अंध, अपंगांची सेवा हेच सामाजिक कार्य – कुलदीप कोयटे
कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे
अंध, अपंगांची सेवा हेच सामाजिक कार्य – कुलदीप कोयटे
कोपरगाव : ज्यांना सर्व अवयव आहेत त्यांना मदत करण्यापेक्षा जे विकलांग आहेत. त्यांची सेवा करण्यासारखे दुसरे कोणतेही सामाजिक कार्य होऊ शकत नाही. समता परिवाराच्या माध्यमातून कोपरगाव शहरातील अनाथ, अंध, अपंग, गरजू, निराधार अशा व्यक्तींना दररोज घरपोहोच जेवणाचे मोफत डबे दिले जातात. दिपावली निमित्त देण्यात येत असलेल्या या किराणा किट देण्यातही समता परिवाराचा वाटा आहे. समता परिवार यासारख्या वेगवेगळ्या उपक्रमांमधून समाजाची सेवा करत असून समता परिवाराचा सदस्य असल्याचा मला अभिमान असल्याचे कुलदीप संदीप कोयटे यांनी सांगितले.
दिपावली निमित्त कोपरगाव शहरातील अंधांना राष्ट्रीय दृष्टिहीन संघाचे हितचिंतक अजय तांबे व त्यांच्या सहकाऱ्यांच्या परिश्रमातून ५० किराणा किटचे वाटप करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, समता परिवाराच्या माध्यमातून शिर्डी येथे साई आश्रया मंदिराच्या माध्यमातून १४० अनाथ मुलांचे आणि ४० वृद्धांचा सांभाळ केला जातो. कोयटे परिवार प्रत्येक दिपावली उत्सव साई आश्रया मंदिरातील मुलं, मुली, वृद्धांसोबत साजरा करत असतो.
कार्यक्रमाची सुरुवात ब्रेल लिपीचे जनक लुई ब्रेल यांच्या प्रतिमेचे पूजन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कुलदीप कोयटे यांच्या हस्ते प्रतिमा पूजनाने झाली. या वेळी कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांचा सत्कार राष्ट्रीय दृष्टीहिन संघाचे मार्गदर्शक हिरामण टिळे व संघ हितचिंतक अजय तांबे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे कुलदीप कोयटे व प्रमुख मान्यवरांच्या हस्ते उपस्थित ५० अंध जोडप्यांना किराणा किटचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अजय तांबे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी संजय गायके संजय गांधी यांनी विशेष परिश्रम घेतले. या वेळी राष्ट्रीय दृष्टिहीन संघाचे मार्गदर्शक हिरामण टिळे, नाशिक विभागीय शाखेचे अध्यक्ष विनोद कांबळे, आहेरराव ज्वेलर्सचे मालक सुनील आहेरराव, खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांचे पीए शंकरराव सिनगर, ईशान संदीप कोयटे, राघव लोणगावकर आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांचे आभार गोरख दरंदले यांनी मानले.