इतर विद्यार्थ्यांनीही भिंत पावली सादर करून विठूराया प्रति आपली भक्ती सादर केली होती. कार्यक्रमाची सांगता समता इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक काका कोयटे व आस्वाद मेस विभागाच्या अध्यक्षा सौ.सुहासिनी कोयटे यांच्या हस्ते विठुरायाची आरती व प्रसाद वाटप करून करण्यात आले.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे