सहकारी पतसंस्थांच्या आंतरराष्ट्रीय प्रशिक्षणासाठी समताचे सरव्यवस्थापक सचिन भट्टड यांची निवड
कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे
सहकारी पतसंस्थांच्या आंतरराष्ट्रीय प्रशिक्षणासाठी समताचे सरव्यवस्थापक सचिन भट्टड यांची निवड
समता पतसंस्थेचे सर व्यवस्थापक सचिन भट्टड यांचे छायाचित्र
कोपरगाव : क्रेडिट युनियन लीग ऑफ द रिपब्लिक ऑफ चायना (CULROC) आयोजित ०४ नोव्हेंबर ते ०८ नोव्हेंबर २०२४ या कालावधीत तैवान येथे होणाऱ्या सहकारी पतसंस्थांच्या आंतरराष्ट्रीय प्रशिक्षणासाठी अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव येथील समता नागरी सहकारी पतसंस्थेचे सरव्यवस्थापक सचिन शंकरलाल भट्टड यांची निवड झाली असून राज्यातील सहकारी पतसंस्था चळवळ व कोपरगाव तालुक्याच्या शिरपेचात एक मानाचा तुरा रोवला गेला असून सहकारी पतसंस्थांच्या आंतरराष्ट्रीय प्रशिक्षणात सलग दुसऱ्यांदा सहभागी होणार असल्याची माहिती संस्थेचे संचालक संदीप ओमप्रकाश कोयटे यांनी दिली.
पुढे म्हणाले की, चीन देशातील सहकारी पतसंस्था चळवळ सर्वात प्रगत, शिस्तबद्ध व सुदृढ समजली जाते. भारतातील सरव्यवस्थापकांपैकी एकमेव निवड मुलाखतीतून करण्यात झाली आहे. भट्टड यांनी समता पतसंस्थेत क्लार्क पासून ते सरव्यवस्थापक पदापर्यंत स्वकर्तृत्वाने मजल मारली आहे. गेल्या २५ वर्षापासून संस्थेच्या माध्यमातून ग्राहक, सभासदांना प्रामाणिकपणे सेवा देत आहेत. त्यांनी २०१५ मध्ये सरव्यवस्थापक म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर संस्थेच्या ठेवी २७४ कोटी ७५ लाख इतक्या होत्या, आज २०२४ अखेरीस ९५६ कोटी ४१ लाख इतक्या झाल्या आहेत. समताला भेटी देण्यासाठी येत असलेल्या विविध भागातील पतसंस्था देखील त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी बोलवत असतात. त्यांची बँकिंग क्षेत्राच्या अनुषंगाने वेगवेगळ्या विषयांवर व्याख्यान देण्यासाठी देखील आमंत्रित केले जाते.
चीन देशातील तैवान येथील ताईचुंगमधील वेंक्सीन झहाँगकिंग हॉटेलमध्ये ६ दिवसांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आलेले आहे. या प्रशिक्षणात अत्याधुनिक तंत्रज्ञान, नेतृत्व विकास, संस्थेचे अंतर्गत व्यवस्थापन आदी विषयांवर सखोल प्रशिक्षण दिले जाणार आहे. तसेच समता नागरी सहकारी पतसंस्था अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे महाराष्ट्रात सभासद ग्राहकांना देत असलेली सेवा, योजना व विविध सामाजिक उपक्रम आदींचे चित्रफिती द्वारा सादरीकरण करण्यात येणार आहे. भारतात सहकारी पतसंस्थांचे स्थान व त्यांची भूमिका या बाबतचे ही सादरीकरण करणार आहे. या व्यतिरिक्त तैवान मधील सहकारी पतसंस्थांचे फेडरेशन व तेथील सहकारी पतसंस्थांना भेटी देऊन त्यांचे तंत्रज्ञान, ग्राहक सेवा आत्मसात करण्यात येणार आहे.
देशातून मुलाखतीत सर्वोत्कृष्ट ठरल्यामुळे सचिन भट्टड यांची या प्रशिक्षणासाठी चीनमधील निवास व प्रवास खर्च चायना फेडरेशन करणार असल्याचे चायना फेडरेशनचे अध्यक्ष चुन – फॉन्ग ली व असोसिएशन ऑफ एशियन कॉन्फडरेशन ऑफ क्रेडिट युनियनचे अध्यक्ष योन्सिक किम यांनी कळविले आहे.
सचिन भट्टड यांची आंतरराष्ट्रीय प्रशिक्षणासाठी निवड झाल्यामुळे महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे, फेडरेशनचे पदाधिकारी, अधिकारी यांच्याकडून अभिनंदन होत असून समता पतसंस्थेच्या व्हा.चेअरमन सौ.श्वेता अजमेरे, ज्येष्ठ संचालक गुलाबचंद अग्रवाल, जितूभाई शहा, अरविंद पटेल, रामचंद्र बागरेचा, चांगदेव शिरोडे, गुलशन होडे, निरव रावलिया, कचरू मोकळ, संचालिका सौ.शोभा दरक व समता परिवाराच्या वतीने अभिनंदनचा वर्षाव होत असून प्रशिक्षणासाठी शुभेच्छा देण्यात येत आहे. तसेच देशातील सहकारी पतसंस्था फेडरेशन कडून देखील अभिनंदन होत आहे.